आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सोलापूरचा हा युवक गेल्या 16 वर्षापासून विषमुक्त शेतीसाठी मौल्यवान देशी बियाणांचा संग्रह करतोय…


भरघोस उत्पादन घेण्यासाठी संकरित बियाणांचा वापर करुन घसघशीत नफा कमाविण्याकडे अलीकडील शेतकर्‍यांचा कल आहे. उत्पादन वाढवण्यासाठी संकरित बियाणांचा वाढलेला वापर आणि रासायनिक खतांचा अतिरेक कमी व्हावा, यासाठी एक युवक देशी पारंपरिक बियाणांचा संग्रह करत आहे. यासह सेंद्रिय शेतीला चालना देत ते देशी बियाणांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करणाऱ्या या युवकाचे नाव अनिल गवळी असं आहे.

अवघे आठवीचे शिक्षण घेतलेला अनिल यांची सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर पोखरापूर इथे त्यांची ४ एकर पारंपरिक शेती. २६ वर्षीय अनिल याने आपल्या गाईच्या गोठात देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने तो गेल्या १६ वर्षापासून देशी बियाणांवर काम करत आहेत. फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला यासह अशा एकूण ३०० दुर्मिळ देशी बियाणांचा संग्रह मोठ्या कष्टाने केला आहे.

new google

अनिल यांच्यापूर्वी त्यांचे आजोबा पारंपरिक बियाणांपासून शेती करायचे. मिश्र शेतीतून विविध बियाणांचे जतन व संवर्धन करायचे. आज याच पारंपरिक बियाणांच्या जागी हायब्रीड बियाणांनी जागी घेतली आहे. त्यामुळे पारंपरिक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने ती संवर्धन करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून काम सुरु केले. ही बियाणे दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काही वेळ राखेत मिसळून किंवा कडूलिंबूच्या हिरव्या पानात ठेवतात. बियाणे ओलसर होऊ नये, यासाठी गाईच्या गोठ्यात व्यवस्था करण्यात केली आहे.

शेती

‘बियाणे द्या आणि देशी बियाणे घ्या’ या तत्त्वावर राज्यभरात विविध ठिकाणी होणार्‍या कृषी प्रदर्शनात अनिल सहभागी होतो. शेतकर्‍यांना देशी बियाणांचे महत्त्व पटवून देतो. एखाद्याकडे वेगळे बियाणे मिळाले तर ते घेऊन त्या बदल्यात आपल्याकडचे बियाणे त्याला मोफत देतात. बियाणे घेण्यापूर्वी ते देशी आहेत की नाही याची शहानिशा करतो. यातूनच त्याच्या बियाणे संग्रहामध्ये वाढ होण्यास मदत होते. यासोबतच बियाणांचा प्रसार होण्यासाठी दहा ग्रॅमचे पाऊच बनवून त्याची २० रुपयात विक्री करतो.

आरोग्यवर्धक असलेली पारंपरिक देशी बियाणे संग्रहित करण्याची आवड मला आजोबापासून निर्माण झाली. देशी बियाणांत उच्च दर्जाची पोषणमूल्ये असतात. खाण्यास चवदार देशी बियाणे टिकली तरच अन्नसुरक्षा टिकेल तसेच ही बियाणे कोणत्याही वातावरणात तग धरुन राहतात, असे मला वाटते म्हणून मी देशी बियाणांच्या संग्रहाची सुरूवात केली. आज जवळपास तीनशे देशी बियाणाचे वाण माझ्या संग्रहात आहेत. महाराष्ट्रात देशी पारंपरिक बियाणे साठवून ठेवणार्‍यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ती संख्या वाढली पाहिजे असं अनिल गवळी सांगतात.

ही बियाणे आहेत संग्रहीत.

सोलापूरची दगडी ज्वारी, मराठवाड्यातील देशी तूर, लाल पिवळी ज्वारी, जळगावची दादरा, पिगेली, वळी, मोहरी, काळा गहू, काळा हुलगा, घुंगरू भुईमूग, कणसाचे लाल दाणे असलेली बाजरी, हादगा, शेवगा, काळा वटाणा, लाख, हरभरा, उडीद, तीळ यांचे विविध प्रकार, काटेरी, भरताचे, हिरवे, काटेरी, वांगे, तूप वांगे, हिरवी, पांढरी-काटेरी काकडी, काशी भोपळा, काळा आणि लाल पावटा, पांढरा, लाल मोठा वाल, गोल, काशी, चेरी टोमॅटो, काळा वाटाणा या सारखा भाजीपाला, लाल वेलीची चवळी, एरंड, जवस, कारळे, पिवळी, लाल-काळा-पिवळा झेंडू, झुडपी चवळी, लाल-काळी-पांढरी फररसबी, काळी मोहरी, लाल कांदा, राजगिरा, खपली गहू, काळा कुसळीचा गहू यासह अनेक पिकांची बियाणे संग्रहीत आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here