आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

“तमाशा” पोट भरण्यासाठी जोपासली जाणारी ही लोककला इंटरनेटच्या जमान्यात नाहीसी होतेय..!


महाराष्ट्र ही साधु-संताची आणि महामानवांची भुमी आहे असे म्हटले जाते. कारण या भुमित अनेक महामानवांचा व महापुरुषांचा जन्म झाला आहे आणि त्यांच्याच समाजहित जोपासणाऱ्या कल्याणकारी धोरणांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भुमीने देशाच्या संस्कृतीत वेगळीच भर घातली आहे, एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे.

 

मुळात संपुर्ण भारतातच विविधता आढळते त्यामुळे महाराष्ट्रात सुध्दा निरनिराळ्या धर्मांचे,जातींचे व वंशाचे लोक राहतात.

 

प्रत्येकाने आप-आपली एक वेगळीच संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे संस्कृतीच्या जोरावर प्रत्येकाची साहित्यसंपदा निर्माण झालेली आहे किंबहुना प्रत्येकाच्या एका विशिष्ट साहित्याची निर्मिती झाली आहे. त्यामध्ये लोकगीते, लोककथा, लोकनाट्य आणि लोककला इ.अनेक साहित्य प्रकाराचा त्यात समावेश होतो.

 

new google

लोककलेचा विचार करतांना प्रामुख्याने आपणास असे दिसुन येते की, लोककला हा मानवी जागृतीचा परिणामी मानवी कल्याणाचा, मानवी हिताचा सर्वोत्कृष्ठ कलाविष्कार आहे आणि त्याचा मुळाधार मानवी भाव-भावना हा आहे. मुळात कुठल्याही कलेचे प्राथमिक स्वरुप हे आपल्या मनातील विचार निरनिराळ्या रुपात म्हणजेच गीत, नाट्य, चित्र, कथा इत्यादी स्वरुपात प्रकट करणे होय. असे असले तरी एका व्यक्तीने केलेली कृती म्हणजे लोककला नाही तर लोककला या शब्दातच या संकल्पेचा अर्थ स्पष्ट होतो. लोकांची कला म्हणजे लोककला असा तिचा साधा सरळ आणि स्पष्ट अर्थ आहे.

 

एकंदरीत लोककलेची निर्मिती ही व्यक्तीसमुहातुन होते, लोकसमुहातुन होते आणि या कलाविष्कारास मानवी भावना प्रवृत्त करित असते.

 

मग ती कधी ईश्वराविषयीची श्रध्दा असते, कधी समाजाविषयीची समाज भावना असते तर कधी ती धर्माविषयीची धर्मिक भावना असते. सरुवातीस ती व्यक्तीगत स्वरुपाची असते पण एका विशिष्ठ पातळीवर त्याचे रुपांतर पुढे समुहरुपात होते आणि ती परंपरेच्या रुपाने समाजात आस्तित्वात राहते. लोककला ही गतिमान स्वरुपाची कला असल्या कारणाने त्यात काळानुरुप काही बदल होतात त्या कलेचा काही भाग हा विस्मरणात जातो, कालबाह्य ठरतो व त्यातुन एक वेगळीच कला निर्मिती होते आणि मग तिच कला पुढे परंपरेच्या रुपाने पिढ्यांन-पिढ्या लोकांकडुन अनुसरली जाते.

 

tamasha yuvakatta

लोककलांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे असे म्हटले जाते कारण महाराष्ट्रात अनेक लोककला आस्तित्वात आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाले तर किर्तन, भारुड, वासुदेव, पोतराज, वाघ्या-मुरळी, लावणी आणि तमाशा इत्यादींचा समावेश होतो.

 

आजघडीला लोककलांचा विचार केला तर तंत्रवैज्ञानिक प्रगतीच्या आणि इंटरनेटच्या जमान्यात सुध्दा थोड्याफार का होईना पण तग धरुन असलेल्या आणि समाजमान्य झालेल्या दोनच मुख्य लोककला आहेत असे मला वाटते.

त्या म्हणजे लावणी आणि तमाशा ह्या होत. खर तर लावणी ही नवलोककला तमाशाचाच एक भाग आहे. तमाशामध्ये सादर केला जाणारा लावणी हा गीतरुपी असणारा उत्कृष्ठ असा नृत्य कलाप्रकार आहे म्हणुन माझ्या मते, तमाशा हा महाराष्ट्रातील लोकजिवनाशी घट्ट पकड असणारा, महाराष्ट्राच्या मातीशी एकरुप झालेला एकमेव लोककलाप्रकार आहे आणि त्यामुळेच आपली लोककला कोणती? हा प्रश्न जेंव्हा-जेंव्हा मला विचारला जाईन तेंव्हा-तेंव्हा मला “तमाशा” हेच उत्तर द्यायला आवडेल.

 

म्हणुनच आमची लोककला…फक्त “तमाशा” !

 

तमाशा हा लोककलेचा लोकनाट्य प्रकार असुन त्यात गण, गवळण, लावणी, सोंगाड्या आणि वग इत्यादीला महत्व असते. तमाशाचा प्रारंभ हा गणाने होत असतो. गण म्हणजे गणपती, म्हणजेच तमाशाचा प्रारंभ हा गणपतीला वंदन करुन होतो. तमाशात गण सादर केल्यानंतर गवळण होते. गवळण म्हणजे श्री कृष्णाने केलेल्या लिलेचे गायन रुपी वर्णन होय.

 

गण आणि गवळण यानंतर लावणी होते त्यातुन नृत्य सादर केले जाते तर सोंगाड्यावर तमाशाचे यश अपयश अवलंबुन असते कारण ते विनोदी पात्र किंवा कथानक असते त्याच्यामुळे तमाशा पाहणाऱ्यांत नवचैतन्य निर्माण होत असते. त्यानंतर तमाशात वगनाट्य सादर केले जाते.तमाशाचे मुख्य अंग म्हणुन वगनाट्याकडे सर्वसामान्य रसिक पाहतो. वगात पात्रे असतात व ते कथा सादर करतात. पुर्वीच्या काळी तमाशात वगाला अतिशय महत्व होते पण आजघडीला वगाऐवजी नृत्याला महत्व देण्यात आले आहे.

 

पुर्वी वगाच्या माध्यमातुन लोकजागृती केली जायची, समाजप्रबोधन केले जायचे, याच माध्यमातुन महाराष्ट्रात तमाशाने लोकशिक्षण, स्त्रीशिक्षण, दारुबंदी, व्यसनमुक्ती इत्यादी विषयावर जनजागृती केली.

 

डॉ.रामचंद्र देखने यांच्या भाषेत सांगायचे झाले तर…ते तमाशाचे महत्व सांगतांना सांगतात की, “लोकरंजनाबरोबरच नितीच्या चार गोष्टी सांगणारी आणि त्यातुन प्रबोधन करणारी तमाशा ही लोकनाट्य स्वरुपाची लोककला आहे”(संदर्भ :-डॉ.रामचंद्र देखने लिखित सोशल मिडीया-फेसबुक वरील पोस्ट) म्हणजेच समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर बोट ठेवणारे आणि लोकांचे मन तात्काळ आकर्षुण घेणारे कथानक वग प्रकारात आढळतात.

 

त्यानंतर म्हणजेच अण्णाभाऊ साठेंच्या काळात मात्र तमाशाचे स्वरुप किंचितसे बदलले गेले त्यांनी(अण्णाभाऊ साठेंनी) तमाशाचा वापर चळवळीसाठी करायला सुरुवात केली प्रामुख्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्याचा वापर करण्यात येऊ लागला.

 

आजघडीला तर तमाशाचे स्वरुप पुर्णपणे बदलले आहे. आज तमाशा आणि नृत्य ही एकाच अर्थाची दोन शब्द आहेत की काय? असेच वाटु लागले आहे.

 

lawni yuva katta

 

तमाशा म्हटलं की नाच एवढीच काय ती त्याची ओळख राहिली आहे आणि याचमुळे त्याला (तमाशाला) उतरती कळा लागली आहे असे म्हणावे लागेल. पण तमाशाशी एकरुप झालेल्या आणि तमाशावर प्रेम करणाऱ्या आजच्या व्यक्तीच्या मनात मात्र तमाशा बाबत श्रेष्ठत्वाची भावना कायम असल्याचे खालील संदर्भातुन दिसून येते.

 

नुकत्याच विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने सन्मानित केलेल्या शाहीर बी.के.मोमीन यांनी तमाशा बाबत आपले मत एका वृत्तपत्रात व्यक्त केले त्यामध्ये ते असे म्हणाले की,“तमाशा चालत नाही असे म्हणने चुकीचे आहे, चांगले लिहले जात नाही म्हणुन तो चालत नाही हे बरोबर आहे.

 

तमाशा आजही श्रेष्ठच आहे” पुढे जाऊन ते असे म्हणाले की,“जमाना फास्ट झाला आहे त्याप्रमाणे बदलायला नको का?नाटके बदलली, चित्रपट बदलली मग तमाशानेही बदलायला हवे.”[संदर्भ :-शाहीर बी.के.मोमीन (दैनिक लोकमत, दि.१० फेब्रुवारी २०१९, रविवार)] मोमीन यांनी व्यक्त केलेले,“तमाशासाठी चांगले लिहले जात नाही. “हे मत अतिशय खरं असलं तरी वास्तव सुध्दा नकारता येत नाही हे ही तितकेच खरं आहे.

 

तमाशाची पिछेहाट झाली आहे, होत आहे हेच वास्तव आहे आणि हे नाकारताच येत नाही. मी तर यापुढेही जाऊन असे म्हणेन की, पुढील काळात तो(तमाशा) किती तग धरेल याची चिंता वाटावी अशीच परिस्थिती आहे आणि हे एका लोकनाट्य मंडळाच्या अध्यक्षाने नुकत्याच एका कार्यक्रमानंतर दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलेल्या खंतेतुन स्पष्ट होते. त्या मुलाखतीत ते म्हणाले की,

 

“इंटरनेटच्या जमान्यात तमाशा या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. यापुर्वी यात्रा महोत्सवात बोलावणे यायचे आज तसे होतांना दिसत नाही. खरे तर तमाशामुळेच महाराष्ट्राची लोककला जिवंत आहे आणि तिला तसेच जिवंत ठेवायचे असेल तर त्यासाठी शासनाने तमाशा मंडळातील कलावंतासह तमाशा मंडळांना सोयीसुविधा उपल्बध करुन देणे गरजेचे आहे.”[संदर्भ:- हेमंत महाजन(चालक,आनंद लोकनाट्य मंडळ)पेपर दैनिक सकाळ,७ फेब्रुवारी २०१९,गुरुवार]

 

एकंदरीत तमाशा बाबतची समाजाची अभिरुची बदललेली आहे त्यामुळे तमाशाबाबत परिपुर्ण माहीती नसतांना माझ्यासारख्या नवोदित लेखकाने भविष्यातील तमाशावर बोलने, अंदाज व्यक्त करणे योग्य नाही. म्हणुन यापुढचे तमाशाचे भविष्य चांगले आहे का नाही? हे येणारा काळच ठरवेल आणि हेच अटळ सत्य आहे यात काही शंकाच नाही.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here