आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

वागज दाम्पत्याने दिला सामाजिक संदेश: सोशल मिडीयात कौतुकाचा वर्षाव


 

अनेकदा घरात मुलगी जन्माला आली की, पालक निराश झाल्याचे चित्र दिसून येते. काही सुशिक्षित वर्ग सोडला तर मुलगी जन्माला येऊ नये यासाठी हेतूपूर्वक प्रयत्न केला जातो. गर्भावस्थेत लिंगपरीक्षण करून कोवळ्या कळ्यांना खोडून टाकले जाते.

मुलगी परक्याचे धन असा विचार रुजलेल्या समाजात आता मानसिकता बदलत असल्याचे चित्र दिसून येते. याचे जिवंत उदाहरण सोमवारी शहरात पाहायला मिळाले. मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत करत वागज कुटुंबीयाने ‘मुलगी वाचवा’ हा सामाजिक संदेश दिला आहे.मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत करत वागज कुटुंबीयाने 'मुलगी वाचवा' हा सामाजिक संदेश दिला आहे.

सोलापूर शहर परिसरात राहणारे हर्षद वागज आणि त्यांची पत्नी आशा वागज हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वागज दाम्पत्याला कुशाग्र आणि ओझस नावाचे पहिले दोन्ही मुलेच आहेत. दोघांनाही मुलगी व्हावी अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. तिसरे अपत्य म्हणून त्यांना मुलगी झाली.

 

डॉ. आशा यांनी ९ मार्च रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिसरी मुलगी झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या जन्माचे स्वागत जंगी करण्याचे दोघांनी ठरवले. हॉस्पिटलमधून मुलगी आणि आईला घरी येऊन घेऊन येताना डॉ. हर्षद यांनी  जल्लोषात स्वागत केले.

मायलेकीच्या स्वागतासाठी चारचाकी गाडीला फुलांनी सजवले होते. घरामध्ये प्रवेश करताना फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या. भलीमोठी नक्षीदार रांगोळी काढून परिसर सजवण्यात आला होता. ‘ज्या घरी मुलगी जन्माला आली त्या घरी लक्ष्मी आली’ हा संदेशदेखील रांगोळीतून लिहिला होता.

यावेळी घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधले. औक्षण करून माय-लेकीचे घरात स्वागत केले. परिसरार मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. या अनोख्या आनंदोत्सवाची चर्चा शहरात होत अाहे.

‘पहली बेटी धन की पेटी, दुसरी बेटी तूप रोटी असं सांगून घरात जन्माला येणाऱ्या लेकीचं स्वागत करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीने घालून दिली आहे. मुळातच मुलामुलीत फरक न करता मुलीच्या जन्माचं स्वागत करायला सांगणारा हा विचारच खूप महत्त्वाचा आहे. याच विचाराला अधिक सशक्त करण्याचं काम वागज कुटुंबियांनी केले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा विचार रुजविण्यासाठी वागज कुटुंबाने टाकलेले पाऊल हजारो पालकांची मानसिकता बदलण्यास मदत होणार आहे.

मातृशक्तीचा झाला सन्मान

जितक्या श्रद्धेने आणि निष्ठेने आपण गौरीचे पूजन करतो  तितक्याच श्रद्धेने आणि अंत:करणाने आपल्या घरी जन्माला येणार्‍या मुलीचे  स्वागत केल्यास तो प्रत्येक दिवस हा गौरी पूजनाचा असेल या आशयाचा फलक घरासमोर वागज डॉक्टरांनी लिहून ठेवला होता. मातृशक्तीचा आदर करत वागज कुटुंबीयांनी या मायलेकींचे केलेले स्वागत म्हणजे समाजापुढे एक आदर्श आहे. आज खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा झालेला सन्मान हा विकृत मानसिकतेला चपराकच म्हणावी लागेल.

 

आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा दिवस

एखादी स्त्री हा प्रत्येक कुटुंबाचा पाया असते. जर त्या स्त्री चे जन्मांपासूनच स्वागत केले तर नक्कीच तो पाया भक्कम होत जातो.आमच्या घरी एक परी जन्मांला आली आणि आमचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले. त्या परीचे, आमच्या स्वप्नाचे आम्ही अभूतपूर्व स्वागत केले. मुलीसाठीची आमची तळमळ व इच्छेने आम्हाला हे सुख मिळवून दिले आहे. हा दिवस आमच्या आयुष्यात सुवर्णअक्षराने लिहिला जाईल यात शंका नाही. सजवलेली गाडी, या फुलांनी सजवलेल्या पायघड्या, उमटवलेले पहिले पाऊल हे सर्वच अभूतपूर्व होते. याच अभूतपूर्व क्षणांनी आमचा प्रवास सुरु झाला आहे. असं मत डॉ. हर्षद वागज यांनी यावेळी  व्यक्त केलं

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here