आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुण्यातील या युवतीने ऑटोरिक्षात फिरते वाचनालय सुरु केलंय…


बालगोपाळांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सारेच जण सोशल मिडीयाच्या मायाजालात अडकून पडले आहेत. या आभासी विश्वात तासंतास रमणारे लोक वाचनाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे, अशी ओरड ऐकायला मिळत आहे. पुन्हा एकदा वाचन संस्कृती वाढावी, यासाठी एका युवतीने चक्क रिक्षामध्ये फिरते वाचनालय सुरू केले आहे. प्रियांका चौधरी असं या युवतीचे नाव आहे.

मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या गावच्या रहिवासी असलेल्या प्रियांका या गेल्या सहा सात वर्षांपासून शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक आहेत. राज्यशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या प्रियांका सध्या पीएचडी करत आहेत. त्यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड.

लोकांमध्ये वाचनाची आवड पुन्हा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी वाचन चळवळ सुरू केली. शिक्षणाचं माहेरघर आणि साहित्याच केंद्र असलेल्या पुणे शहरात त्यांनी खुले वाचनालय सुरू केले होते.

new google

वाचनालय सुरू करण्यापूर्वी त्यांनी लोकांना पुस्तके देणगी देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बघता बघता चाळीस हजारहून अधिक पुस्तके त्यांच्याकडे जमा झाली. ही सर्व पुस्तके त्यांनी या वाचनालयाला दिली. आज वाचकप्रेमी येथे येऊन पुस्तके वाचतात.

सध्या महाराष्ट्रात तब्बल ४५ खुले वाचनालय सुरू  आहेत. महापुरुषांच्या विचारांचा वारसा टिकून राहावा, यासाठी प्रत्येक वाचनालयाला महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत.

प्रियांका चौधरी आपल्या ऑटो लायब्ररी विषयी सांगतात की, ‘बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी त्यावेळी वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी गावोगावी विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही महाराष्ट्रात खुले वाचनालय सुरू केले आहे.

याला चांगला प्रतिसाद मिळाला पण मराठी साहित्य टिकलं पाहिजे ते वाढलं पाहिजे यासाठी काहीतरी नवे करावे असा विचार करत असताना फिरत्या वाचनालयाची संकल्पना मनात आली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “प्रशांत कांबळे नावाचे एक वाचक त्यांच्या वाचनालयास भेट देण्यात आले हाेते. तेव्हा प्रियांका यांनी त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये हे फिरते वाचनालय सुरू करण्याची संकल्पना मांडली.

ऑटो

वाचनप्रेमी असलेल्या प्रशांत यांनी तात्काळ होकार दिला. त्यानंतर मराठी भाषा दिनी कुसुमाग्रज फिरते वाचनालय सुरू झाले.ऑटो ड्रायव्हरच्या पाठीमागे पुस्तके ठेवण्यासाठी एक कापडी पॉकेट तयार केले. या पॉकेटमध्ये सर्व मराठी विषयाची विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी ठेवली आहेत.”

गावाकडचा एखादा माणूस पुण्यात आला असेल तर त्याचा रिक्षामधील प्रवासाचा वेळ हा पूर्णपणे वाचनात जावा या हेतूने ऑटोरिक्षामध्ये वाचनालय सुरू झालं.

वाचनालयातलं पुस्तक जर का प्रवाशाला आवडलं तर ते त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकते. पण त्यासाठी अट एकच आहे की, त्यांनी वाचलेले पुस्तक पुन्हा दुसर्‍या कोणाला तरी दिले पाहिजे.

वास्तविक पाहता वाचनालय म्हटलं की, भलीमोठी इमारत, लोखंडी कपाटे, त्यात असणार्‍या पुस्तकांचा खजिना, अवतीभोवती वाचक प्रेमींचा घोळका हे चित्र डोळ्यांसमोर येते. या साऱ्या गोष्टींना छेद देत चक्क ऑटो रिक्षामध्ये सुरू केलेले वाचनालय वाचकप्रेमींचे लक्ष वेधून घेतय.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here