आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

‘द आंत्रप्रन्योर’ : एका मराठी उद्योजकाचा असामान्य प्रवास..


काही दिवसांपूर्वी शरद सरांनी हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं, तेव्हा लगेच दुसरे कोणतेही पुस्तक हाती न घेता द आंत्रप्रन्योर हाती घेतले आणि एकाच बैठकीत वाचून पूर्ण केले. सरांनी एवढ्या सोप्या आणि साध्या शब्दात आपला एकंदरीत संघर्षमय, वास्तववादी व प्रेरणादायी जीवनप्रवास कुठलेही बंधन न ठेवता मांडला आहे की जो वाचत असताना आपण थोड्या वेळासाठी सुद्धा पुस्तक खाली ठेऊच शकत नाही.

देशात प्रचंड बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांत नैराश्य खूप वाढलेलं आहे. तरुणांनी नौकऱ्यामागे न लागता आपला स्वतःचा एक उद्योग सुरू करून इतरांना सुद्धा उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करावे, जेणेकरून बेरोजगारी कमी करण्यासाठी आपली सुद्धा काही मदत होईल… आणि या विषयावर द आंत्रप्रन्योर हे पुस्तक जबरदस्त पद्धतीने मार्गदर्शन करते. शरद सरांच्या आयुष्यातील अनेक पैलू आपल्याला माहिती होतात आणि हा माणूस एवढा डाउन टू अर्थ कसा काय राहू शकतो यामागचं उत्तर आपल्याला या पुस्तकात मिळतं.

द आंत्रप्रन्योर

तसे तर उद्योजकता या विषयावर, उद्योजक बनण्यासाठी काय करावे? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत पण नेमकं यशस्वी उद्योजक बनण्यासाठी काय करू नये.. या विषयावर कृतीतून व आपल्या अनुभवातून उत्तर सांगणारे हे पुस्तक एकमेव असेल. आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगत असतानाच लेखकांनी तरुणांना अचूक काही कानमंत्र दिले आहेत जे अनेकांना खूप फायदेशीर ठरतील.

हे पुस्तक तुम्हाला फक्त उद्योजक बनायचं शिकवत नाही तर उद्योजक बनून इतर उद्योजक घडवण्यासाठी प्रेरित करते. “वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ आरसा असणं महत्वाचं. असा आरसा, ज्यात पाहून अपल्याला स्वतःशी बोलता आलं पाहिजे. जो स्वतःशी चांगला संवाद करू शकतो तोच इतरांशीही चांगला संवाद करू शकतो. स्वतःशी होणारा एकांतातील संवाद हा आयुष्यात इच्छित यश मिळवून देईल.” यासारखे अनेक जीवनोपयोगी मूलमंत्र देत लेखकांनी त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून आलेला शहाणपणा वाचकांच्यासोबत शेअर केलेला आहे जो येणाऱ्या काळात अनेक उद्योजक घडवल्याशिवाय राहणार नाही.

ही कथा आहे बीड जिल्ह्यातील शरद तांदळे या युवकाची. बारावीनंतर औरंगाबाद येथील महाविद्यालयातुन फक्त नावापुरती मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेची पदवी घेऊन नौकरी न मिळाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी.. जेमतेम तीन महिन्यानंतरच आपली लायकी लक्षात आल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून पुणे येथील एका कंपनीत ५ हजार रुपये महिन्याचा जॉब. पुन्हा हा जॉब सोडून दुसऱ्या चांगल्या नौकरीच्या शोधात व याच कालावधीत इकडे-तिकडे मारलेले हातपाय.

आंत्रप्रन्योर

एवढं करून सुद्धा पदरी पडलेले अपयश मग यातून नैराश्यात रवानगी. यातून बाहेर पडण्याची धरपड, यशासाठी केलेले विचित्र प्रयोग, व्यसन व बरंच जे लेखकांनी या पुस्तकात मांडलेलं आहे. सतत आलेल्या अपयशातूनच सुरू होतो प्रवास एका नवीन मार्गाकडे आणि तो मार्ग असतो ‘द आंत्रप्रन्योर’ बनण्याचा.

खेड्यातून थेट लंडनपर्यत मजल मारण्याचा हा प्रवास आपल्याला हसवतो, रडवतो, भावुक करतो, विचार करायला भाग पाडतो, मार्गदर्शन करतो आणि खूप खूप काही नवीन शिकवतो. आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलतो.

आज जी व्यक्ती यशाच्या शिखरावर आहे त्यामागे त्याने केलेली मेहनत आहे आणि ते आजही तेवढीच मेहनत करतात. त्यामुळे मेहनतीला लाजू नका आणि आयुष्यात नेहमी सकारात्मक राहून आपल्याला ध्येयाकडे वाटचाल करा ही शिकवण हे पुस्तक देते. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचावे.

– मोईन खान

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here