आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
आयुष्यभर ज्या अंतराळाची स्वप्न पाहिली, त्या अंतराळातच कल्पनाने मृत्यूला आलिंगन दिले!
१९४७ साली भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि दोन्ही बाजूच्या हजारो लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली, आपलं घर- गाव सोडून लोक परक्या प्रदेशात वास्तव्यास जात होती. लोकांचे लोंढे पाकिस्तानातून भारतात येत होते. या लोंढ्यामध्ये एक परिवार होता बनारसी लाल चावला यांचा, जे पाकिस्तानच्या मुलतानमधून भारतात आले. ते हरियाणाच्या कर्नालमध्ये येऊन स्थायिक झाले.

बनारसी हे खूप मेहनती गृहस्थ होते. सुरुवातीला बनारसी घर चालवायला कपड्यांची विक्री करायचे, सोबत अनेक लहान मोठे काम करून आपल्या गरजा भागवायचे. काही काळाने प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी टायर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांची पत्नी घराचं काम बघायची, त्यांना चार अपत्य झाली. १७ मार्च १९६२ मध्ये त्यांच्या सर्वात लहान मुलीचा जन्म झाला, त्यांनी तिचं ‘मोंटो’ असं नामकरण केलं.
मोंटो लहानपणी सर्वांची लाडकी मुलगी होती, तिला विमानाचे खूप आकर्षण होते, अवकाशातील तारे तारकांमध्ये भटकण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्यात एक वेगळा आत्मविश्वास होता, एक जिद्द होती, याच बळावर ती भविष्यात कल्पना चावला या नावाने प्रसिद्ध झाली. ती अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला आणि राकेश शर्मा यांच्या नंतर दुसरी भारतीय व्यक्ती बनली.
लहानपणी बनारसी यांनी त्यांच्या मुलीचे मोंटो असे नामकरण केले खरे परंतु ज्यावेळी तिचा प्रवेश करायची वेळ आली त्यावेळी तिथे कोणत्या नावाने नोंदणी करायची म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंनी त्यांना तिच्या खऱ्या नावाची विचारणा केली त्यावेळी बनारसी म्हणाले की आम्ही तिला ज्योत्स्ना, सुनैना आणि कल्पना हे तीन नावं दिली आहेत, यापैकी तिला जे आवडेल त्या नावाने तिचा प्रवेश शाळेत करा!
यावर मुख्याध्यापिका बाईंनी ‘मोंटो’ला तिला कोणतं नाव आवडतं अशी विचारणा केली, त्यावर ती म्हणाली, ‘मला तिन्ही नावं आवडत नाही पण कल्पना हे नाव चांगलं आहे’ , त्यानंतर तिचा ‘कल्पना’ या नावाने शाळेत प्रवेश केला गेला आणि याच नावाने तिने पुढे कीर्ती कमावली.
लहानपणीपासून कल्पना यांना नावाप्रमाणेच कल्पना करायला फार आवडायचे आणि त्या कल्पना त्या चित्राच्या माध्यमातून रेखाटायच्या, इतर मुलांप्रमाणे त्या डोंगर दऱ्यांचे चित्र रेखाटायच्याच पण त्यासोबत आकाशात उडणाऱ्या विमानाचे चित्र त्या रेखाटत होत्या. लहानपणापासून त्यांचा विज्ञानाच्या बाजूने खूप झुकाव होता. त्या भारताचा नकाशा काही क्षणात रेखाटून काढायच्या, त्यांच्या मनात सदैव उड्डाणच्या स्वप्नांचा वास होता, अवकाशातील तारे बघत बघत त्या रात्री झोपी जायच्या.
आपलं शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पंजाब कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी.टेक केलं, पुढे एयरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी कल्पना अमेरिकेला गेल्या, त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधून एयरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली. त्यांना सदैव अवकाश गमनाचे डोहाळे लागलेले असायचे!
लहानपणापासून अवकाशात उड्डाण करायचे स्वप्न बघणाऱ्या कल्पना त्यासाठी प्रचंड मेहनत देखील घेत होत्या, १९८८ साली आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी नासामध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर कल्पना अमेरिकेतच स्थायिक झाल्या. १९९१ मध्ये त्यांना अमेरिकेची नागरिकता मिळाली. त्या पुढे नासाच्या अस्ट्रॉनोट कॉर्पच्या भाग बनल्या, ययातूनच पुढे त्यांना स्पेस मिशनवर जाण्याची संधी चालून आली, त्या नासाच्या स्पेस शटल प्रोग्राममध्ये सहभागी झाल्या.
‘ह्युमन स्पेसफाईट’ हा नासाचा एक प्रोग्राम आहे, ज्याद्वारे काही माणसाना अवकाश गमनासाठी पाठवले जाते.
तिथे अवकाशात जाऊन हे लोक संशोधन करून त्याबद्दल पृथ्वीवरील लोकांना माहिती देतात. स्पेस शटल प्रोग्राम देखील असाच एक प्रोग्राम आहे, याच्याच ८८ व्या मिशनच्या कोलंबिया फ्लाईट STS 87 चा कल्पना चावला भाग बनली होती.
हे कल्पनाचे पहिले स्पेस मिशन होते. १९९७ मध्ये ५ अंतराळवीर मित्रांसोबत त्या अवकाशात गेल्या, त्यांनी १०.४ दशलक्ष मैल अंतर कापले, पृथ्वीच्या २५२ प्रदक्षिणा केल्या आणि त्यांचे पहिले मिशन यशस्वी होऊन त्या परतल्या !
२००३ मध्ये कल्पना पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या स्पेस मिशनसाठी सज्ज झाल्या, हे मिशन होते कोलंबिया STS 107, हे स्पेस शटल प्रोग्रामचे ११३ वे मिशन होते. १६ जानेवारी २००३ ला STS107 अवकाशात झेपावले. १ फेब्रुवारी २००३ ला कल्पना अंतराळातुन पृथ्वी कडे परतीचा प्रवास सुरु करणार होत्या.
त्यांनी अंतराळात ८० वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याची माहिती नासाला कळवली, १ फ्रेब्रुवारीला त्या पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाल्या, पृथ्वीवर पोहचण्याचा फक्त १६ मिनिटे आधी एक अपघात झाला ज्यात त्यांची पूर्ण स्पेस शटल बेचिराख झाली आणि यात कल्पनांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या बरोबर गेलेल्या ६ सहकाऱ्यांनी देखील आपला जीव गमावला.
पुढे या अपघाताची नासाने चौकशी केली तेव्हा समोर आले की १६ जानेवारी २००३ ला स्पेस शटलचा ‘फोम इन्स्यूलेशन’चा भाग तुटला होता, याचा प्रभाव यानाच्या डाव्या पंखावर पडत होता. काही इंजिनिअर्सच्या मते हे खूप मोठे नुकसान होते. खरंतर याला दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण कल्पना आणि टीमला देण्यात आले होते. पण त्यांनी तसे केले नाही, याचा परिणाम असा झाला की १ फेब्रुवारीला जसे ते यान भारताच्या वायु मंडळात आले तसा त्याच्यात स्फोट होऊन घर्षणाने त्याचा चिंध्या चिंध्या झाल्या. हा अपघात फार दुर्दैवी होता.
पहिलं आणि दुसरं मिळून कल्पना ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात राहिल्या होत्या, त्या नेहमी म्हणायच्या ‘मी अंतराळासाठी बनलेली आहे, माझा प्रत्येक क्षण मी अंतराळात घालवते,आणि मी इथेच मरेल’.
त्यांचे हे वाक्य खरे ठरले, आयुष्यभर ज्या अंतराळाची स्वप्न पाहिली, त्या अंतराळातच त्यांनी मृत्यूला आलिंगन दिले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!