आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

…म्हणून छत्रपतींनी बहिर्जी नाईकांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केले होते!


 

मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगत असलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्य निर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.

बहिर्जी नाईक
बहिर्जी नाईक

बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशयजरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.

शिवाजी राजेंच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्‍यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हटले जाते की, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची.

 बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते.

कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहिती ते ठेवत.

शिवाजी राजे व संभाजी राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाचा बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इथंभूत माहिती महाराजांना दिली होती. बर्‍याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.

बहुरूपी हेर 'बहिर्जी नाईक' यांना ...

सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले.. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले.. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.

महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धान्त मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धान्त कौटिल्य मांडतो.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्याद्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्‍न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो.

शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.

२१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिला म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपाशी आहे ना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here