आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

देशाने स्वातंत्र्यानंतर देशांतर्गत व्यक्ती आणि व्यक्तीसमुह किंवा समाजाचा सर्वांगिण विकास घडवुन आणण्याच्या उद्देशाने लोकशाही आणि लिखित राज्यघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न केला. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ग्रामीण आणि शहरी असे दोन प्रकार असले तरी ग्रामपंचायत ही जनतेच्या जास्तीत-जास्त जवळ पोहणणारी आणि ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संबंध जोडणारी किंवा प्रस्थापित करणारी महत्वपुर्ण संस्था आहे.

त्यामुळेच पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणुन ग्रामपंचायतकडे पाहिले जाते.

ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कायद्यांर्तगत झाली असली तरी सन १९९३ च्या ७३ व्या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायतींना संवैधानिक दर्जा प्राप्त झाला. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो आणि तोच ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव म्हणुन तर सरपंच हा ग्रामपंचायतीचा वास्तविक प्रमुख म्हणुन काम पाहतो. गावाचा प्रथम नागरिक आणि ग्रामीण व्यवस्थतेचा वास्तविक प्रमुख म्हणुन गावाच्या विकासाची संपुर्ण जबाबदारी सरपंचाची असते असे मानले जाते. म्हणजेच गावाचा विकास हा आपण निवडुण दिलेला सरपंच किती कार्यक्षम आहे यावरच अवलंबुन असतो.

प्रामुख्याने सांगायचे झाले तर भारत विकसनशील देश असुन तो विकसित होण्याच्या मार्गावर आहे असे गेल्या ७० वर्षापासुन सांगण्यात येत आहे.

पण गेल्या ७० वर्षात आपल्याला विकसित देशाच्या यादीत सहभाग मिळवता आला नाही आणि अजुनही आपण तो दर्जा प्राप्त करु शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडुन ग्रामीण विकासाला तेवढेसे महत्व दिले जात नाही. त्यामुळे जो पर्यंत गावाचा विकास साध्य होत नाही तोपर्यंत विकसित देश ही संकल्पना आपल्याला साध्य करता येणार नाही.

खरे म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान निवडतांना आपण कुठलीही चुक करत नाही त्याचपध्दतीने सरपंचाची निवड करतांनाही आपण तेवढेच प्रयत्नशील असले पाहिजे.

त्यासाठी गावातील योग्य उमेदवाराचीच सरपंच म्हणुन निवड करुन ग्राम कल्याणाला हातभार लावण्याचे परम कर्तव्य गावातील प्रत्येक मतदाराने किंवा नागरिकाने बजावणे महत्वाचे असते.मतदारांनी कोणता उमेदवार शिक्षित आहे,कोणत्या उमेदवाराची वर्तवणुक चांगली आहे,कोण गावासाठी वेळ देऊ शकतो,तो निर्व्यसनी आहे का नाही? या सर्व बाबींची शहानिशा करुनच सरपंचपदाला पात्र असणाऱ्या उमेदवारालाच मतदान द्यावे.

मुळात आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालय असं की, मतदारांना दारु पाजुन, पैसे वाटुन, एखाद्या कामाचे आमिष दाखवून किंवा एखाद्याला अडचणीत सापडल्यावर वेगवेगळे धाक दाखवुन मत मिळविण्याचे गलिच्छ राजकारण गावातील प्रस्थापित घराण्यांनी आणि तथाकथित पुढाऱ्यांनी केले आहे.

म्हणजेच जो दारु वाटतो, ज्याच्याकडे पैसा आहे, सत्ता मिळविण्याची धमक आहे तोच निवडणुकीत विजयी होतो अशीच काहीशी ग्रामीण राजकारणाची परिभाषा बनत चाललेली आहे आणि हाच ग्रामीण विकासाचा मुख्य अडथळा आहे.

यातुन होत असं की, एकीकडे पात्रता नसतांनाही एखादा दिवाळखोर, नालायक, बेजाबदार आणि बेकर्तबगार व्यक्ती गावाच्या सत्तेची सुत्र आपल्या हाती घेतो आणि दुसरीकडे सामान्य जनता गावाच्या कल्याणाची महत्वकांक्षा आपल्या उरात बाळगत असते पण जनतेला किंचतशीही जाणीव नसते की गावातील विकास योजनांची कपाळावर घासण्याऐवढी राख सुध्दा त्यांच्यासाठी उपल्बध नसते. एवढेच काय तर ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेचा भाग मानली जाणारी ग्रामसभा कित्येक गावात फक्त कागदावरच भरवली जाते हे महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या देशाचे विदारक वास्तव आहे.

अनेक गावच्या ग्रामपंचायतीचा विचार केला तर.. ग्रामसभा भरवली जाते, ग्रामसभेत ग्रामसेवकाकडुन विषय सुचीतील ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची आणि करावयाच्या कामाची यादी वाचली जाते, तेवढ्यात एखाद्या प्रश्नावरुन किंवा मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक खडाजंगी होते, विषय सुचीतील कोणत्याच विषयावर चर्चा केली जात नाही, गावाचे प्रश्न जाग्यावरच संपतात आणि ग्रामसभा संपन्न होते.

कित्येक गावांत कचऱ्याचे व्यवस्थापन नाही, शौच्छालयाचा वापर नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, नाल्यांची साफसफाई नाही जणु काही सरपंच निवडुण दिल्यापासुन आपले पाच वर्ष कसे संपतील एवढ्याच बाबीचा विचार करीत बसले आहेत असच वाटत आहे.

या प्रकारे अनेक ग्रामपंचायतींना ह्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या परस्थितीतुन गावांची सुटका करायची असेल तर युवकांनी आता जागं झालं पाहीजे, सर्वांनी एकत्र येवुन उज्वल भविष्याचे आपण स्वतः साक्षिदार होण्यासाठी खुर्चीला गोचीडासारखं चिकटुन बसलेल्या दलालांना त्यांची जागा दाखवुन दिली पाहिजे. आजपर्यंत कित्येक गावांनी फक्त वयस्कर सरपंचच पाहीले आहेत पण आता वेळ बदललेली आहे. एक शिक्षित, उत्साही, सकारात्मक, कार्यक्षम व महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी तरुण सरपंचच गावाचा सर्वांगिण विकास साध्य करु शकतो आणि प्रत्येक गावात अशी दहा-पंधरा तरी युवक असतातच जे कि, सरपंच पदाची पात्रता पुर्ण करु शकतात.

माझ्या मते तोच सरपंच आदर्श सरपंच असतो जो खालील बाबींची पुर्तता करण्यासाठी नेहमीच धडपड करीत असतो.

१) ज्याला गावाच्या प्रश्नांची जाण असते आणि त्या समस्या सोडविण्यासाठी तो सक्षम असतो.

२) जो नेत्यांच्या ताटाखालचा मांजर होत नाही त्यासोबतच भष्ट्राचाराला थारा देत नाही.

३) जो समृध्द आणि स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गावतील कचरा, सांडपाणी, गटार बांधकाम, शौच्छालये यांचे व्यवस्थित नियोजन करतो आणि गावातील रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट सुविधा यांची व्यवस्थितपणे पुर्तता करतो.

४) जो महिला संरक्षण, युवक कल्याण, बाल विकासासोबतच शाळा, दवाखाना, कृषी विभाग यांचा परिपुर्ण अभ्यासकरुन त्यासंबंधीच्या योग्य त्या सुविधा आणण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्याबद्दल समाजात जनजागृती करतो.

५) जो खेळाचे मैदान, बगीच्या, ग्रंथालयाची निर्मिती, लघुउद्योगाला मार्गदर्शन आणि आर्थिक मदत पुरविणे, युवकांना व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शन देणे इ.कार्य करु शकतो.

एकंदरीत आदर्श ग्रामपंचायत घडविण्यासाठी योग्य आणि आदर्श सरपंचाची निवड हा एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे असे मी मानतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here