आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

भारताच्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेब फाळके यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते..!


 

दादासाहेब फाळके लिखित,प्रदर्शित, व दिग्दर्शित ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाने भारतात चित्रपटसृष्टीची ध्वजा रोवली. तमाम जागतिक सिनेक्षेत्रात दादासाहेबांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून नोंदविले गेले आणि भारतीय चित्रपटसृष्टीची सुरूवात झाली.

 

जागतिक चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डेव्हिड वॉर्क ग्रींफिथ यांचे जे स्थान आहे, तेच स्थान भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचे आहे. चित्रपट तंत्र, वितरण, मूव्ही कॅमेरा हे शब्दही माहिती नसतानाच्या काळात दादासाहेब फाळके ह्यांनी एकहाती प्रयत्न करून पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती केली.

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपटतंत्र आत्मसात करून त्यांनी भारतात चित्रपट निर्मितीचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात.

चित्रपट

दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज गोविंद फाळके यांची निर्मिती, दिग्दर्शन, आणि संकल्पनेतून साकार झालेली, भारतीय रुपेरी पडद्यावरील पहिली कलाकृती म्हणजे ”राजा हरिश्चंद्र”. अत्यंत अडचणींचा सामना करून फाळके यांनी हा चित्रपट तयार केला होता. या चित्रपटाची लांबी एकूण ४० मिनिटांची होती.

मुंबईतल्या कोरोनेशन थिएटरमध्ये हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला. हा मूक- चित्रपट होता, कारण तेव्हा चित्र आणि ध्वनी यांची सांगड घालणारं तंत्रज्ञान भारतातच नव्हे, तर जगात कुठेच अस्तित्वात नव्हतं. अर्थात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासूनच या विषयावर प्रयोग चालू झाले होते.

 

साधारपणे नाताळचा काळ असावा. मुंबईच्या सँडहर्स्ट रोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पहात होते. त्यामध्ये दादासाहेब फाळके हे देखील होते. परंतु चित्रपट पाहतांना त्यांच्या मनात विचारांचे काहूर उठले.

 

चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले आणि त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पहिला आणि आपणही चित्रपट क्षेत्रात प्रवेश करायचा असा ठाम निर्धार त्यांनी केला.

 

वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अविरत अभ्यास, ध्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला.

 

चित्रपट

 

डॉक्टरांनी सावधानतेचा इशारा दिला तरी देखील त्याची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेंनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेणे, निर्मितीसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री आणणे यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली.

 

लंडन येथे तत्कालीन सुप्रसिध्द चित्रपट निर्माते सेसिल होपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले. भारतात परतल्यावर पहिला चित्रपट निर्माण करण्यासाठी त्यांना कोणीही पैसा पुरवायला पुढे येईना.

 

शेवटी स्वत:च्या पत्नीची सौभाग्यलेणी सावकाराकडे सुपूर्त करून उभारलेल्या पैशातून त्यांनी ‘राजा हरिश्चंद’ हा भारतातील पहिला चित्रपट पूर्ण केला.

 

 

त्याकाळी महिला कलाकारांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे किंबहुना तशी बंदीच असल्यामुळे सर्व स्त्री पात्रांची भूमिका ही पुरुषांनी साकारली होती. एक तासाचा हा चित्रपट तयार होण्यास जवळपास आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता.

 

या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका स्वत: दादासाहेबांनी केली होती, तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलावंताने व राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र याने साकारली होती. अत्यंत कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळविला आणि त्यातूनच भारतीय चित्रपटसृष्टीची वैभवशाली परंपरा सुरू झाली.

 

या चित्रपटाची कथा राजा हरिश्चंद्र यांच्या जीवनावर आधारीत होती. काही महत्वपूर्ण प्रसंग या चित्रपटामधून त्यावेळच्या कलाकारांनी अगदी समर्थपणे पेलले. या मुकपटाचे सर्व कलाकार मराठीच होते. त्यामुळे मराठी भाषेतला हा पहिला चित्रपट असं रुढार्थाने म्हणता येईल.

 

दादासाहेब फाळक्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ च्या रुपानं कॅमेर्‍याशी, त्या रुपेरी पडद्याशी, या चित्रपट माध्यमाशी लोकांची ओळख करुन दिल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे चित्रपट मुकाच राहिला… मराठीच नव्हे तर अवघ्या भारतीय चित्रपटाला पहिला आवाज लाभला प्रभात चित्र कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटापासून.

 

चित्रपट

 

ह्या चित्राच्या निर्मितीपासूनच भारतीय चित्रपटाच्या इतिहासातलं ‘बोलपटांचं’ एक अद्भुत युग सुरु झालं. सुरुवातीच्या काळात, मुळात चित्रपट माध्यमच लोकांना इतकं नवीन होतं की प्रेक्षक चित्रपट बघायला येत तेच मुळी ह्या माध्यमाची नवलाई म्हणून! आजपर्यंत ज्या गोष्टी कीर्तनातून ऐकल्या होत्या, पोथ्यांमधून वाचल्या होत्या आणि क्वचित नाटकांमधून उलगडल्या जात होत्या, त्या कथा डोळ्यासमोर प्रत्यक्षपणे पडद्यावर साकार होत आहेत याचंच प्रेक्षकांना खूप अप्रूप होतं.

 

त्यामुळे त्या काळात चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, अभिनय या ही पेक्षा ‘कॅमेर्‍याने घडवलेला एक चमत्कार’ याच दृष्टीनी लोकं चित्रपट बघायला येत, त्यालाच लोकांच्या दृष्टीनी अधिक महत्व होतं. एकीकडे निर्माते दिग्दर्शकांचा कलही ‘चित्रपट’ हे नवीन माध्यम शिकण्याकडे, त्यातील तंत्रज्ञान अवगत करून घेण्याकडेच जास्त होता.

 

साहजिकच प्रेक्षकांची ही मानसिकता आणि नवीन तंत्रज्ञान ह्यांचा विचार करता ‘परिचित’ असलेल्या कथानकावर म्हणजेच मुख्यत: पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरच चित्रपट काढण्यात आले.

फाळके यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी चित्रपट निर्मितीला प्रारंभ केला. ‘राजा हरीश्चंद्र’नंतर दादासाहेब फाळकेंनी ‘लंकादहन’, ‘श्रीकृष्णजन्म’, ‘कालियामर्दन’ असे अनेक मूकचित्रपट बनवले. कलिपदा दास, आर्देशीर इराणी, जे. जे. मदन, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम यांसारखे अनेक निर्माते-दिग्दर्शक मूक-चित्रपट बनवण्यात अग्रेसर होते.

दादासाहेब फाळके

२० वर्षांच्या कालावधीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपट बनले. खेद याचा वाटतो, की यापैकी पूर्ण लांबीचे केवळ पाच ते सहाच चित्रपट आज अस्तित्वात आहेत. तर तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये असलेल्या चित्रपटांची संख्या साधारण १० ते १५ असेल. फाळके हे चालतीबोलती संस्थाच होते. त्यांनी कलाकार व तंत्रज्ञांना प्रशिक्षण, सेट उभारणे, छायाचित्रकला, फिल्म डेव्हलप करणे, चित्रपट वितरण आदी बाबी त्यांनी केल्या.

 

त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने दादासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन १९६९ पासून सुरू केला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी देविका राणी ठरल्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here