आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

IPL 2021 – वयाच्या १० व्या वर्षी संघातून बाद झालेल्या लोकेश राहुलवर सर्वांची नजर…

 

आयपीएल भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या या टूर्नामेंटमध्ये एक खेळाडू आपल्या फलंदाजीने सर्वांची माने जिंकून घेतोय. त्याचं नाव लोकेश राहुल, अर्थात के. एल. राहुल! त्याची फलंदाजी आणि मैदानावर वावरतानाची देहबोली पाहता त्याला वयाच्या १० व्या वर्षीच संघातून रीजेक्ट केले असेल यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. या निमित्ताने जाणून घेऊया, लोकेश राहुलचा स्ट्रगल आणि तो इथपर्यंत कसा पोहोचला याबद्दल!

 

सॅम्युअल जयराज हे प्रशिक्षक कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अकॅडमीमध्ये अतिशय उत्साही आणि गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण देत होते. पण त्यांच्या प्रशिक्षणात असणाऱ्यापैकी खूप कमी खेळाडूंनी दाखवून दिले की त्यांचे लक्ष्य फक्त आणि फक्त क्रिकेट आहे. के. एल. राहुल हा त्यापैकीच एक.

 

लोकेश राहुल

 

२००२ मध्ये १० वर्षीय के.एल. राहुल मंगलोर झोनच्या १३ वर्षे आतील निवड चाचणीमध्ये सहभागी झाला होता. या चाचणीत त्याला निवडले गेले नाही पण त्याचा किंचितसाही फरक त्याच्या आत्मविश्वासावर पडला नाही. उलट ह्या घटनेने त्याच्यातील खेळाची आग आणखीनच भडकली.

जयराज सांगतात,

“स्वतःचे नाव संघाच्या यादीत नसलेले पाहून तो माझ्याकडे आला आणि त्याने विचारले, मी सरावासाठी येऊ शकतो का?” मी त्याला ‘हो’ म्हणालो. “उद्यापासून मैदानावर ३ वाजता यायचं आणि ३.३० वाजता सराव सुरु होईल.”

 

पण जेव्हा मी मैदानावर २.३० वाजता पोहोचलो तेव्हा राहुल आधीपासूनच तिथे होता. इतक्या लहान वयापासूनच राहुलला परिश्रमाचे आणि कष्टाचे महत्व समजले होते.”

 

जयराज आणि त्यांचे सोबती असलेले प्रशिक्षक देवदास नायक यांनी त्याच्या खेळावर काम करण्यास सुरुवात केली.

 

त्यांनी राहुलला जुन्या १७ वर्षाखालील गोलंदाजांसमोर चाचणी घेण्यास उतरवले त्यात उमेश खारवी, मोहोम्मद अरिफ आणि विल्डन क्रास्टो होते. त्यामुळे राहुलला अवघड गोलंदाजीसमोर टिकून राहण्याचा सराव होण्यासदेखील मदत झाली.

 

जयराज म्हणतात, “नायक आणि मी राहुलला नेहमीच सांगायचो की स्टम्पच्या मागे उभा असताना चेंडू जवळून पाहत जा.” जेणेकरून फलंदाजी करताना त्याला चेंडूचा लवकर अंदाज येऊ शकेल. यात एक उत्तम गोष्ट अशी होती की राहुल एक अतिशय चांगला श्रोता आहे. या सूचना ऐकल्यावर तो त्यांचा खेळामध्ये अवलंब करत गेला.”

 

काही वर्षांतच त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले. राहुलने फक्त मंगलोर झोनच्या १३ वर्षाखालील संघात प्रवेशच नाही मिळवला तर कर्नाटक राज्य क्रिकेट अकॅडमीच्या आंतरविभागीय क्रिकेट सामन्यांमध्ये दोन दुहेरी शतक झळकावले.

 

त्यातील एक दुहेरी शतक हे त्याने एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर पूर्ण केले. त्यात एक अतिशय सुंदर योग असा होता की राहुल द्रविड हे नेमके त्या मैदानावरती त्यांच्या फिटनेससाठी आलेले होते आणि त्यांनी लोकेशची पूर्ण खेळी पहिली. सामन्यानंतर त्यांनी लोकेशला बोलावून घेतले आणि त्याच्याशी बराचवेळ बोलत राहिले. १२ वर्षीय मुलाचे द्रविडसारख्या खेळाडूने निरीक्षण करावे आणि त्यांच्या नजरेत यावे यामुळे लोकेश राहुलच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली.

 

 

याच काही दिवसांत जयराज यांनी द्रविडच्या क्रिकेट क्लबमध्ये (बेंगलोर युनायटेड क्रिकेट क्लब) चौकशी करून त्यांच्या संघात लोकेशसाठी जागा मिळविण्याचा प्रयत्न केला. शोध घेतला असता त्यांना समजले की बेंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबने भारतातील खूप खेळाडू तयार केले आहेत.

 

या क्लबचे सेक्रेटरी शवीर तारापोरे हे त्यांचे चांगले मित्र होते. जयराज यांनी त्यांना राहुलच्या खेळाकडे लक्ष देण्याची विनंती केली.

 

शवीरने त्याला बेंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबतर्फे बरेचसे सामने खेळण्याची संधी दिली. राहुल बेंगलोरमध्ये बेंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबचे सामने खेळण्यासाठी जाऊ लागला. पण तो त्याची मुळे विसरला नव्हता. त्याने बेंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबचा सामना खेळला असला तरीही तो दुसऱ्या दिवशी वेळेत त्याच्या मेंगलोरच्या संघासोबत सरावासाठी हजार व्हायचा. सूर्यस्थलमधील NIKT इंग्लिश मीडियम शाळेतून शालेय शिक्षण आणि सेंट ऍलोसियस मधून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुलची बेंगलोरला जाण्याची वेळ आली होती.

 

हा त्याच्या स्वतःसाठी, त्याच्या कुटुंबासाठी आणि प्रशिक्षकांसाठी एक अवघड निर्णय होता. पण त्याच्या सर्व कुटुंबीयांनी आणि प्रशिक्षकांनी मनावर दगड ठेवून शेवटी त्याला बेंगलोरला पाठवण्याचे नक्की केले.

 

अश्या रीतीने राहुलच्या आयुष्यातील बेंगलोरचा अध्याय सुरु झाला. त्याने बंगलोरच्या जैन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. हे विद्यापीठ अशा खेळाडूंना पाठिंबा देऊन त्यांना घडविण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या माजी खेळाडूंच्या यादीत पंकज अडवाणी, रोहन बोपण्णा, रॉबिन उथप्पा, अनुप श्रीधर, मनीष पांडे, स्टुअर्ट बिन्नी, करूण नायर असे अनेक हिरे आहेत.

 

क्रिकेट खेळाडू कौनैन अब्बास हा एक त्या विद्यालयाचा अतिशय प्रतिभावंत खेडाडू होता. तो राहुलच्या आधीपासून १ वर्ष त्यांच्या विद्यालयाच्या क्रिकेट संघात होता आणि ते दोघेही नंतर कर्नाटकच्या आंतरसामन्यांत एकत्रितपणे खेळात होते.
अब्बास राहुलच्या खेळाविषयी आठवण अशी सांगतो की “राहुल सुरुवातीला अतिशय स्फोटक फलंदाज नव्हता. तो एक टिकून राहणारा खेळाडू म्हणून खेळत होता.

 

पण दोन महिन्यानंतर वरिष्ठ कर्नाटकीय सामन्यांमध्ये तो एक अतिशय भेदक फलंदाज म्हणून खेळू लागला. त्याच्या मैदानाबाहेर चौकार आणि षटकार मारण्याच्या खेळीमुळे तो कमी काळातच अतिशय नावारूपाला आला.

 

महाविद्यालयीन आयुष्यात येणाऱ्या सर्व विचलित करणाऱ्या गोष्टींपासून राहुल कायम दूर राहू शकला कारण त्याचे ध्येय अतिशय पक्के होते. ह्या काळात राहुल फक्त क्रिकेटला समर्पित झाला होता. त्याच्या जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त आणि फक्त क्रिकेटच होते. जेव्हा तो त्याच्या महाविद्यालयीन संघामध्ये नव्हता तेव्हा तो त्याच्या क्लबकडे जुनिअर स्टेट संघाकडे आणि वरिष्ठ कर्नाटक बाजूकडे वळला. त्याने त्याचे प्रथमश्रेणीतील पदार्पण २०१० मध्ये केले, पण २०१२-१३ पर्यंत तो नावारूपास आला नव्हता. पण राज्यीय संघात कायमचे स्थान मिळालेले नसतानाही त्याच्या आत्मविश्वासात थोडीही कमतरता नव्हती.

 

 

पुढचा काळ के. एल. राहुलसाठी अभूतपूर्व होता. त्याने २०१३-१४ च्या रणजी चषक सामन्यांमध्ये १०३३ धावा करून त्या टूर्नामेंटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धाव करणारा खेळाडू म्हणून मान पटकावला. नागपूरमध्ये झालेल्या विदर्भविरुद्धच्या त्या सामन्यात राहुलला न खेळवण्याबद्दल मॅनेजमेंटचा निर्णय ठरला होता.

 

पण कर्णधार असलेल्या गौतमने त्यांची मनधरणी करून राहुलला खेळवण्यास भाग पाडले. जिथे राहुलचा सुरुवातीचा खेळ सावकाश चालू होता पण नंतर तो बहारदार होत गेला.

 

त्याच्या या सोनेरी खेळीमुळेच त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्याच टेस्टमध्ये त्याने ११० धावा करून त्याची शानदार खेळी दाखवली. जे त्याच्या आंतरराष्ट्रीय ८ शतकांपैकी एक होते. तिथून पुढे लोकेशने कधीच मागे वळून पाहिले नाही. अशा ह्या कष्टाळू गुणवंत खेळाडू लोकेश राहुलचे आज भारतीय संघातील आणि IPL मधील यश आपण पाहतोच आहोत.

त्याने सिद्ध केले की त्याचे अविरत कष्ट आजच्या त्याच्या सोनेरी कारकिर्दीचा भक्कम पाया आहेत. त्याचे भारतीय संघातील पुढचे स्थान आणि खेळ रोमांचक असेल यात शंका नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here