आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आईच्या पेन्शनच्या पैश्यातून नदी वाचवण्यासाठी धडपडतोय हा तरून जलदूत …!


 

उस्मानाबाद जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या बोरी नदीच्या खोलीकरणासाठी एका जलदूताने कंबर कसली आहे. मरणासन्न अवस्थेत असलेली बोरी नदी पुनर्जीवित करण्यासाठी आईच्या पेन्शनमधून नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. गेल्या ३८ दिवसांपासून गाळ काढणे आणि नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. शेकडो वर्षांपूर्वी बारमाही वाहणार्‍या या नदीला पुन्हा जीवदान देण्यासाठी झटणाऱ्या जलदूतचे नाव पंकज शहाणे असं आहे.

new google

तुळजापूर तालुक्यात राहणारे लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे यांनी आपल्या आईची दोन महिन्यांची पेन्शन आणि स्वत:च्या कमाईचे पैसे घेऊन हे काम हाती घेतले. त्यांची आई सुषमा शहाणे यांनी दोन महिन्यांची पन्नास हजार रुपयांची पेन्शन दिली. त्या गेल्या पाच वर्षांपासून आपल्या पेन्शन मधील काही रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करतात. तसेच नदीच्या खोलीकरणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले होते. दानशूरांनी सकारात्मक प्रतिसाद देत रोख स्वरुपात रक्कम दिली. नदीच्या खोलीकरणासाठी १ लाख ८० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.

बोरी या नदीचे उगमस्थान बोरी या गावात आहे. या नदीचा प्रवास जवळपास ३२ किलोमीटर आहे. तासाला ८०० रुपये भाडे देऊन रोज आठ ते नऊ तास जेसीबीच्या साह्याने खोलीकरण सुरु आहे. आतापर्यंत साडेसात किलोमीटर पर्यंत नदीचे खोलीकरण आणि गाळ काढून झाले आहे. बोरी गाव, धाकटे तुळजापूर, तुळजापूर, बारुळ या गावापर्यंतचे एकूण २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मागील महिन्यातील १७ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. खोलीकरणाच्या झालेल्या या कामातून नदीच्या पात्रात १२ कोटी लिटर पाणी साठवू शकते, अशी माहिती जलतज्ज्ञांनी दिली आहे.

जवळपास १४ गावातून वाहण‍ारी बोरी नदी तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यातून वाहत जात कुरनूर डॅमला मिळते. ही नदी झाडे-झुडपे आणि गाळामुळे पूर्णतः नामशेष होण्याच्या मार्गावर होती. या कामांमुळे नदीला पुनर्जीवन मिळेल. आजही संपूर्ण तुळजापूर तालुका या नदीवर अवलंबून आहे.

नदीचे खोलीकरण झाल्याने आजूबाजूच्या विहिरीला पाणी तर लागणारच आहे, शिवाय मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल. परिसरातील शेती आणि नदीची परिसंस्था यामुळे जीवित राहणार आहे. उस्मानाबाद हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. आपला जिल्हा पाणीदार व्हावा, यासाठी हे काम जलदूत श्री. शहाणे यांनी हाती घेतलं आहे.

जलदूत

तालुका जलदूत म्हणून निवड.

पंकज शहाणे यांचे बोरी नदी खोलीकरणाचे उत्स्फूर्त कार्य बघून प्रशासनाने त्यांची तालुका जलदूत म्हणून निवड केली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ अंतर्गत व महाराष्ट्र शासन यशदा जलसाक्षरता केंद्र अंतर्गत ही निवड झालेली आहे. महाराष्ट्र यशदा चे कार्यकारी संचालक हेमंत पांडे व कार्यकारी अभियंता श्री आवटे यांनी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे काम करण्यास अधिक ऊर्जा मिळेल अशी प्रतिक्रिया पंकज शहाणे यांनी दिली.

शासन-प्रशासनाने दखल घ्यावी

तुळजापूर तालुक्यात मी स्वच्छतादूत म्हणून आणि विविध समाजोपयोगी कामे केली आहेत. दरवर्षी आम्ही संस्थेच्या माध्यमातून विहिरी आणि कुंडे स्वच्छ करण्याचे काम करायचो. यंदाच्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्य़ाची जलवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बोरी नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. आईची पेन्शन आणि लोकांनी दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे हे काम शक्य झाले.

आता प्रशासन- शासनाने याची दखल घेत पुढील काम केल्यास बोरी नदीला ऊर्जितावस्था मिळेल असं पंकज म्हणतात.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here