आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

पर्यावरणातील सर्वात मोठी समस्या… निर्वनीकरण!

 

पर्यावरण ही अतिशय व्यापक, सर्वसमावेशक आणि गुंतागुंतीची संकल्पना आहे. पण साधारणपणे सजीवांची निर्मिती, वाढ व नाश ह्या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव या सर्वच घटकांची गरज असते.

 

new google

या सर्वघटकांना एकत्रितपणे पर्यावरण असे म्हटले जाते. मानवाच्या विकासाचा विचार केला, तर तो निसर्गावर आणि पर्यायाने पर्यावरणावरच अवलंबुन असतो. त्यामुळे सहाजिकच निसर्गात मानवी हस्तक्षेप होत असतो.

 

पण मानसाने अतिहव्यासापोटी अविचारी आणि अतिरेकी वृत्तीने माती, पाणी, खनिजे, साधनसंपत्ती, पशु-पक्षी आणि वनस्पती इ.सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात आपला हस्तक्षेप करत ह्या नैसर्गिक घटकांचा भयंकर नाश केला.

 

औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली पर्यावरणाची होणारी हेळसांड याचे जागतिक स्तरावर गंभीर पडसाद उमटले. जागतिक आरोग्यासोबत, प्रदुषण, पुर, दुष्काळ आणि निर्वनीकरणासारख्या असंख्य समस्या निर्माण झाल्या. त्यामुळेच पर्यावरणाचा अभ्यास करणं गरजेचं वाटु लागलं ही गरज लक्षात घेता पुढे १९५० नंतर पर्यावरण किंवा पर्यावरण शास्त्र हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय म्हणुन समोर आला.

 

जेंव्हा प्रदुषणाचे दुष्परिणाम समोर आले तेंव्हा म्हणजे ५ जुन १९७२ रोजी स्टॉकहोम(स्वीडन) या शहरात पर्यावरणविषयक समस्यांचा ऊहापोह करण्यात आला या कार्याची दखल आणि आपल्याला पर्यावरणाचा समोतल राखण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे, याची जाणिव होत राहावी या उद्देशाने तेंव्हापासुन आपण दरवर्षी ५ जुन हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन ‘ म्हणुन साजरा करतो.

 

आज घडीला पर्यावरण समस्यांमध्ये प्रामुख्याने प्रदुषण, पुर, दुष्काळ व निर्वनीकरण इ. समस्यांचा विचार केला जातो. यांमधीलच निर्वनीकरण ही समस्या अतिशय महत्वाची समस्या म्हणुन ओळखली जाते.

 

भारतासहीत संपुर्ण जगात सतत व वेगाने होणारी वृक्षतोड म्हणजेच पर्यायाने मानवाने स्वतःवर ओढवुन घेतलेली आणीबाणीच होय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण औद्योगिक क्रांतीतुन नैसर्गिक साधनसंपत्तीच्या होणाऱ्या अतिवापराचा दुष्परिणाम हा निसर्ग मानवालाच भोगायला लावणार आहे, काही अंशी तो आपण भोगतोय सुध्दा हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वृक्षतोडीमुळे किती प्रदेशात आता निर्वनीकरण झालं आहे त्याचे प्रमाण खालीलप्रमाणे सांगता येते.

 

पर्यावरण
SOURCE-AICHE

 

१९८७ मध्ये यू. एन. ए च्या खाद्य व शेती आयोगाने केलेल्या अंदाजानुसार १९८०-८५ च्या काळात ७१ दशलक्ष हेक्टर वनांची तोड झाल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ वर्षास १४.२ दशलक्ष हेक्टर वनांची तोड होते. या शिवाय १९८७ साली उपग्रहांनी घेतलेल्या भूछायाचित्रणांवरुन ब्राझीलमध्ये २,०४,००० कि. मी. प्रदेशात निर्वनीकरण झाल्याचे आढळते.

 

भारतातही परिस्थिती फार वेगळी नाही. भारतात आज केवळ ७ टक्के घनदाट अरण्य आहेत. १९९५-९७ या काळात आच्छादन ६३.८९ दशलक्ष हेक्टर वरुन ६३.३४ दशलक्ष हेक्टर वर आले आहे. उपग्रहांच्या छायाचित्रावरुन १९७२-७५ व १९८०-८२ या दोन कालावधीत आपल्या देशात प्रतिवर्षी १.३ दशलक्ष हेक्टर नैसर्गिक वनाचा नाश झाला आहे. (संदर्भ :- विद्यापीठाच्या पदवी शिक्षणक्रमातील पर्यावरण अभ्यास विषय पान क्र. ६३)

 

निर्वनीकरणाचे प्रमाण कीती विदारक किंवा भयंकर आहे हे वरील आकडेवारी वरुन दिसुन येते. जगात प्रतिवर्षी १४.२ दशलक्ष हेक्टर जमिनीवरील आणि भारतात १.३ दशलक्ष हेक्टर जमिनीवरील झाडांची कत्तल केली जाते.

 

एवढ्या प्रमाणात जर झाडांची तोड होत असेल तर भविष्यात संपुर्ण जगाचं वाळवंट व्हायला वेळच लागणार नाही. मुळात दशलक्ष हेक्टर मधला हा आकडा सर्वसामान्य पर्यावरण प्रेमी जनतेची झोप उडवणाराच आहे आणि त्यामुळेच आज निसर्गात किंवा पर्यावरणात होत असलेले वाईट परिणाम हे केवळ निर्वनीकरणाचाच एक भाग आहे.

 

निर्वनीकरणामुळे अनेक दुष्परिणाम होतांना दिसुन येत आहे. म्हणजेच नैसर्गिक क्षेत्रात मोठे चढ-उतार झाले आहेत. निसर्गावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय पुर्णत: खिळखिळा झाला आहे. जणू काही नैसर्गिक आपत्ती हा शेतकरी जीवनातला अविभाज्य घटकच बनला आहे.

 

हवामान चक्रात दरवर्षी बदल होत आहे. कधीच्या कधी पाऊस पडतो आहे तर पावसाळ्यात उन्हाळा सुरू झाला की काय? असंच वाटतं आहे, खरं तर मानवापेक्षा इतर जिवांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

 

म्हणजेच निसर्गात विविधता आढळते तेंव्हा त्या-त्या प्रदेशात ते-ते सूक्ष्मजीव, कीटक, सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, पक्षी व वनस्पती आढळत असतात असं असताना जंगलात राहणारे हे जीव जंगलं नाहीशी झाल्यावर जगु शकत नाहीत.

 

त्यामुळे आणखीनच पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे, झाडांची कत्तल झाल्याने जो प्रदेश मोकळा पडतो अशा ठिकाणीची माती उघडी पडते त्यामुळे वेगाने जमिनीची धूप होऊन प्रदेश निरुपयोगी बनत चालला आहे. सोबतच निर्वनीकरण मुळे पुर व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

आजच्या आधुनिक काळात आपल्याला जगाला मोठ्या नैसर्गिक आपत्ती पासुन वाचवायचे असेल तर भविष्यात निर्वनीकरणावर नवनविन उपाययोजना आखणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज घडीला सर्वात रामबाग आणि एकमेव उपाय म्हणजे सामाजिक वनीकरण हाच आहे.

 

प्रामुख्याने सामाजिक वनीकरण म्हणजे समाजाने पर्यायाने लोकांनी स्वतःसाठीच वने किंवा झाडे वाढवणे होय. मग आता सामाजिक वनीकरण कुठे करतात? त्या जागा कोणत्या आहेत ते आपण खालीलप्रमाणे सांगु शकतो.

 

१) आपल्या शेतजमिनीच्या बांधावर आणि एखाद्या कोपऱ्यात पण झाडं लावु शकतो.

२) गावकीच्या गायरानात, जमिनीची धुप होते अशा भागात आणि शेतीसाठी निरुपयोगी असणाऱ्या जमिनीत.

३) नद्या, ओढे, नाल्या, धरणं आणि कालव्यांच्या अवती भोवती परिसरात.

४) रस्त्याच्या किंवा लोहमार्गाच्या दोन्ही बाजुने आपण झाडं लावु शकतो.

५) देवी, देवतांसाठी सोडलेल्या जमिनीवरील कालांतराने नष्ट झालेल्या देवराई पुन्हा नव्याने निर्माण करु शकतो.

 

एकंदरीत मानवी जीवन हे सभोवतालच्या परिसरावर किंवा पर्यावरणावरच अवलंबुन आहे. त्यामुळे त्याचा समतोल राखण्याची जबाबदारी आपली आहे. कशाच्याही निमित्ताने का होईना पण झाडं लावण्यासाठी आणि ती जगविण्यासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे. तरच उद्याचा हिरवागार आणि सौंदर्याने नटलेला निसर्गरम्य भारत जगासमोर पर्यावरणाच्या दृष्टीने आदर्श देश म्हणुन समोर येईल.

 

भारताकडे पाहुन जगही या बदलांकडे आकर्षिला जाईल त्यातुनच आपण आजची निर्वनीकरणासारखी पर्यावरणाच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील सर्वात मोठी आणि महाभयंकर समस्या संपुष्टात आणु शकतो, असे मला वाटते.

लेखक– वैभव उत्तम जाधव
 एम.ए (राज्यशास्त्र)

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here