आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
आपल्या सर्वांचा आवडता वार म्हणजे रविवार. पूर्ण आठवडाभर सकाळी लवकर उठणे, ऑफिस साठी, कॉलेज साठी व इतर कामासाठी तयार होऊन जाणे यामुळे आपण त्रस्त झालेले असतो. रविवार हा दिवस कोणासाठी आराम करण्याचा, कोणासाठी कुठेतरी फिरायला जाण्याचा तर कोणासाठी आपल्या परीवारासोबत वेळ घालवण्याचा दिवस.
पूर्ण आठवडाभर प्रत्येक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. नोकरी करणाऱ्या वर्गाला या दिवशी रोजच्या कामकाजाच्या धावपळीतून सुटका मिळते.
घरी राहणाऱ्या महिला व लहान लहान मुले या गोष्टीचा विचार करून आनंदी असतात की त्यांना आपल्या माणसांसोबत वेळ घालवायला मिळेल,कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रविवार हा असा एक दिवस असतो की ज्या दिवशी सुट्टी मिळते. तुम्ही पाहिले असेल की जास्त करून माणसे रविवारीच कार्यक्रमाचे नियोजन करतात. केबल टीव्ही वरती येणारे काही कार्यक्रम ही रविवारी दाखवले जातात.
यामागचं कारण असं की रविवार हा सर्वांच्या सुट्टीचा दिवस असतो, पण तुमच्या डोक्यामध्ये असा कधी विचार आला का की सुट्टी ही फक्त रविवारीच का असते, जर नसेल तर त्याला आज जाणून घेऊया रविवारी सुट्टी असण्याची मागची काही खास कारणे.
तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये वापरली जाणारी कॅलेंडर ही इंग्रजांची देण आहे. त्यामुळे आठवड्यामध्ये असणारी सुट्टी ही तीच आहे जी इंग्रजांनी ठरवून दिलेली आहे. रविवारी सुट्टी असण्यामागचा इतिहास हा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचा आहे.१८५८च्या उठाव मध्ये भारतीयांनी इंग्रजांना दाखवून दिले की त्यांच्या सगळ्या गोष्टी मानायला आम्ही लाचार नाही. जर काही गोष्टी चुकीच्या होत असतील, त्याच्यातून समाजाला त्रास होत असेल तर अशा गोष्टी विरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार आहे.
इंग्रजांच्या अधिपत्याखाली भारत असताना कामगारांचे खूप हाल होत असत. कामगारांना एक दिवसही सुट्टी मिळत नसे. कठोर इंग्रज शासन आठवड्याच्या सातच्या सात दिवशी त्यांच्याकडून काम करून घेत असत.याच्या विरोधात खूप दिवसाच्या संघर्षानंतर आणि बंडानंतर १८८३ मध्ये सर्व कामगारांनी मेघाजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली आठवड्यातील एक दिवस सुट्टी असायला हवीअशी मागणी केली.

१८८३ नंतर जवळपास सात वर्षाच्या संघर्षानंतर आणि खूप वेळा आंदोलन केल्यानंतर इंग्रज सरकारला या गोष्टी पुढे झुकावे लागले .१०जून १८९० मध्ये रविवारच्या दिवशी आठवड्यामध्ये एक दिवस सुट्टी असेल असे जाहीर करण्यात आले . इंग्रजही त्यांच्या कामकाजामध्ये रविवारी सुट्टी घेत असत त्यामुळे भारतातही रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सन १८४४ मध्ये इंग्रज गव्हर्नर यांनी शाळेत जाणाऱ्या मुलांना रविवार हा सुट्टीचा दिवस जाहीर केला. या दिवशी मुलांनी काही रचनात्मक गोष्टी केल्या पाहिजेत व आपल्या मध्ये सुधारणा करून आयुष्यात प्रगती केली पाहिजे. हिंदू कॅलेंडर किंवा हिंदू पंचांग नुसार आठवड्याची सुरुवात रविवार पासूनच होते. हा दिवस सूर्य देवताचा दिवस आहे असे मानले जाते.
हिंदू पुराणांनुसार या दिवशी सूर्य देवता आणि इतर देवतांची पूजा करण्याचा दिवस आहे कारण पूर्ण आठवडा मन प्रसन्न राहते.राव बहादुर नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार पुढारी होते.त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४८ ला झाला होता. त्यांनी संपूर्ण सहा दिवस काम केल्यानंतर एक दिवस सुट्टी द्यावी असा प्रस्ताव इंग्रजांच्या समोर ठेवला होता.
आठवड्यातून एक दिवस आम्हाला समाज व देश सेवेसाठी मिळायला हवा तसेच रविवार हा हिंदू देवता खंडोबा यांचा वार आहे म्हणून यादिवशी साप्ताहिक सुट्टी घोषित करावी अशी त्यांची मागणी होती व ती पूर्ण झाली.
आज आपल्याला मिळालेली रविवारची सुट्टी एका संघर्षातून मिळालेली आहे. राव बहाद्दर नारायण मेघाजी लोखंडे यांचे अमूल्य असे योगदान आपण लक्षात ठेवले पाहिजे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!