आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
पुर्वी ठाणे जिल्ह्यातील एक भाग असलेला जव्हार तालुका ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्याचा एक भाग झाला आहे. आदिवासी जिल्हा असलेला पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका हा पूर्णतः आदिवासी भाग आहे. आदिवासी बांधव येथील मूलनिवासी, आदिवासी समाज हा निसर्गपूजक समाज असून निसर्गालाच देव मानणे ही आदिवासी समाजाची रीत व परंपरा आदिवासी समाज आपले निरनिराळे सण अत्यंत आनंदात व भक्तिभावाने साजरे करतो.
आदिवासी समाजात होळी सणाला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक महत्व असून समाज होळी सण आनंदात साजरा करतात.
जव्हार भागात रोजगाराचा भीषण प्रश्न असल्याने आदिवासी बांधव रोजगारासाठी मुंबई, भिवंडी, ठाणे,नवी मुंबई येथे रोजगाराच्या शोधात दिवाळी नंतर घराबाहेर पडत असतात, दिवाळी झाली की सर्व गावपडे रोजगारासाठी ओस पडतात.
होळीच्या काही दिवस अगोदर पैसे कमावून आदिवासी बांधव जव्हार शहरात दाखल होतात व बाजारात रवा, खोबरं, हरडे, साखर,कपडे खरेदी करतात व आपापल्या गावाला जातात
होळी पर्यंत थंडी असते आणि पुर्वीच्या काळी जास्त कपडे नसल्याने रोज सकाळी आणि संध्याकाळी लोक शेकोटी पेटवून थंडीत दिवस काढत. बरेच आदिवासी बांधव तर रात्रभर शेकोटी जवळ झोपत व सकाळी लवकर उठून जंगलात जात.
फाल्गुन महिन्यात फाल्गुन पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी आदिवासी पाड्यात छोटी होळी साजरी केली जाते
“लहान होळी” म्हणजे सर्व गाव मिळून मोठी शेकोटी म्हणजेच होळी पेटवून आज शेवटची शेकोटी उद्या पासून थंडी झटकून दिवस रात्र काम करायचे आहे असा संदेश दिला जातो. मग रात्री थंडी झूगारून हिंडण्याचा म्हणजे गुपचूप जाऊन लोकांनी बाहेर अंगणात ठेवलेल्या वस्तू, बैलगाडी, टोपली, सुरण, कोंबड्यांची खुराडी उचलुन होळी जवळ जमा करण्याचा खेळ खेळतात.
दुसऱ्या दिवशी फाल्गुन पोर्णिमेला मोठी होळी असते.
या दिवशी होळीची पुजा करतात या होळी साठी प्रत्येक घरातून एक एक मोठे लाकूड आणण्याचा नियम असतो.
नवीन लग्न झालेली जोडपी भक्ति भावाने होळीच्या भोवती फिरवली जातात. नंतर सोंगे घेतलेले नटवे फिरतात ,ढोल-संबळ च्या तालावर नाचकाम केले जाते. काही उत्साही लोक गावकऱ्यांकडून किंवा शहरातुन येणाऱ्या लोकांकडुन रोख रक्कम म्हणजेच फगवा किंवा पोसत मागितली जाते. पोसत न दिल्यास रंग किंवा धुळीचे पाणी अंगावर टाकलं जाते. अत्यंत आनंदात सण साजरा केला जातो होळीचा दुसरा दिवस हा सण म्हणून साजरा केला जातो.
बकरे, कोंबड्या कापून जेवण तयार करून तसेच गावठी दारूची झिंग घेत रात्रभर एन्जॉय केले जाते सकाळी उठल्यावर शेतीसाठी राब केला जातो. शेतीच्या जागेवर पालापाचोळा जाळून शेतीची जमीन भुसभुशीत केली जाते, राब करणे ही आदिवासी भागाची परंपरा आहे. राब केल्याशिवाय पीक चांगले येत नसल्याची आख्यायिका सांगितली जाते.
होळी सण आनंदात साजरा केल्यानंतर आदिवासी बांधव परत कामासाठी मोठ्या शहरात रोजगार निर्मितीसाठी स्थलांतर करतात. परत काही पैसे कमावलेनंतर पुन्हा पावसाळ्यात शेतीसाठी आपल्या गावी हजर होतात.
असे आदिवासी बांधवांचे जीवनमान असून सरकारने रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे, आदिवासी समाजाची परिस्थिती अत्यंत दुर्बल असून आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन दरबारी वाटप होणारा पैशाचे काय होत ते शोधणे गरजेचे आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.