आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मराठा साम्राज्याचे तिसरे लढवय्या छत्रपती: राजाराम महाराज!

 

१६८६ साली आदिलशाही आणि १६८७ साली कुतुबशाही बुडवल्या नंतर आत्ता दक्षिणेत एकमेव औरंगजेबास आव्हान णारी सत्ता होती ती म्हणजे मराठा !

 

औरंगजेबाने आपले पूर्ण लक्ष आत्ता , मराठ्यांची राजधानी रायगड ह्याकडे वळवले , त्यासाठी त्याने आपला सेनापती इतिकाद खान जो स्वतः वजीर असदखान ह्याचा पुत्र होता आणि खुद्द बादशहाचा मावसभाऊ पण होता ह्यास नियुक्त केले . पुढे रायगड काबीज केल्यावर त्याला बादशहाने जुल्फिकार ही पदवी दिली आणि ह्याच नावाने तो इतिहासात प्रसिद्ध पावला.

 

 

बदलेल्या परिस्थितीत राजाराम महाराजांनी रायगडास सोडून जावे जाताना , आपल्या निवडक साथीदारास घेऊन जावे . ज्यात प्रल्हाद निराजी, धनाजी जाधव व संताजी घोरपडे आणि दोन राण्या ताराबाई आणि राजसबाई ह्यांना घेऊन जावे . असे ठरले.

 

स्वतः येसूबाई आणि बाळ शाहू राजे रायगडावर थांबले. ते का थांबले ? ह्याचे उत्तर देताना येसूबाई म्हणतात ,

” मुलास बाहेर जाऊन राहावे यास जवळ जागा रायगडाहून बाकी ऐसी दुसरी नाहीच . त्याअर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे . तुम्ही सर्वांनी राजरामसाहेबांसह वर्तमान बाहेर पडून , फौज जमा करून , प्रांताचा बंदोबस्त राखिला असता , हा किल्ला बेलाग वर्ष सहा महिने टिकाव पडेल !! शत्रूचे प्राबल्य विशेष त्याअर्थी चंदी – चंदावर प्रांती दम खाऊन पुन्हा मसलत करून राज्य साधावे , सर्व कुटुंब एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे ऐसें होईल . पल्ला पोहोचणार नाही ” — (थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र , पृ. २-३ )

 

 

ह्याचा अर्थ संपूर्ण राजकुटंब शत्रूस सापडणे धोक्याचे होते . राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून , फौज फाटा जमा करावा , आणि योग्य वेळ साधताच पुन्हा उभारी घ्यावी . तोवर वर्ष सहा महिने आपण रायगड लढवू हा विश्वास येसूबाई देतात . जिंजी किल्ल्याचा आश्रय घेण्यासाठी सुद्धा त्या सांगतात.

 

ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट आहे . राजाराम महाराजांच्या जडघडणीत सुरुवातीचा जो पाठिंबा आहे तो निर्विवादपणे येसूबाई यांचा दिसतो. कारभारी , सल्लागार यांचा वाटा महत्त्वाचा तर आहेच पण , प्रसंगी स्वतः शत्रूस तोंड देऊन स्वराज्य आणि स्वराज्याचे छत्रपती शाबूत ठेवण्याचे श्रेय येसूबाई यांनाच जाते.

 

 

स्वतः राजाराम महाराज रायगडावरून निसटून , पाहिले प्रतापगडस आले . प्रतापगडाच्या पायथ्याशी मोघलांशी छोटी लढाई झाल्याची नोंद आढळते . परिस्थिती बिकट बनल्यानंतर प्रतापगड सोडून , विशाळगड आणि शेवटी पन्हाळा इथे पोहोचून जिंजीच्या प्रवासाची तयारी राजाराम महाराजांनी पूर्ण केली . बादशहाचे सरदार पन्हाळ्यास एव्हाना वेढा घालून बसले होतेच . त्याची तजवीज औरंगाबजेबाने आधीच केली होती .

 

मराठ्यांचा नवा राजा दक्षिणेत पळून जाण्याचा तयारीत असल्याचे त्याने दक्षिणेकडील सर्व मोघल ठाणेदार , किल्लेदार यांना कळवले होते त्या कामी चौकी पहारे अधिक कडक करण्यासंबंधी तंबी देखील दिली होती . याकामी किनारपट्टीच्या भागावर मोघलांनी पोर्तुगीजांची मदत देखील घेतली होती . बेळगाव चा बहादुरखान ह्याने पोर्तुगीज व्हाईसरॉय ला पत्र लिहून किनारपट्टी अधिक सतर्क ठेवण्याबद्दल पत्र लिहले होते. थोडक्यात सांगायचे तर , शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा परतीचा प्रवास जसा जोखिमांनी भरून होता . तसाच प्रवास त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी सुद्धा केला .

 

 

या समयी राजाराम महाराजांच्या सोबत कोण कोण होते ?? ह्याबद्दल अधिक माहिती आपल्याला केशव पंडित देतो त्याने राजाराम महारांजाच्या ह्या जिंजी प्रवासावर एक छोटेखानी काव्यच रचले आहे . त्याने राजाराम महाराजांच्या सोबती लोकांची नावे सांगितली आहेत ती , म्हणजे मानसिंग मोरे , प्रल्हाद निराजी , कृष्णाजी अनंत , मोरेश्वर त्याचा भाऊ बहिरो मोरेश्वर , चित्रगुप्त कायस्थ , बाजी कदम , खंडोजी कदम , नीलकंठकृष्ण , गिरजोजी यादव , खंडोजी दाभाडे नरसिंह पंडित आचार्य , तिमाजी रघुनाथ हणमंते व कान्होजी आंग्रे ह्या वरील दिग्गज नावांवरून हा अंदाज बांधणे सहज शक्य आहे की , मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपतींना जिंजी ला राजधानी स्थापन करून  बादशहास शह द्यायचा होता. ज्यात ते प्रचंड यशस्वी झाले.

 

थरारक प्रवास सुरू झाल्यावर त्यांनी वाटेत बेदनुरच्या राणीचे चेन्नम्माचे साह्य घेतले हे राजाराम महाराजांच्या धोरणीपणाचे किती मोठे उदाहरण होते . तुंगभद्रा नदीच्या किनारी मोगलांशी राजाराम महाराजांचा आणखी एक संघर्ष उडाला त्यातूनही , राजाराम महाराज सुखरूप बाहेर पडले. आणि त्यांनी जिंजी गाठली.

 

एकीकडे जिंजी किल्ल्याची परिस्थिती देखील सामान्य नव्हती तिथे शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडिक यांची ती जहागीरच झाली होती . एव्हाना ते स्वर्गवासी जाऊन बराच कालावधी उलटला होता . आणि त्यांची पत्नी अर्थात शिवाजी महाराजांची मुलगी आणि राजाराम महाराजांची बहीण अंबिकाराजे हिच्या ताब्यात जिंजी किल्ला होता . राजाराम महाराज वेल्लोर ला पोहोचल्यानंतर त्यांनी दूत पाठवून आपल्या बहिणीला जिंजी किल्ला आपल्या ताब्यात देण्याविषयी निरोप धाडला पण, हाती असलेली संपत्ती, सत्ता व मुलुख अंबिकाबाईस सोडवेना . एवढेच नव्हे तर , जिंजीच्या किल्ल्यासाठी तिने राजाराम महाराजांसोबत लढण्याची देखील तयारी सुरू केली.

 

 

शेवटी तिच्याच सैन्यातील अधिकारारी वर्गाने तिचे मतपरिवर्तन करून तिला ह्या अविचारापासून परावृत्त केले . राजाराम महाराज स्वतः दक्षिणेत आल्यामुळे दक्षिणेतील मराठी सरदार , मुलकी अधिकारी यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचलून धरला त्यामुळे अंबिकाराजे ह्यांना माघार घ्यावी लागली असणार हे निश्चित आहे.

 

तरी सुद्धा स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतीस मुघलांबरोबर स्वकीय अगदी स्वतःच्या बहिणीबरोबर देखील संघर्ष करावा लागला त्यावरून त्यावेळसच्या बिकट परिस्थितीचा आपणास अंदाज येईल .

 

इकडे रायगड कित्येक महिने लढत लढत शेवटी , परिस्थिती बिकट झाल्यानंतर अधिक मानहानी व मनुष्यहानी होऊ नये म्हणून महाराणी येसूबाई यांनी अब्रू व जीवितास धोका उत्पन्न होऊ नये ह्या अटी शर्थीवर तो वाटाघाटी करून शत्रूच्या ताब्यात देण्याचे निश्चित केले . या कामी मल्हार रामराव व सूर्याजी पिसाळ जो , संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वीच मोघलांना वाई च्या सुभेदाराच्या अमिषात जाऊन मिळाला होता , याची मध्यस्थी कामी आली .

 

आणि राज परिवार बादशहाच्या छावणीत सन्मानाने नजरकैद झाला . त्यांच्या सोबत संभाजी महाराजांचा विश्वासू सहकारी ज्योत्याजी केसरकर होता अशी नोंद आहे . बादशहाने राजपरिवरची गुललालबार या शाही निवासस्थानी सोय केली व शाहू राजास सप्तहजारी मनसब दिला व त्यांच्या सरंजाम आणि शिक्षणासाठी खास अधिकारांची नियुक्ती केली ह्या नोंदी मल्हार रामराव ह्याने केल्या आहेत

 

जिंजी चा वेढा आणि राजाराम महाराजांची मुत्सद्देगिरी

 

राजाराम महाराज जिंजी ला स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी आजूबाजूच्या इंग्रज , डच आणि फ्रेंच यांना सक्तीचे नजराणे पाठविण्याचे हुकम सोडले . एक प्रकारची ती खंडणीच होती . राज्य आर्थिक दृष्ट्या बिकट अवस्थेमध्ये होते . त्यांची बहीण अंबिकाराजे यांच्या कडून देखील त्यांनी दीड लाख होन वसूल केल्याची नोंद आहे .

 

कर्नाटकात मूळ रहिवाशी याच्चपा नाईक हा मुघलांचा शत्रू झाला होता . त्याला महाराजांनी मैत्रीचा प्रस्ताव पाठवून त्यास सोबत घेतले व मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य वाढवले .

 

जिंजी मध्ये येण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यकारभारचा भार अमात्य रामचंद्रपंत आणि शंकराजी नारायण ह्या कारभाऱ्यांवर सोपवला त्यांच्या खाली संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नियुक्त्या केल्या व महाराष्ट्राची व्यवस्था लावून ते जिंजीस रवाना झाले हे विशेष !!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here