आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बार्शी शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर कोरफळे- पानगाव रोडवरील निर्मनुष्य अशा उजाड माळरानावर स्नेहग्राम ही संस्था वंचित मुलांसाठी कार्य करत आहे. स्थलांतरित मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, यासाठी पालांतून सुरु झालेला प्रवास आता निवासी शाळेपर्यंत पोहचला आहे. वंचित व दुर्लक्षित मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्नेहग्राम प्रयत्नशील आहे.

महेश

सुरुवातीला बार्शीत मराठवाड्यातून, राजस्थानहून आलेली स्थलांतरीत कुटूंबातील मुलं भीक मागणं, बालमजुरी करणं, व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी महेश निंबाळकर यांनी सन २००७ ला “भटक्यांची शाळा” सुरु केली. अनौपचारिक शिक्षणाबरोबर मुलींचे आरोग्याचे प्रश्र, महिलांचे बाळंतपण, आरोग्य शिबीरं, रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचे दाखले अशा अनेक प्रश्नांवर स्नेहग्रामनं चौफेर काम सुरु केलं.

new google

मात्र कुटुंबाचं अन्यत्र स्थलांतर झालं की काम ठप्प व्हायचं, त्यामुळे मुलांना पालांतून बाहेर काढून गुणात्मक शिक्षण देण्यासाठी शाश्वत मार्ग शोधावेत, यासाठी मनात खलबत सुरु झाली. त्यात निवासी शाळेचा पर्याय पुढे आला.

खांडवीत १५ जून २०१५ रोजी  निवासी शाळा सुरु झाली. परंतु वर्षभरातच स्थलांतरीत घटकांवर काम करणाऱ्या संस्थेला दुप्पट भाडेवाढीमुळे स्थलांतरीत होण्याची वेळ आली. भविष्यात अशी अडचण उद्भवू नये, या विचारातून कुटुंबातील सर्व पैसा संस्थेसाठीच्या जागेसाठी गुंतवायचा ठरवलं. त्यांनतर कोरफळे गावाच्या माळरानावर ३ एकर जागा घेतली.

सौ. विनया आणि श्री. महेश निंबाळकर या दांपत्याच्या वतीने भटक्या, वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘स्नेहग्राम’ हा निवासी शाळेचा प्रकल्प सुरु झाला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपल्या सरकारी शिक्षकी पेशाचाही त्याग केला आहे.

भीक मागणारी, शाळाबाह्य, अनाथ, लैंगिक शोषण झालेली, कैद्यांची मुले निंबाळकर दांपत्याने पालावर स्वतः फिरून गोळा केली. त्यांना शिक्षणाची गोडी लावली. मात्र पूर्णवेळ निवासी प्रकल्प उभा केल्याखेरीज अपेक्षित उद्दिष्ट साध्य होणार नाही हे ओळखून त्यांनी ‘स्नेहग्राम’ची स्थापना केली.

अजित फाऊंडेशन, बार्शी संचलित स्नेहग्राम विद्यालय, कोरफळे ही स्वयंअर्थसहाय्यित शाळा असून लोकाश्रीत आहे. संस्थेला शासनाकीय अनुदान मिळत नाही. स्नेहग्राम उभारणीसाठी सुरु असलेल्या प्रामाणिक धडपडीची दाखल घेत आनंदवनचे प्रणेते असणाऱ्या आमटे परिवारानेही घेतली. डॉ. विकास आमटे व श्री. कौस्तुभ आमटे यांनी निंबाळकर दांपत्याला मदतीचा हात दिला.

लोकशाही शाळेचा प्रयोगही यशस्वी

स्नेहग्राममध्ये वेगवेगळी पार्श्वभूमी असलेली ४० मुलं ही वयानुरुप प्रवेशित आहेत. चाकोरीबद्ध शिक्षणाला फाटा देत निरनिराळे प्रयोगाद्वारे मुलांना विकसित करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. यासाठी चार भिंतीच्या बाहेरचे शिक्षण व शिक्षणातील आधुनिकता यांचा मेळ साधून व्हर्च्युअल क्लास, व्ही. आर. लायब्ररी, टॅब स्कुल, (१००० वृक्ष लागवड व संवर्धनातून उभारलेली ) हिरवी शाळा; तसेच लोकशाही शाळेचा प्रयोगही यशस्वी केला. त्यात प्रामुख्याने स्नेहग्राम पंचायत. सरपंच व इतर सदस्यांसह तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसभा, ज्युडिशिअल कमिटी, निधी कमिटी निर्माण केल्या.

महेश

स्नेहग्रामाला हवीय आधाराची गरज..!

सध्या स्नेहग्राममध्ये ५ टिनशेड पत्र्याच्या वर्गखोल्या असून मुलांनां स्वतंत्र निवासाची सोय नाही. या पार्श्वभूमीवर प्रिसिजन समूहाच्या सीएसआर फंडातून निवासी शाळेची एक वर्गखोली व शिक्षक निवास यांचा भूमीपूजन नुकतेच करण्यात आहे. अजून भौतिक सुविधांची नितांत गरज आहे. यासाठी समाजातील दातृत्वसंपन्न हातांची खरी गरज आहे. तेव्हा दात्यांनी वाढदिवस, प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधकामासाठी आर्थिक किंवा वस्तुरूप मदत करण्याचे आवाहन स्नेहग्रामनं केलं आहे. आता स्नेहग्रामचा निवारा आकार घेतो आहे. आपलेही योगदान हवेच ना..!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला  होता हा भारतीय जवान! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here