आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सोलापूर शहरात ज्वारीची कडक भाकरी आणि खमंग शेंगाची चटणी हे प्रसिध्द खाद्यपदार्थ आहेत. यातील ज्वारीच्या कडक भाकरींना एका महिलेनं ग्लॅमर मिळवून दिलं आहे. या कडक भाकरी अमेरिकेत पोहोचल्या आहेत.  उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शेळगी परिसरातील लक्ष्मी सुरेश बिराजदार यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे.

३४ वषीय लक्ष्मी यांचं अवघं नववीचं शिक्षण झालेलं. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील त्या रहिवासी. बालवयातच त्यांच्या अंगावर पांढरे डाग येऊ लागल्याने घरच्यांनी त्यांचे लग्न लवकर उरकून देण्याची घाई केली. पांढऱ्या डागांवर औषधोपचाराने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.

नववीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्या सासरी म्हणजेच कर्नाटकातील जत तालुक्यातील चडचण येथे स्थायिक झाल्या. कालांतराने ते सोलापुरात स्थायिक झाल्या. त्यांचे पती सुरेश हे सुरुवातीला गवंडी काम करायचे.

संसार चालू ठेवण्यासाठी लक्ष्मी यांनी सुरवातीला खाजगी शिकवणी क्लास घेण्यास सुरुवात केली. मात्र मानसिक ताणतणावामुळे त्यांनी क्लास घेणं बंद केलं. त्यातून त्यांना कडक भाकरीचा उद्योग सुरू करण्याची कल्पना सुचली.
कडक भाकरी कोण विकत घेणार असे म्हणून सुरुवातीला लोक त्यांची चेष्टा करू लागले.

त्यांनी सोलापुरातील प्रसिध्द पेठे यांच्या दुकानात ज्वारीच्या कडक भाकरी विक्रीस ठेवल्या. ग्राहकांनी भाकरी घेतल्या तर ठेवू असे आश्वासन देऊन त्यांनी त्या कडक भाकरी आपल्या दुकानात विक्रीस ठेवून घेतल्या.

चुलीवरच्या पापडी सारख्या दिसणार्‍या कडक भाकरी चविष्ट असल्याने संध्याकाळपर्यंत भाकरीची सर्व पाकीटं संपली. यामुळे लक्ष्मी यांचा उत्साह आणखीन वाढला. पुढे त्या दररोज कडक भाकरी दुकानात विक्रीस देऊ लागल्या. लक्ष्मी यांच्या कुरकुरीत खमंग भाकरी पाहता-पाहता सोलापुरात प्रसिद्ध झाल्या.

२०१२ साली संतोषीमाता गृहउद्योग या नावाने घरगुती उद्योग सुरू केला. बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पाच लाखांचे मुद्रा लोन कर्ज घेऊन मोठा उद्योग सुरू केला. हळूहळू कडक भाकरीच्या उद्योगाने वेग धरला. शहरातील हॉटेल, ढाबे, दुकाने येथे भाकरी पोहोचू लागल्या.

सोलापुरातील रहिवासी या भाकरी परराज्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पाठवून देऊ लागले. तसेच जे मूळचे सोलापूर राहत आहेत आणि सध्या परदेशात स्थायिक झाले आहेत असे लोक भाकरीची मागणी करू लागले. प्रकाश नावाचे विक्रेते सोलापूरच्या कडक भाकरीची मुंबई येथे मागणी करून पुढे ते अमेरिकेतील नागरिकांना मागणीनुसार पाठवतात.


बाजरीची भाकर पाच तर ज्वारीची भाकर चार रुपयाला विकतात. एका पाकिटामध्ये प्रत्येकी पाच नग असतात. आज त्यांच्या गृह उद्योगांमध्ये तिळाच्या कडक भाकरी, शेंगा चटणी, शेंगा लाडू, जवस चटणी, कुरडय़ा, पापड्या, सांडगे, वाफेवरचे पापड्या, शेवय्या तयार केले जातात. या कडक भाकरीच्या उद्योगात त्यांचा मुलगा आणि मुलगी देखील त्यांना सहकार्य करतात. या लघु उद्योगांसाठी सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्र वेळोवेळी मार्गदर्शन करत असल्याचे लक्ष्मी यांनी सांगितले.

रोज ५ हजार भाकरी तयार होतात.

दोन महिलांनी मिळून सुरू केलेल्या या उद्योगात आज त्यांच्याकडे वीस महिला रोजंदारीवर काम करतात. रोजगार म्हणून एका महिलेस एका भाकरीला एक रुपया दिला जातो. पूर्वी साठ पैसे दिले जायचे. गृह उद्योगात काम करणाऱ्या महिलेला आदी प्रशिक्षण दिलं जातं. भाकरीचं पीठ कसे मिळायचे, त्या कशा थापायच्या या विषयी माहिती दिली जाते. आणि त्यानंतर त्यांना काम दिले जाते. दररोज ५ हजारपेक्षा अधिक कडक भाकरी बनवल्या जातात.

लक्ष्मी कष्टाच्या जोरावर स्वावलंबी बनल्या.

उद्योगाविषयी केवळ जुजबी ज्ञान आणि अफाट कष्ट करण्याची मानसिकता या जोरावर त्यांनी या उद्योगाला यशाची भरारी दिली आहे. या उद्योगाच्या जोरावर त्या स्वावलंबी बनल्या. ज्या भाड्याच्या घरात राहून त्यांनी उद्योग सुरू केला होता आज तेच घर विकत घेऊन त्याच ठिकाणी तीन मजली मोठा बंगला बांधला.

याचसोबत त्यांनी त्यांच्या पतीला स्कूल व्हॅन देखील घेऊन दिली आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेल्या लक्ष्मी यांचं कौतुक अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन केला आहे. लोकमंगल फाऊंडेशनने असामान्य महिला हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here