आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

संघर्षाला सलाम: विधात्याने पाय हिरावले, मित्राने जगायला शिकवले.

वडिलांचे छत्र हरपलेले, अपघातात दोन्ही पाय कायमचे अधू झालेले, डॉक्टरांनी आशा सोडलेली, केवळ आईचा एकमेव सहारा, आयुष्यापुढे अंधार पसरलेला, पत्र्याच्या घरात पाठीवर तीन वर्ष राहून वाटी एवढय़ा जखमा झालेल्या, मृत्यूला सामोरे जावे लागण्याची स्थिती या साऱ्यावर मात करत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात अद्भुत व अविश्वसनीय भरारी घेतली. ही थक्क करणारी कहाणी आहे राजकुमार पाटील यांची.

सध्याच्या व्याधिग्रस्त आणि चिंताग्रस्त राहणार्‍या युवकांना श्री पाटील यांची कहाणी जितकी प्रेरणादायी आहे तितकी ती ऐकताच अंगावर काटा आणणारी आहे. येणार्‍या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जात आयुष्यात पुन्हा उभे राहत स्वत: च्या जीवनाला नवसंजीवनी दिली. आयुष्याला कंटाळलेल्या पाटील यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न करा, पण ‘दैव तारी त्याला कोण मारी’ याप्रमाणे नियतीनं राजकुमार यांना पुन्हा जीवन जगण्याची  दिली.

राजकुमार पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावचे रहिवासी. त्यांनी भौरम्मा पाटील यांच्या मदतीनं संगमेश्वर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एम.ए., बी.एड.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी देखील मिळाली. त्यादरम्यान त्यांचे लग्न झाले.

new google

लग्न होऊन एका वर्षातच त्यांच्या सुखी संसारावर नियतीने घाला घातला. २५ मे २००६ रोजी दुचाकीवरून गावाकडे जात असताना टेंभुर्णीजवळ कंटेनरने त्यांना उडवले. दोन तास रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाटील यांना काही वेळाने दवाखान्यात दाखल केले.

वैद्यकीय उपचारासाठी त्यांना सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात आणले. सोलापुरात त्यांचे उपचार होत नसल्याचे सांगून त्यांना पुण्याला पाठवून देण्यात आले. जीव वाचेल या आशेने त्यांना पुण्यात उपचारासाठी घेऊन आले, पण तिथेही त्यांच्या हाती निराशाच लागली.

श्री. पाटील हे काही दिवसांची सोबती आहे, असे सांगून घरी पाठवण्यात आले. कारण त्यांचा कमरेखालचा संपूर्ण भाग हा निकामी झाला होता. यातच सुदैवाची बाब म्हणजे डोक्यावर हेल्मेट होते म्हणून त्यांचा जीव वाचला.

वैद्यकीय खर्च करून जीव मेटाकुटीला आला होता. जीवन पुन्हा मिळणार नाही, याची आशा मावळली होती. कारण केवळ आईचा धीर यापलीकडे त्यांच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. जीवन-मरणाच्या तारेवरील कसरत सुरू होती. त्यातच पत्नीदेखील गरोदर असल्याने माहेरी गेलेली होती.

मित्र

अंथरुणात लोळून पडलेल्या राजकुमारांची उठाठेव आईच करायची. त्या प्रसंगात त्यांना बाप होण्याची खुशखबर आली. ते एका मुलीचे बाप झाले, पण परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्यांना भिक्षा मागण्याची वेळ आली होते.

मित्राने दिला मदतीचा हात

इतिहासात कृष्णा आणि सुदामा यांच्या मैत्रीच्या कहाण्या खूप प्रसिध्द आहेत. या कठीण प्रसंगात देवाने जगण्यासाठी आयुष्य दिले तसे कृष्णासारखे मदत करणारे मित्रदेखील गवसले. मुंबईचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मदत केली. मित्राच्या सहकार्यामुळे लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले.

शरीराने साथ दिल्याने उपचारही यशस्वी होत होता. आजारातून बरे झाल्यावर त्यांनी खाजगी शिकवणी घेत आर्थिक स्थैर्य मिळविले. एकंदरीतच मित्रामुळे त्यांचा पुनर्जन्म झाला. पुढे पाटील यांनी कठीण प्रसंगी मैत्रीचा हात न सोडणाऱ्या मित्राचे नाव त्यांनी आपल्या शाळेला दिले.

शिक्षकापासून ते संस्थाचालकांपर्यंत चा प्रवास

खचलेल्या मनातून स्वत:ला सावरून राजकुमार यांनी २०१२ साली श्रेया मल्टिपर्पज संस्था तर २०१५ मध्ये डॉ.एस. बी. इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. शिक्षकापासून ते संस्थाचालक असा त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. आयुष्याला जगण्याचे बळ मिळाले. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा सासरी परतली. त्यांचा संसार पुन्हा नव्याने उभारला.

सध्या पुणे येथे राजकुमार पाटील हे स्वत: च्या संस्था आज व्यवस्थित चालवित आहेत. जो माणूस आयुष्यभर पायाने चालू शकत नव्हता, तो आज मृत्यूवर मात करून स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभा आहे. शरीराची तूसभरही साथ नसतानाही त्यांना नियतीनं जगण्याचे मार्ग दिले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here