आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

भारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा एनकाउंटर करणारे आयपीएस के. विजय कुमार यांच्याबद्दल सविस्तर…….


देशाच्या विकासामध्ये जेवढे योगदान राजकारणी, नेता, मंत्री मंडळींचे असते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त योगदान हे त्या देशाच्या सरकारी अधिकाऱ्यांचे असते. एक सफल राजनेता तर कोणीही होऊ शकते परंतु , एक सफल आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी किती कठोर परिश्रम घ्यावे लागते हे त्या अधिकार्यालाच माहित असते.

ज्या देशातील नोकरशाहीची स्थिती चांगली असेल त्या देशात कायदा आणि सुव्यवस्था कायमच सुरळीत राहते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात  भ्रष्टाचाराची किड नोकरशाही वर्गाला पोकळ करत आहे त्यामुळे लोकांचा विश्वास या यंत्रनेवर दिवसेंदिवस कमी होत आहे.

याविरुध्द आपल्या देशात आजही अशे काही आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या नितीमत्तेला आणि विश्वासार्हतेला एकही डाग लागू दिला नाही. म्हणूनच त्यांनी केलेले कारनामे आजच्या पिढीपुढे एक उत्तम उदाहरण म्हणून सादर केले जात आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये एक नाव आहे कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनला यमसदनी पाठवणारे आयपीएस अधिकारी विजय कुमार यांचे. आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया विजय कुमार यांच्याबद्दल सविस्तर…

आयपीएस विजय कुमार:

वीरप्पन
ips vijay kumar-yuvakatta

भारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा एनकाउंटर करणारे आयपीएस के. विजय कुमार यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० रोजी झाला होता. त्यांचे वडील कृष्णन नायर हे निवृत्त पोलिस अधिकारी आणि त्यांची आई कौशल्या ही गृहिणी होती. के. विजय कुमार यांनी तिरुचिरापल्लीच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून पदवी आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासूनच आपल्या वडिलांपासून प्रेरित होऊन त्यांची आयपीएस होण्याचे इच्छा होती. १९७५ साली तामिळनाडू केडरमध्ये आयपीएस झाल्यानंतर त्यांची नियुक्ती स्पेशल सिक्युरिटी ग्रुपमध्ये करण्यात आली. त्याच वेळी विरप्पनने
संपूर्ण दक्षिण भारतात धुमाकूळ माजवला होता. त्यामुळेच स्पेशल टास्क फोर्समध्ये तैनात असताना के. विजय कुमार यांच्यावर कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनला मारण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती.

वीरप्पन

एका मुलाखतीत विजय कुमार यांनी सांगितले की वीरप्पनला ठार मारण्याचे वेड त्यांच्या डोक्यामध्ये अशा रीतीने
भरले होते कि, त्यांनी वीरप्पनला जोपर्यंत आपल्या हाताने मारत नाही तोपर्यंत आपण केस कापणार नाही अशी प्रतिज्ञा बन्नरी अम्मन मंदिरात घेतली होती. विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार ते १९९४ मध्ये प्रथमच वीरप्पनच्या शोधात गेले होते. २००१ मध्ये ते सहा महिन्यांकरिता दुसऱ्यांदा वीरप्पनला शोधण्याच्या कामावर लागले.

यावेळी त्यांनी ऑपरेशन कोकून यशस्वीरित्या पार पडावे म्हणून मंदिरात प्रार्थना केली होती. शेवटी १८ ऑक्टोबर २००४ रोजी तामिळनाडूच्या धरमपुरी जिल्ह्यातील पापरपट्टी जंगलात झालेल्या एनकाउंटरमध्ये वीरप्पनला त्याच्या तीन साथीदारांसह मारण्यात आले. वीरप्पनला गारद केल्यानंतर आयपीएस विजय कुमार यांनी बनारी अम्मन मंदिरात जाऊन मुंडण केले आणि आपला नवस पूर्ण केला.

वीरप्पन:

वीरप्पन
वीरप्पन -युवाकट्टा

देशातील बहुतेक लोक कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या नावाने परिचित आहेत. वीरप्पनचे खरे नाव कुज मुनिस्वामी वीरप्पन होते. आपल्या संपूर्ण जीवनकाळात वीरप्पनने हस्तीदंतासाठी २००० हून जास्त हत्तींची शिकार केली होती. हजारो चंदनाच्या झाडांची कत्तल करून तस्करी केली होती. त्याच्या कामात अडथळा येणाऱ्या कित्तेक लोकांना त्याने जिवंत मारले होते.

१९६२ मध्ये वीरप्पनने वयाच्या १० व्या वर्षी एका तस्करांची हत्या करून अपराधिक जीवनात प्रवेश केला. त्याचवेळी त्याने वनविभागाच्या तीन अधिकाऱ्यांचीही हत्या केली. वीरप्पनच्या गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार वनविभागाच्या लोकांनीच त्याला तस्करीसाठी उकसावले होते.

१९८७ मध्ये वीरप्पनची ख्याती संपूर्ण देशात पसरली होती कारण याच काळात त्याने चिदंबरम नावाच्या एका वन अधिकाऱ्याचे अपहरण केले. काही काळानंतर त्याने पोलिसांच्या एका टीमला स्फोटकाने उडवून २२ पोलिसांना मृत्युमुखी पाडले. २००० मध्ये तर वीरप्पनने कन्नड चित्रपटांचा नायक राजकुमार यांचेच अपहरण केले आणि त्यांच्या सुटकेसाठी 50 कोटींची खंडणी मागितली होती.

वीरप्पन

वीरप्पनला ठार मारल्याच्या दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम हाउसच्या बाहेर मृत वीरप्पनला पाहण्यासाठी २०००० हून अधिक लोक जमा झाले होते. वीरप्पनने एकूण १४४ लोकांचा खून केल्याचे म्हटले जाते ज्यामध्ये ९७ पोलीस कर्मचारीही समाविष्ठ आहेत. विरप्पनला पकडण्यासाठी सरकारने करोडो रुपये खर्च केले होते.

वीरप्पन चेसिंग द ब्रिगेन्ड:

विजय कुमार यांनी ऑपरेशन कोकून यशस्वी झाल्यावर वीरप्पनवर ‘वीरप्पन चेसिंग द ब्रिगेन्ड‘ हे पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी लहानपणापासून दरोडेखोर होण्यापर्यंतच्या वीरप्पनची कहाणी सांगितली आहे. या पुस्तकानुसार विजय कुमार यांनी त्यांचे काही जवान वीरप्पनच्या टोळीमध्ये घुसवले होते. यावेळी वीरप्पनच्या टोळीत लोकांची संख्या कमी होत चालली होती विजय कुमार यांना ही गोष्ठ माहित होती.

वीरप्पन

१८ ऑक्टोबर २००४ चा दिवस होता वीरप्पन त्याच्या डोळ्यावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार होता, जंगलाच्या बाहेर पपीरापट्टी गावात त्याच्यासाठी एक रुग्णवाहिका उभी होती. वीरप्पन बेसावध त्या रुग्णवाहिकेत येऊन बसला, वीरप्पनला माहित नव्हतं की ती रुग्णवाहिका पोलिसांची आहे आणि एसटीएफचा एक माणूस ती चालवत आहे. रस्त्याच्या मधोमध पोलिस घात लाऊन बसले होते, तेवढ्यात अचानक चालकाने रुग्णवाहिका थांबवली आणि तो त्यातून खाली उतरून पळून गेला. वीरप्पनला काही समजण्यापूर्वी पोलिसांनी चारही बाजूंनीरुग्णवाहिकांवर गोळीबार सुरू केला ज्यामध्ये वीरप्पन जागीच ठार झाला.

असेही म्हणाले जाते कि , पोलिसांना त्याला जिवंत पकडायचेच नव्हते कारण जर तो पकडला गेला असता तर त्याला कोर्टाकडून सोडण्यात आले असते. परंतु पोलिसांनी आपल्या स्पष्टीकरणात विरप्पनला चेतावणी  दिली होती, परंतु त्याने उलट पोलिसांवरच गोळीबार  सुरु केला. त्यामुळे प्रतीउत्तरात झालेल्या चकमतीत तो ठार झाला असे सांगितले. यासोबतच आयपीएस विजय कुमार यांच्या ऑपरेशन कोकून ची समाप्ती झाली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :  मुंबई पोलीस दलातील अव्वल ५ एनकाउंटर स्पेशलीस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here