आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

शेतकऱ्यांना कर्जमाफी व आर्थिक मदत मिळाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी भाजप सोबत सत्तेत सहभागी होऊन मागची संपुर्ण पाच वर्ष सरकार विरोधी भुमिका घेणारी शिवसेना. जणू काही शेतकरी कल्याणासाठीच जन्माला आली आहे असाच आव आणत होती. मधल्या काळात काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर किमान समान कार्यक्रमाच्या नावाखाली वेगवेगळ्या विचारधारेच्या तीन राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली.

यात झालं असं की, भाजप सोडून सर्वांनाच त्याचा फायदा झाला म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्री पद तेही पाच वर्षासाठी मिळाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला लांब-लांबवर सत्ता स्थापन करण्याची संधी नसतांना, जनतेचा तसा कौल नसतांना थेट सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

असो… पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने जनतेला भावनिक करत नेहमी एकच भुमिका घेतली होती ती म्हणजे शेतकरी हित… शेतकरी हित… आणि शेतकरी हित!

मग काय त्यांना सत्तेवर आल्यानंतर अजेंड्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घाई-घाईतच घ्यावा लागला. लोकांना वाटलं निवडणूकीत किंवा मुळ म्हणजे जाहीरनाम्यात यांचीच मागणी होती की संपुर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, म्हणजे मिळालेली कर्जमाफी ही संपुर्ण कर्जमाफी असेल. पण नंतर कळालं की, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी झाली आहे आणि जेंव्हा शासन निर्णय समोर आला तेंव्हा तर शेतकऱ्यांना धक्काच बसला.

शासन निर्णयानुसार त्या कर्जमाफीचं स्वरुप पुर्णपणेच बदलल्याचं दिसुन आलं कारण त्यानुसार फक्त दोन लाखाखालील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार होता.

म्हणजेच दोन लाखावरील लोकांना त्याचा फायदा होणार नव्हता. आता घोषणेप्रमाणे आणि कोरोना संपल्यानंतर कोणा-कोणाला कसा आणि किती फायदा मिळेल यावरुन ठरणार आहे की, ही कर्जमाफी खरी आहे की हाही अगोदरच्या भाजप सरकार सारखा फसव्या कर्जमाफीचा फुसका बार आहे. कदाचित समजा या योजनेचा फायदा मिळाला तर दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच काय? हाही एक प्रश्न सरकार समोर नव्याने उभा राहतोच.

अर्धवटच का होईना कर्जमाफीचं झालं पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तेंव्हा राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८,००० रु. ची नुकसान भरपाई तुटपुंजी असुन, शेतकऱ्यांना हेक्टरी २५,००० रु. ची मदत केली जावी या मागणीसाठी अख्या महाराष्ट्रभर बंद, मोर्चे, आंदोलने करणारी शिवसेना किंवा त्यांचेच मंत्री असणारे मा. एकनाथरावजी शिंदे साहेब हेक्टरी २५,००० रु. मदत मिळणार, आमचे सरकार ती देणार असे मोठ्या दिमाखात सांगत होते. पण आज मात्र त्यांना या गोष्टीचा पुर्णपणे विसर पडल्याचे दिसुन येत आहे.

एवढच काय तर राज्यपालांनी जाहीर केलेली तातडीची मदत कित्येक महिने शेतकऱ्यांना निधी अभावी मिळु शकलेली नाही.

आजही कोरोनाचा परिणाम म्हणुन जिल्हा मध्यवर्ती बँकांनी कित्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक टंचाई जाणवत आहे. त्यामुळे फक्त हीच मदत शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहचेल यासाठी जिल्हा बँकांनी नियोजन आखावे किंवा त्यासाठीच प्रयत्नशील राहावे. सरकारच्या हेक्टरी २५ हजार रु. मदतीची अपेक्षा आता शेतकरी करत नाही कारण तुम्ही मागच्या सरकारच्या पावलावर पाऊल टाकत जनतेचा आणि शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

एकंदरीत मागच्या सरकारच्या शेतकरी विरोधी आणि वादग्रस्त बाबींच्या भुमिकेवरील नाराजीतुन काँग्रेस-राष्ट्रवादीला थोड्याफार जागांचा फायदा झाला हे वास्तव आहे पण असे असले तरी जनतेचा कौल हा भाजप-शिवसेनेच्याच बाजुने होता.

तरीही निर्माण झालेल्या परस्थितीतुन महाविकास आघाडी सरकारला जनसामान्यांनी स्वीकारले. कदाचित जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना महाविकासआघाडी सरकार कडून अपेक्षा होत्या सर्वसाधारणपणे जनतेची तशी भावना सुध्दा बनली होती. काही प्रमाणात चांगले निर्णय राज्यात घेतले गेले असतील, घेतले जातही असतील पण एक शेतकरी पुत्र म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे की, शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर न करता महाविकास आघाडी सरकार सर्वात मोठ्या शेतकरी वर्गावर लक्ष द्यायला तयार नाही.

कारण अजुन शेतकरी बांधवांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली गेली नाही, हमी भावा संबंधी कुठलाही ठोस निर्णय झाला नाही, नुकसान भरपाई म्हणुन सरकार कडून कुठलीही आर्थिक मदत केली गेली नाही, संपुर्ण कर्जमाफीचा निर्णय झाला नाही, वीज पुरवठ्या संबंधी असलेलं वेळापत्रक सुध्दा बदललं गेलं नाही माझ्या शेतकरी बांधवांची परिस्थिती जशेच्या-तशीच आहे असे असतांना सरकार मात्र कोरोना ह्या संकटाच्या आडून शेतकरी हिताकडे कानाडोळा करत आहे. पण सरकार जरी झोपेचं सोंग घेत असलं तरी आजचा शेतकरी हा आधुनिक आणि जागा झालेला शेतकरी आहे. त्यामुळे सरकारने वेळीच शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा राज्य सरकारची झोप उडविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here