आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

अभिनेता वरून धवन आणि अभिनेत्री सारा आली खान मुख्य भूमिकेत असलेला कुली नं.1चा रिमेक कुली नं.1 काल O.T.T Platform वर रिलीज झाला. आणि अपेक्षेप्रमाणेच या सिनेमाने २ दिवसातच आपला जलवा चालू शकणार का नाही हे दाखवून दिलाय..

याच कुली नं.1 चा आज आपण रीव्हीव्यू करणार आहोत आणि जाणून घेऊया सिनेमा नक्की कसा आहे ते?

 

एखादा सिनेमा तुम्ही विनोदी सिनेमा म्हणून पाहायला घेता, त्यातही तो डेव्हीड धवनने दिग्दर्शित केलेला असतो आणि तरीही सव्वा दोन तासाच्या सिनेमात तुम्हाला एकही सेकंद हसू येत नाही. हो… असं होऊ शकतं ! कुली नंबर 1 च्या रिमेकच्या निमित्ताने डेव्हिड धवन आणि कंपनीने जो पांचटपणा केलाय त्यावर हसू येणं सोडाच पण धड कीव देखील करावीशी वाटत नाही इतका हा लाजीरवाणा प्रॉडक्ट आहे.

मुळात कुली नंबर 1 च्या रिमेकचा विचार आजच्या काळात करणं हाच तर्काधारीत निर्णय नाही आणि केलाच आहे तर विनोदाच्या पातळीवर तरी तो किमान मनोरंजक असावा.पण असं काहीच होत नाही.पटकथा आणि त्याच्या सादरीकरणाच्या बाबतीत अक्षरशः बावळटपणाचा कहर यात दिसून येतो.

कुली नं.1

सिनेमाचा आणि तर्कशास्त्राचा संबंध नसणारच हे पहिल्याच प्रसंगात दिसून येते जेव्हा एका ख्रिश्चन कुटुंबात एक पंडित लग्नाचे स्थळ घेऊन जातो.डेव्हिड धवनच्या सिनेमात या अशा तर्कसुसंगत गोष्टींना फाटा दिलेलाच असतो हे मान्य केले तरी कुली नंबर 1 ची ही सगळी कथाच आजच्या काळात गैरलागू आहे. कथा गैरलागू असली तरी अभिनेत्यांकडून अपेक्षा होती पण जितकी वाईट पटकथा तितकाच वाईट अभिनय करण्याची जणू स्पर्धाच सगळ्या कलाकारांमध्ये लागली होती.

 

वरुण धवन अख्खा सिनेमा गोविंदाची नक्कल करत राहतो आणि त्यात जागोजागी अयशस्वी होतो. सारा अली खान बाबतही हेच होते. तीही करिष्मा कपूरला कॉपी करत राहते. या मुख्य कलाकारांचा स्वतंत्र अभिनय न दिसल्याने एकंदर सिनेमाच सुमार पातळीवर येऊन बसतो. परेश रावल देखील कुठेच आपल्या भुमिकेत समरस होताना दिसत नाही आणि त्यामुळे न विनोदनिर्मिती होते न या भूमिकेचा कादर खानच्या भुमिकेइतका प्रभाव पडतो.

राजपाल यादव, जावेद जाफरी आणि साहील वैद हे सगळेच कलाकार मूळ सिनेमातल्या भूमिकांची तसूभरही बरोबरी करू शकत नाहीत.

कुली नं.1

विनोदी सिनेमांसाठी विनोदी संवादांची किमान गरज असते. संवाद लेखक फरहाद सामजी याबाबत इतकी वाईट कामगिरी करतो की एकेक संवाद ऐकून दया यायला लागते. यमक जुळवणे म्हणजे संवाद लेखन असा काहीतरी आचरट प्रयोग यानिमित्ताने बघायला मिळतो.

जुडवा 2 दुर्दैवाने चालला आणि आपल्या नव्वदीच्या दशकातल्या सिनेमांना आजच्या काळात पुन्हा सादर करण्याचा डेव्हिड धवनचा फाजील आत्मविश्वास बळावला. त्याची परिणिती या अत्यंत वाईट सिनेमात झाली. यापुढे देव त्यांना सद्बुद्धि देवो एवढीच अपेक्षा करता येऊ शकते.

सिनेमा खरं तर एकही स्टार देण्याच्या लायकीचा नाही पण तरी मूळ कुली नंबर 1 ची जुनी गाणी आजच्या काळात पुन्हा ऐकायला बरी वाटतात शिवाय गोंविदा काय अफलातून कलाकार होता याची खात्री पटून मूळ सिनेमा पुन्हा एकदा बघण्याची इच्छा तयार होते त्यामुळे या सिनेमास एका स्टारची देणगी.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here