आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम | युट्यूब
===
नोकरी सोडून तरुण वयात उभी केली कंपनी: वर्षांला होतेय लाखोंची उलाढाल..
सोलापूर – उच्च शिक्षण घेऊन भल्यामोठ्या पगाराची नोकरी मिळवून सुखानं आयुष्य जगायचं असं स्वप्न हल्लीची तरुणाई पाहते. उद्योगासाठी लागणारे भांडवल, नफा-तोटा, चढ उतार होणारे बाजारभाव यामुळे तरुणाई उद्योगात उतरण्याचे धाडस फारसे करत नाही असं चित्र दिसून येतं पण याला छेद देत एका तरूणाने ‘बिझनेस’मध्ये अभिरुची असल्याने नोकरी सोडून चक्क स्वत: ची कंपनी उभी केली आहे. डिग्री घेऊन नोकरीच्या पाठीमागे धावणार्या युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. ही कहाणी आहे ३२ वर्षीय विशाल ओव्हाळ या जिगरबाज तरूण प्राध्यापकांची.
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेलं पिंपळवाडी गाव. जेमथेम एक हजारांच्या आसपास लोकसंख्या. पेशाने प्राध्यापक असलेल्या विशाल यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून स्वत:च्या गावात उद्योग सुरू केला आहे. २०१८ साली रुक्मिणी पॅकेजिंग नावाची बॉक्स बनवण्याची कंपनी सुरू केली.
आज त्यांच्या उद्योगाची वाटचाल यशाच्या दिशेने होत असून प्राध्यापकाची नोकरी सोडण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता हे दाखवून दिले. विशाल यांनी आपले प्राथमिक शिक्षण पिंपळवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले तर लातूर येथून डिप्लोमा आणि कोल्हापूर येथून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांची आई गृहिणी तर वडील माजी सैनिक.
शिक्षणानंतर विशाल कोल्हापूर विद्यापीठात ‘सीएचबी’ वर प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दोन वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी देखील केली. गावातच राहून काहीतरी उद्योग व्यवसाय करावा असा विचार सतत घोळत होता. बिझनेसची आवड असल्याने त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देईना अखेर नोकरीचा राजीनामा दिला.
तसेच गावकडे एकटे असलेले आईवडील यांचाही सांभाळ व्यवस्थित करता येईल, या विचाराने ते बार्शीकडे मार्गस्थ झाले. विशाल यांच्या नातेवाईकाची पुठ्ठ्याचे बॉक्स बनवण्याची कंपनी होती. अशीच कंपनी गावात सुरू करण्याचा त्यांनी निश्चय केला. कंपनी सुरू करण्यापूर्वी नाशिक येथील नातेवाईकांकडून मार्गदर्शन घेतलं.
विशाल यांनी सुरुवातीला तेलाचा व्यवसाय करण्याचा विचार केला. नंतर पुठ्ठ्याचे बॉक्स बनवण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली. यासाठी त्यांनी यूट्यूब चा आधार घेत ते कसे बनवले जाते याचे ज्ञान आत्मसात केले. जवळपास पंधरा दिवस याची संपूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर पुठ्ठय़ाचे बॉक्स बनवण्याची कंपनी सुरू करण्याचा निश्चय केला. कंपनी सुरू करण्यासाठी बीज भांडवल आणि जागेची गरज होती.
विशाल यांची उद्योगातली अभिरुची आणि निश्चय पाहून त्यांच्या मदतीला जिल्हा परिषद शाळेतले गुरुजी धावून आले. गुरुजींनी शिराळे येथील तीन गुंठ्याची जागा पत्रा शेडसह बिझनेस उभा करण्यास देऊन सहकार्य केले.
बॉक्सला राज्यभरातून मागणी
सर्वांकडून मदत मिळाल्याने विशाल यांचा बिझनेस सुरू करण्याविषयीचा उत्साह वाढला. स्वत: च्या नोकरीतून जमा केलेले आणि वडीलांचा पैसा बिझनेसमधे गुंतवण्याचे ठरविले. बँक ऑफ इंडियाकडून पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेतून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या सर्व पैशातून त्यांनी पुठ्ठ्याचा बॉक्स बनवणारी कंपनी उभी केली.
विशाल यांनी इंजिनीअरिंगचं घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या उद्योगासाठी वापरला. आज त्यांच्या कंपनीत जवळपास १३ कामगार काम करतात. वर्षाकाठी ५५ लाखांची उलाढाल होते. त्यांच्या कंपनीत पाणी बॉटल अाणि फटाके ठेवण्याचे बॉक्स तयार केले जातात. अशा बॉक्सला राज्यभरातून मागणी होत आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण वाचा..
मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!