आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

संसदीय लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका!


 

भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांंना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असे म्हटले जाते. शिक्षण घेत असतांना बाबासाहेबांना अनेक मानहानीकारक प्रसंगाचा सामना करावा लागला होता. या संपुर्ण परस्थितीला भारतीय समाजातील विषमता कारणीभूत आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्याकाळातील दलितांना न्याय मिळत नव्हता. दलित असल्यामुळे आपल्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागले याची त्यांना खंत होती. प्रथमत: विषमता नष्ट करणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने राजकिय व धार्मिक हक्क, शिक्षणाचा प्रसार इ. बाबी आढळतात.

सोबतच आंबेडकरांनी राष्ट्र व राष्ट्रवाद, धर्मांतर, स्वातंत्र्य, राजकिय व सामाजिक लोकशाही, संसदीय लोकशाही, समता, समाजवाद इ. निरनिराळ्या विषयांवर आपले विचार मांडल्याचे दिसुन येते.

लोकशाहीमध्ये सर्व लोकांनी ऐक्याने राहणे अपेक्षित असते. जेथे लोकांच्या सांस्कृतिक दृष्टिकोणात साम्य नसते तेथे लोकशाही भावना रुजवणे अवघड असते. त्यामुळे जाती-जातीमधील भिन्नता, निरक्षरता, बेकारी व दारिदय हे प्रमुख अडथळे जोपर्यंत नष्ट होत नाहीत तो पर्यंत भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात येऊ शकणार नाही हे त्यांचे ठाम मत होते. म्हणुनच त्यांनी स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांना महत्व दिले. आंबेडकरांचा हुकुमशाही आणि धर्मधिष्ठित राज्य यांना सक्त विरोध होता. कारण या पध्दतीत व्यक्तीला समान संधी, समान अधिकार मिळत नाही.

व्यक्ती हिताला महत्व दिले जात नाही, व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जात नाही. लोकांच्या सर्व मागण्यांमध्ये सुसंवाद साधला जात नाही. म्हणुन त्यांनी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला.

संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करतांना त्यांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या.

(१)  विरोधी पक्षाचे महत्व :

संसदीय लोकशाही शासन पध्दतीमध्ये विरोधी पक्ष अतिशय महत्वाची भुमिका बजावत असतो. बलवान विरोधी पक्ष असेल तर तो सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेऊ शकतो. सरकारचे चुकीचे निर्णय जनतेला दाखवून देणे, वेळप्रसंगी सरकारवर दबाव पाडून त्यांना आपले निर्णय बदलायला भाग पाडणे इ.कार्य ते करतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची मनमानी चालु शकत नाही. तसेच संसदीय शासन पध्दतीमध्ये विरोधी पक्षांनी सुध्दा कधी ना कधी सत्तेचा अनुभव घेतलेला असतो त्यामुळे विरोधी पक्षांची मतेही सत्ताधारी पक्ष विचारात घेतात. खंबीर विरोधी पक्ष असणे हे सक्षम लोकशाहीचे लक्षण मानले जाते.

(२) एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य :-

सत्ताधारी वर्गाच्या हाती सत्ता जाणे स्वाभाविक असले तरी आंबेडकरांच्या मते, समाजातील सर्वात खालच्या स्तरावर असणाऱ्या वर्गाला जेंव्हा सत्ता मिळेल तेंव्हाच ती खरी लोकशाही असेल त्यासाठी त्यांनी प्रौढ मताधिकाराचा पुरस्कार केला आहे. प्रौढ मताधिकारामध्ये एका व्यक्तीला एक मत अभिप्रेत असते. संसदीय लोकशाहीमध्ये एक माणूस, एक मत व एक मूल्य हे समीकरण महत्वाचे आहे.

गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अडाणी, १८ वर्षावरील लहान-मोठा असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान मताधिकाराचे वाटप करण्यात आले आहे.

बाबासाहेबांच्या मते, उपाशीपोटी असणाऱ्या व्यक्तीचे मत आणि सुखी माणसाने दिलेले मत यामध्ये कधीच साम्य असणार नाही. उपाशीपोटी असणाऱ्या व्यक्तीला या मताची अजिबात किंमत वाटणार नाही, ज्याच्या वाट्याला छळ आणि शोषण आले आहे त्याला त्या मताबद्दल अजिबात आस्था वाटणार नाही. त्यामुळे आधी सामाजिक परिस्थीतीमध्ये बदल झाला पाहिजे. सर्वांंना समान दर्जा मिळाला पाहिजे. तसेच सर्वांंच्या प्राथमिक गरजा भागविल्या गेल्या पाहिजेत तरच लोकशाही यशस्वी होऊ शकते.

(३) जागरूक मतदार :-

संसदीय शासनपध्दतीमध्ये मतदार हा जागरूक बनत असतो. त्यामध्ये न्युज चँनल्स, वर्तमानपत्रे इ. माध्यमांची भूमिका महत्वाची असते. सरकारने घेतलेले निर्णय व निर्णयावरील विरोधी पक्षांची भूमिका यावर मतदार चिंतन करतात, त्याबद्दल आपले मत बनवितात. वेळप्रसंगी मतपेटीद्वारा आपला मतदानाचा हक्क वापरुन मोठा बदल घडवुन आणतात.

(४) शांततेच्या मार्गाने सत्ताबदल :-

जनतेला राज्यकर्त्यांना सत्तेपासुन दूर करायचे असेल तर मतपेटीच्या माध्यमातुन ते करु शकतात. तसेच विरोधी पक्षाला कोणत्याही क्रांतीचा वापर न करता मुदतीपूर्वी देखील देशाच्या पंतप्रधानाला किंवा मंत्रीमंडळाला किंवा सत्ताधारी पक्षाला सत्तेवरून दूर करता येते. त्यासाठी कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा रक्तपात करण्याची गरज पडत नाही शांततेच्या मार्गाने सत्ताबदल करता येतो.

एकंदरीत संसदीय लोकशाहीमध्ये व्यक्तीला आपल्या जबाबदारीची जाणीव असते. त्यातुन कुठलीही क्रांती न घडवता सामाजिक व आर्थिक परिस्थितीत मुलभूत बदल घडवुन आणता येतात.

वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडवुन आणली जाते. एखादा विषय वादाचा असला तरी त्यावर चर्चा होऊन बहुमताने निर्णय घेतला जातो. मुळात सामाजिक समता ही संसदीय लोकशाहीतूनच निर्माण होऊ शकते. जातिव्यवस्थेचे निर्मुलन करावयाचे असेल तर ससंदीय लोकशाही शासन व्यवस्था महत्वाची भूमिका बजावते असते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परखड मत होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here