आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कनिपकम विनायक मंदिराचे अद्भुत रहस्य वाचा सविस्तर…!

भारत ही देवी देवतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये अनेक मंदिरे आहेत जे त्यांच्या दैवी चमत्कारामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. असेच एक चमत्कारिक मंदिर आहे आंध्रप्रदेशातील कनिपकम विनायक मंदिर. तसे तर आपल्या देशात अनेक गणेश मंदिरे आहेत जे भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहेत परंतु हे मंदिर बाकी सर्व मंदिरांपेक्षा विभिन्न आणि अलौकिक आहे याचे कारण, एक तर हे विशाल मंदिर नदीच्या मधोमध स्थित आहे आणि दुसरे म्हणजे या मंदिरातील भगवान गणेशाच्या मूर्तीचा आकार दररोज वाढत आहे. आस्था आणि चमत्काराच्या अनेक कथा या मंदिराबद्दल प्रसिध्द आहेत. चला तर जाणून घेऊया या अनोख्या मंदिराबद्दल सविस्तर…!

कनिपकम विनायक मंदिर निर्मांनाचा रोचक इतिहास:

कनिपकम विनायक मंदिर
कनिपकम विनायक मंदिर मूर्ती वाढलेला आकार

भगवान श्रीगणेशाचे हे मंदिर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात स्थित आहे. कनिपकम विनायक मंदिरचे निर्माण हे ११ व्या शतकात चोल राजवंशाने केले होते. त्यानंतर १३३६ मध्ये विजयनगरच्या राज्यकर्त्यांनकडून या मंदिराचा विस्तार करण्यात आला.

या मंदिराच्या बनण्यामागेही खास कहाणी आहे असे म्हणल्या जाते कि, एकेकाळी ३ भाऊ होते एक मुका, दुसरा बहिरा आणि तिसरा आंधळा. या तिघांनी मिळून जीवन बसर करण्यासाठी एक जमिनीचा तुकडा खरेदी केला होता. या जमिनीवर त्यांना शेती करण्यासाठी पाण्याची गरज होती.

त्यामुळे या तिघांनी कोरडी पडलेलली एक विहीर खोदण्यास सुरवात केली. त्या विहिरीला बरेच खोदल्यानंतर पाणी लागले. मग आणखी थोडे खणल्यानंतर त्यांना एक दगड दिसला जो काढल्यानंतर त्याजागून रक्ताचे पाट बाहेर पडू लागले आणि बघता बघता संपूर्ण विहिरीचे पाणी लाल झाले.

हा दैवी चमत्कार होताच मुका, बहिरा किंवा आंधळा हे तिन्ही भाऊ पूर्णपणे बरे झाले. जेव्हा ही बातमी त्या गावात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा ते सर्वजन हा चमत्कार पाहण्यासाठी एकत्र जमू लागले. जमलेल्या लोकांना त्याठिकाणी गणपती बाप्पाची एक मूर्ती दिसली ती मूर्ती सर्वांनी मिळून त्या पाण्यामध्येच स्थापित केली.

विहिरीच्या पाण्यातून स्वतः प्रगट झालेल्या या गणपतीच्या मूर्तीला भक्तांनी स्वयंभू विनायक हे नाव दिले. आजही त्या दैवी विहिरीला बाराही महिने पाणी असते. पावसाळ्याच्या दिवसात तर विहिरीतून पाणी बाहेर वाहत असते.

दररोज वाढते येथील मूर्तीचा आकार:

असे म्हटले जाते की या मंदिरात स्थानापन्न असलेल्या कनिपकम विनायकाच्या मूर्तीचा आकार दररोज वाढत आहे. हे एकूण तुम्हाला आश्चर्य वाटत असेल परंतु येथील लोकांचा असा विश्वास आहे की दररोज ही गणपतीची मूर्ती आपला आकार वाढवित आहे. याचा पुरावा आहे गणपतीच्या मूर्तीचे पोट आणि गुडघा ज्यांच्या आकारात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

कनिपकम विनायक गणपतीच्या एका भक्ताने एक कवच भेट म्हणून दिले होते. परंतु मूर्तीच्या वाढत्या आकारामुळे ते आता मूर्तीवर चढवणे कठीण झाले आहे. ५० वर्षांपूर्वी एका भक्ताने या मूर्तीच्या हाताच्या आकाराचे एक ब्रेसलेट दान दिले होते जे आज या मूर्तीच्या हातात बसत नाही.

न्यायमूर्ती कनिपकम विनायक:

कनिपकम विनायक मंदिर
कनिपकम विनायक मंदिर

कनिपकम विनायक मूर्ती ही लोकांमध्ये असणारे वादही मिटवते या मूर्तीजवळ येऊन विहिरीकडे तोंड करून गणपतीची शपत घेऊन लोक आपापसात असलेला वाद मिटवतात. स्थानिक लोकांसाठी येथे घेतलेली शपथ ही कोणत्याही कायद्यापेक्षा किंवा न्यायापेक्षा मोठी मानल्या जाते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here