आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
राम मंदिर आंदोलनामध्ये सिंहाचा वाटा असणारे प्रखर हिंदुत्ववादी नेते.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येवरील निकाल जाहीर केला या निकालामध्ये, बाबरी मस्जिद असलेल्या त्या जागेचा ताबा राम मंदिरास देण्याचा निर्णय घेतला. गेले अनेक वर्षे चालू असलेल्या या आंदोलनामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी आपले योगदान दिले आहे.
राम मंदिर आंदोलनामध्ये सामील असणाऱ्या नेत्यांमध्ये मुख्यतः लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, प्रवीण तोगड़िया आणीविष्णु हरि डालमिया हे प्रमुख होते. राम मंदिर बनवण्याच्या संघार्षामध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या या ज्वलंत हिंदुत्ववादी
नेतृत्वाबद्दल वाचा सविस्तर……
१ ) अशोक सिंघल

राम मंदिर निर्माण आंदोलानासाठी लोकांना एकत्रित करण्यामध्ये अशोक सिंघल यांचे महत्वपूर्ण योगदान होते. काही लोक तर त्यांना राम मंदिर आंदोलनाचे चीफ़ आर्किटेक्ट म्हणून ओळखत असत. १९४८ मध्ये विधानभवन दिल्ली येथे धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते, अशोक सिंघल हे या धर्म संसदेचे मुख्य संचालक होते.
या संसदेमधेच रामजन्मभूमी आंदोलनाच्या रणनीती ठरविण्यात आल्या होत्या. येथूनच सिंघल यांनी कार सेवकांना आपल्या संपूर्ण योजनेशी जोडण्यास सुरुवात केली होती. त्यांनी देशभरातून ५० हजार कारसेवक गोळा केले. सर्व कारसेवकांनी देशाच्या प्रमुख आणि पवित्र नद्यांच्या काठावर राम जन्मस्थळावर राम मंदिर स्थापित करण्याचा प्रण घेतला होता.
१९९२ मध्ये वादग्रस्त संरचनेची मोडतोड करणार्या कारसेवकांचे नेतृत्व अशोक सिंघल यांनीच केले होते. २०११ पर्यंत ते व्हीएचपीचे अध्यक्ष राहिले होते. त्यानंतर आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचे निधन झाले.
२ ) लालकृष्ण आडवाणी
लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या पर्यंत रथयात्रेला प्रारंभ केला होता. परंतु बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांना समस्तीपूर जिल्ह्यातच अटक केली. आरोपपत्रानुसार ६ डिसेंबर १९९२ रोजी अडवाणी म्हणाले होते, आज कारसेवाचा शेवटचा दिवस आहे. या यात्रेनंतर अडवाणींचे राजकीय वजन अधिकच वाढले होते.
१९९० च्या रथयात्रेने लालकृष्ण अडवाणी यांची लोकप्रियता अधिकच वाढली. १९९२ मध्ये बाबरी मशिदी पाडल्यानंतर ज्या लोकांवर आरोप आहेत त्यांच्यामध्ये अडवाणी यांचे नाव पण सामील आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी तीन वेळा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच अडवाणी हे चार वेळा राज्यसभा आणी पाच वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत.
३ ) मुरली मनोहर जोशी

१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी मुरली मनोहर जोशी हे अडवाणी नंतरचे दुसरे मोठे नेते होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी त्या घटनेच्या वेळी मुरली मनोहर जोशी हे वादग्रस्त जागेवर उपस्थित होते. घुमट कोसळल्यावर उमा भारती यांनी त्यांना आलिंगन दिले होते. मुरली मनोहर जोशी हे वाराणसी, अलाहाबाद आणि कानपूरचे खासदार राहिले आहेत. ते सध्या भाजपच्या मार्गदर्शक मंडळामध्ये आहेत. त्यांना पद्म विभूषण हा अत्यंत मनाचा पुरस्कारही मिळाला आहे.
४ ) कल्याण सिंह

६ डिसेंबर १९९२ रोजी कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर पोलिस आणि प्रशासनाने कारसेवकांना मुद्दामहून न रोखण्याचा आरोप आहे. कल्याण सिंह यांनी भाजपपासून विलग होऊन नॅशनल रेव्होल्यूशन पार्टी ची स्थापन केली होती. परंतु काही कालांतरानेच ते पुन्हा भाजपमध्ये परतले. बाबरी मशीद पाडण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप असलेल्या १३ लोकांमध्ये कल्याण सिंह यांचेही नाव सामील होते.
बाबरी मशीद पाडल्यानंतर आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कल्याण सिंह यांची ९ सप्टेंबर २०१४ रोजी राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारी २०१५ मध्ये त्यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
५ ) विनय कटियार
१९८४ मध्ये राम मंदिर चळवळीसाठी ‘बजरंग दल’ ची स्थापना केली गेली होती. आरएसएसने बजरंग दलाचे पहिले अध्यक्ष म्हणून विनय कटियार यांना निवडले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीच रामजन्मभूमी आंदोलन अधिक आक्रमक केले होते.
६ डिसेंबर १९९२ नंतर कटियार यांचा राजकीय दबदबा झपाट्याने वाढला होता. विनय कटियार हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसहि झाले होते. कटियार हे तीन वेळा फैजाबाद (अयोध्या) लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.
६ ) साध्वी ऋतंभरा

साध्वी ऋतंभरा ह्या एकेकाळी हिंदुत्ववादी ज्वलंत नेतृत्व म्हणून प्रसिध्द होत्या. बाबरी मशीद प्रकरणामध्ये साध्वी ऋतंभरा यांच्यावर अपराधिक षडयंत्र रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यावेळी बाबरी मशिदीचा विध्वंस झाला त्यावेळी साध्वी साध्वी ऋतंभरा यांच्या अतिशय उग्र भाषणाच्या कैसेट संपूर्ण देशभरात ऐकण्यास मिळत होत्या.
आपल्या प्रत्येक भाषणामध्ये साध्वी विरोधकांना ‘बाबर की आलौद‘ म्हणून संबोधत.
१९९०च्या दशकात विश्व हिंदू परिषद संचालित “श्री राम जन्मभूमी मुक्ति आंदोलन” चा ज्वलंत चेहरा म्हणून साध्वी ऋतंभरा यांची ओळख निर्माण झाली होती. राममंदिर आंदोलनाच्या यशासाठी त्यांनी संपूर्ण भारतातील हिंदू समाजातील विविध जातींना एकत्रित केले. यामुळेच हे आंदोलन सफल होऊन अयोध्येत श्री रामलला यांच्या जन्मस्थळावर भव्य मंदिर बांधण्याचे हक्क मिळाले आहेत.
७ ) उमा भारती
राम मंदिर आंदोलनादरम्यान एक स्त्री चेहरा म्हणून उमा भारती यांची ओळख निर्माण झाली. बाबरी विध्वंसात लिब्रहान कमिशनला त्या दोषी आढळून आल्या होत्या. उमा भारती यांच्यावर जमाव भडकवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता , परंतु उमा भारती यांनी ते आरोप फेटाळून लावले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आणी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्या मंत्री राहिल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी स्वतःला दूरच ठेवले होते.
८ ) डॉ.प्रवीण तोगडिया

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया हे राम मंदिर आंदोलनाच्या वेळी खूप सक्रिय होते. अशोक सिंघल नंतर विश्व हिंदू परिषदेची सर्व सूत्रे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. १९६९ मध्ये ते केवळ २२ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांचे मुख्य मार्गदर्शक म्हणून निवडले गेले.
डॉ.प्रवीण तोगडिया हे त्यांच्या चिथावणीखोर आणी ज्वलंत भाषणांसाठी ओळखले जात. हिंदू धर्माच्या व्याख्येचे अचूक वर्णन ते उदाहरणांसह देतात. काही दिवसांपूर्वीच ते विश्व हिंदू परिषदेपासून विभक्त झाले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाची एक संस्था स्थापन केली आहे. डॉ.प्रवीण तोगडिया हे एक प्रख्यात कर्करोग सर्जन आहेत.
९ ) विष्णु हरि डालमिया
विष्णू हरी डालमिया हे प्रसिध्द उद्योगपती आणी विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ सदस्य होते. त्यांनी संघटनेत बरीच पदे भूषवली होती. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विष्णु हरि डालमिया हे सहआरोपी होते.
१६ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीतील गोल्फ लिंक येथील निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दालमिया हे त्यांच्या जीवनाच्या अंतिम काळात श्री राम जन्मभूमी न्यासाचे विश्वस्त आणि विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य होते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा: बाबरी मशीदीखाली मंदिर असल्याचा दावा सर्वप्रथम या एका मुस्लीम पुरातत्वशास्त्रज्ञाने केला होता…!