आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

भारतातील लोखंड व पोलाद उद्योगाचा पाया घालणारे, तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीकरिता कापडगिरण्या, जलविद्युत्‌प्रकल्प उभारणारे जगप्रसिद्ध कारखानदार, व्यापारी, दानशूर व देशभक्त घराणे.

टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी, त्यांचे दोन सुपुत्र सर दोराबजी व सर रतनजी आणि जमशेटजींचे पुतणे जहांगीर रतनजी दादाभाई (जे. आर. डी) हे या घराण्यातील धडाडीचे, कल्पक व दीर्घोद्योगी असे कर्ते पुरुष होत. एकाच घराण्यातील तीन कर्तबगार पिढ्यांनी घडवून आणलेला देशाचा प्रचंड औद्योगिक विकास, ही एक अनन्यसाधारण वस्तुस्थिती होय.

 

about_tata_leadimage_desktop_1920x1080

 

टाटा उद्योगाचे आद्य प्रवर्तक जमशेटजी नसरवानजी (३ मार्च १८३९–१९ मे १९०४) यांचा जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे एका पारशी घराण्यात झाला. जमशेटजींच्या वडिलांची मुंबईत व्यापारी पेढी होती. वयाच्या तेराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबईस आले. १८५६–५८ या काळात त्यांनी एल्‌फिन्स्टन कॉलेजमधून शिक्षण घेतले. रामकृष्ण गोपाळ भांडारकर व दिनशा वाच्छा हे जमशेटजींचे सहाध्यायी होते. १८५८ मध्ये जमशेटजी एल्‌फिन्स्टनमधून ‘ग्रीन स्कॉलर’ (पदवीप्राप्त) म्हणून उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेत असतानाच जमशेटजींचा करसेटजी डाबू या पारशी गृहस्थांच्या हीराबाई या कन्येशी विवाह झाला. दोराबजी (जन्म १८५९) व रतन (जन्म १८७१) हे त्यांचे पुत्र.

१८५९ मध्ये जमशेटजी आपल्या वडिलांच्या व्यवसायात शिरले. याच सुमारास हाँगकाँगच्या ‘जमशेटजी ॲड अर्देशिर’ शाखेच्या व्यवहारात लक्ष घालण्यासाठी त्यांना हाँगकाँगला पाठविण्यात आले. तेथूनच पुढे ते शांघायला गेले व तेथे त्यांनी दुसरी शाखा उघडली. १८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर त्यांनी मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळे निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन तिचे कापडगिरणीत रूपांतर केले.

तिचे ‘ॲलेक्झांड्रा मिल’ असे नामकरण करून त्यांनी आपल्या औद्योगिक कारकीर्दीस प्रारंभ केला. या पहिल्याच उपक्रमामुळे जमशेटजींना कीर्ती व संपत्ती या दोहोंचाही लाभ झाला. जमशेटजींनी ही भरभराटीस आणलेली गिरणी विकून टाकली. यानंतर मोठ्या आकारामानाची कापडगिरणी स्थापण्याचा संकल्प सोडून ते कापडउद्योगाचे अधिक शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविण्याकरिता पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे फिरोजशहा मेहतांशी त्यांचा घनिष्ठ स्नेह जडला. १८७४ मध्ये भारतात परतल्यावर अनेक मित्रांचा विरोध असूनही जमशेटजींनी मुंबईऐवजी नागपूर येथे ‘एम्प्रेस मिल्स’ ही कापडगिरणी सुरू केली (१ जानेवारी १८७७) एम्प्रेस मिल्सच्या स्थापनेपासूनच जमशेटजींनी कामगारकल्याण योजना कार्यान्वित केल्या.

टाटा

कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन (१८८६) तिचे ‘स्वदेशी मिल्स’ मध्ये रूपांतर करून त्यांनी कापडधंद्याचा विस्तार केला. त्याच वर्षी जमशेटजींनी अहमदाबाद येथील ‘ॲडव्हान्स मिल्स’ ही कापडगिरणी भरभराटीस आणली. स्वदेशी मिल्स या गिरणीच्या रूपाने जमशेटजींची स्वदेशी चळवळीबद्दल वाटणारी आस्था प्रकट झाली, तर ॲडव्हान्स मिल्सच्या रूपाने त्यांचा कापडउद्योगातील आधुनिकीकरणाचा दृष्टिकोन दिसून आला. भारतीय कापडउद्योगाचे आधुनिकीकरण करण्याचे श्रेय जमशेटजींना द्यावे लागते. त्याच्याच अनुषंगाने भारतात लांब धाग्याचा कापूस उत्पादनाकरिताही त्यांनी प्रयत्न केले.

 

जमशेटजींनी आपल्या कापडगिरण्यांचे व्यवस्थापन म्हणजे वित्तपुरवठा, यंत्रसामग्री, देखभाल आणि कामगारकल्याण इ. कार्यक्षम राखले होते. उद्योगधंद्यांतील सम्यक अर्थप्रबंधासाठी त्यांनी दाखविलेली योजकता व उपक्रमशीलता ही अनन्यसाधारण होती. परिणामतः त्यांनी प्रत्येक गिरणीतून तुलनेने अधिक नफा मिळवून दाखविला.

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना, जमशेटजींनी ‘टाटा लोखंड व पोलाद कारखाना’, जमशेटपूर व ‘टाटा हायड्रो-इलेक्ट्रिक कंपनी’ या दोन प्रकल्पांचे आराखडे वा योजना तयार केल्या. नागपूर, मुंबई, अहमदाबाद येथील गिरण्यांतून त्यांनी प्रासंगिक अकुशल कामगारांचे कुशल कामगारवर्गात रूपांतर केले. त्यांच्या कल्याणार्थ अनेक गोष्टी केल्या. कामगारांना अद्ययावत यंत्रसामग्री हाताळण्याचे प्रशिक्षण दिले.

मुंबई शहरातील सुधारणांशी जमशेटजींचा संबंध १८६३ पासूनच होता. १८९० पासून त्यांनी मुंबईतील जमीनजुमल्यांच्या खरेदीस प्रारंभ केला. ते व त्यांचे कुटुंबीय एका वास्तूत बराच काळ कधीच राहिले नाहीत. वारंवार त्यांनी नवनवीन जमिनी खरेदी केल्या व त्यांवर इमारती बांधल्या. घरे बांधणे हा जमशेटजींचा एक आवडता छंद होता.

त्यांनी मध्यमवर्गातील पारशी लोकांकरिताही घरे बांधली. शहरात उभारलेल्या अनेक भव्य इमारती म्हणजे टाटांच्या दानशूरत्वाचेच प्रतीक होय. पारशी जिमखाना उभारण्यात त्यांनी बरेच श्रम घेतले. १८९८ मध्ये ताजमहाल हॉटेलाचा शिलान्यास करण्यात आला. त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा यावा म्हणून जमशेटजींनी यूरोपात दौरा काढून तेथील हॉटेल व्यवसायाचा अभ्यास केला. १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू झाले.

जमशेटजींना ब्रिटिशांकित भारतातील सनदी नोकरवर्ग तयार करणारे शिक्षण प्रथमपासूनच आवडत नव्हते. तशातच ‘जर हिंदी विश्वविद्यालये ही केवळ परीक्षा घेणारी यंत्रे बनतील, तर उच्च शिक्षणाची वाढ हिंदुस्थानात होणे अशक्य आहे’, ह्या लॉर्ड रे यांच्या उद्‌गारांची भर पडली आणि या आक्षेपास उत्तर म्हणून जमशेटजींनी ‘भारतीय विज्ञान संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) काढण्याचे ठरविले. संशोधनपर व शास्त्रीय दृष्टी येण्यासाठी प्राध्यापक बरजोर पादशहा यांना परदेशांस पाठविले. त्यांनी सबंध यूरोप, अमेरिका यांमधील नामवंत शास्त्रज्ञांच्या गाठीभेटी घेऊन स्वदेशास परतल्यावर जमशेटजींना अहवाल दिला. अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स इन्स्टिट्यूट’ सारखी संस्था भारतात उभारावयाचे ठरले त्यासाठी जमशेटजींनी ३० लक्ष रु. काढून ठेवले. १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. ही एक जगद्‌विख्यात संस्था मानली जाते.

अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. बंगालमध्ये लोखंड आणि पोलाद यांच्या निर्मितीची आधुनिक पद्धतीनुसार शक्यता असल्याचा मेजर मॅहोन नावाच्या सरकारी अधिकाऱ्‍याचा अहवाल त्यांच्या वाचनात आला. त्यानुसार जमशेटजींनी शास्त्रीय ज्ञान संपादन करून संशोधन करविले आणि दोराबजी टाटा यांनी आपले भूवैज्ञानिक प्रमथनाथ बोस यांच्या साहाय्याने बंगालमध्ये लोखंडाच्या टेकडयांचा शोध लावला.

याकरिता जमशेटजींनी स्वतःचे व लोकांचे मिळून १६·३ लक्ष पौंड भांडवल गुंतविले ते कमी पडू लागताच ग्वाल्हेरच्या महाराजांकडून त्यांना आणखी चार लक्ष पौंड मिळाले व या प्रचंड कामास प्रारंभ झाला. जमशेटजींनी भारताच्या बऱ्‍याच प्रदेशांची संशोधनपूर्ण पाहणी केली. शेवटी कोळसा व पाणी यांचे वैपुल्य असलेल्या बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील एक स्थान त्यांनी निवडून तेथे पोलादकारखाना उभारावयाचे ठरविले. पूर्वीचे साक्‌ची नावाचे खेडे जमशेटपूर शहर बनले व तेथे ‘द टाटा आयर्न अ‍ँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या कारखान्यात पार पाडल्या जातात. जगामधील प्रचंड व प्रगत लोखंड-पोलाद कारखान्यांमध्ये टिस्कोची गणना होते.

 

tata

जमशेटजींनी दुसरी भव्य योजना म्हणजे पश्चिमी घाटामधून पडणाऱ्‍या प्रचंड जलप्रपातांपासून वीजनिर्मिती करणे, ही होय. त्यासाठी या प्रकल्पाची पायाभरणी मात्र ८ फेब्रुवारी १९११ रोजी झाली. फेब्रुवारी १९१५ पासून लोणावळा, वळवण, शिरोटा, ठोकरवाडी व मुळशी या पाच ठिकाणी असलेल्या धरणांच्या पाण्याचा उपयोग करून खोपोली, भिवपुरी व भिरा येथील वीजउत्पादन केंद्रे मुंबईला विजेचा पुरवठा करू लागली.

ब्रिटिश जहाजउद्योगाला टक्कर देण्याकरिता त्यांनी आपली ‘टाटा लाइन’ ही जहाजकंपनीही उभारली होती. तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदरांच्या स्पर्धेत जमशेटजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला. जो धंदा करावयाचा तो नाविन्यपूर्ण व त्यातील उत्पादन सफाईदार व पहिल्या दर्जाचे असले पाहिजे, या त्यांच्या ‘टाटा टच’ मुळे बाजारात ‘टाटा’ या नावाला फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली.

जमशेटजींनी आपल्या औद्योगिक ध्येयवादात स्वदेशाच्या आणि स्वकीयांच्या गरजांची जाणीव सतत राखली होती. त्यांनी दूरदृष्टीने टाटा सन्स लि. या संस्थेची स्थापना करून (१८८७) तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा उद्योगसमूहातील विविध उद्योगांना आणि संस्थांना होणारा फायदा न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो.

भारतातील आधुनिक उद्योगधंद्यांचे प्रवर्तन जमशेटजींनी केले. ‘इतर पुढारलेल्या राष्ट्रांच्या बरोबरीने जर हिंदुस्थानला जावयाचे असेल, तर त्याचे औद्योगिक कार्यक्षेत्र विस्तृत झाले पाहिजे हिंदुस्थानची भौतिक उन्नती होण्याचा शक्य कोटीत असणारा मार्ग हाच आहे’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. व्यवहारी दृष्टीबरोबरच कल्पकता, उपक्रमशीलता, समयोचितता, धाडसीपणा आणि निकोप व्यापारी दृष्टी ह्या गुणांमुळेच जमशेटजींना अपार यश लाभले. रूढ धंद्यांपेक्षा नवेनवे औद्योगिक क्षेत्र शोधण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.

राष्ट्रीय व आर्थिक पारतंत्र्याच्या काळात ‘स्वदेशी’च्या संकल्पनेला सिद्धीचे रूप देण्यात, देशातील नैसर्गिक साधनसामग्रीच्या शोधाकरीता व विकासाकरिता प्रचंड श्रम घेण्यात आणि वैज्ञानिक अन्वेषणाची प्रेरणा देण्यात जमशेटजी टाटा हे अग्रभागी होते.

नाउहाइम (प. जर्मनी) येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. त्यांचे शव लंडनला नेण्यात येऊन २४ मे १९०४ रोजी पारशी धर्मानुसार ब्रुकवुड येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्‌गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात सर दोराबजी व सर रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: माजी पंतप्रधान इंदिरा गांधीसुद्धा या न्यायाधीशाचा निर्णय बदलू शकल्या नव्हत्या…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here