आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

डोळ्याने दिव्यांग असलेल्या युवकाची भन्नाट कला;देशभरातून कलेला मिळतेय दाद


 

सोलापूर : झाडाच्या पानांसाठी हलकासा आघातही चुरा होण्यासाठी पुरेसा ठरतो. मात्र सोलापूर जिल्ह्यातला, अदभूत प्रतिभा लाभलेल्या एका दिव्यांग कलाकाराने झाडाच्या पानांवर छोट्या सुरीने कोरीव काम करून भन्नाट कलाकृती जन्मास घालतो. झाडाची पानं कोरून विविध सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती तो साकारत आहे. त्याच्या या कलाकृती तो समाज माध्यमांद्वारे अनेकांपर्यंत पोहोचत असून त्याच्या अनोख्या कलेला देशभरातून दाद मिळत आहे. महेश म्हस्के असं या कलाकाराचे नाव आहे.

 

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जामगावमध्ये वास्तव्यास असलेला २६ वर्षीय महेश म्हस्के पानांवर विविध नावे, निसर्गदेखावे व व्यक्तींच्या छबीसुद्धा हुबेहूब साकारू शकतो. मनात सुचलेल्या विषयानुसार, तो नैसर्गिक रूपातील पानाची निवड करतो. या कामासाठी रस्त्यावर पडलेली पानेही त्याला चालतात. आपल्या चिमुकल्या हत्यारांव्दारे बदाम, वड, पिंपळाच्या पानांवर तो खास कलाकुसर दाखवून ही कलाकृती तो साकारतो. पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावर रेखाटलेली व्यक्तींची अप्रतिम रेखाचित्रे तर भान हरपणारीच ठरत आहेत.

महेश

महेश यांचा परंपरागत शेतीचा व्यवसाय, मात्र कलेवर जिवापाड प्रेम. या प्रेमातूनच चित्रकलेचे शिक्षण घेत आज कलाकार म्हणून कार्यरत असताना त्याच्यातील कलाकार त्याने जिवंत ठेवला.

वास्तविक पाहता महेश हा एक व्यावसायिक चित्रकार आहे. तो जन्मताच एका डोळ्याने दिव्यांग अाहे. बालपणापासून त्याला चित्रे काढण्याची आवड आहे. चित्रे काढत असताना त्याने त्याच्या कल्पकतेतून झाडांच्या पानांवर चित्रे काढण्यास सुरुवात केली. पुढे झाडाच्या पानावर चित्र रेखाटणं हा त्यांचा छंदच बनला. विरंगुळा म्हणून जोपासल्या जाणाऱ्या छंदातूनच अनेकदा अप्रतिम कलाकृती जन्म घेत आहेत.

 

महेशची ही कला खरच वाखाणण्याजोगी असून ग्रामीण भागातही प्रतिभावंतांची कमी नसल्याचे त्याने दाखवून दिले आहे. सध्या तो व्यक्तिचित्रे काढून मिळालेल्या पैशातून तो आपला उदरनिर्वाह करतोय. याचबरोबर तो पुण्यात चित्रकलेचे खाजगी क्लासेस घेतोय. चित्रकलेत त्याने पांडुरंग फराळ, सचिन बुरांडे, पुण्याचे शिल्पकार सुनील देशपांडे यांच्याकडून धडे गिरवले आहेत. या सर्व प्रवासामध्ये, आई-वडील, भाऊ, सर्व मित्र परिवार, गुरुवर्य अशा सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले, असे महेशने सांगितले.

 

माजी मुख्यमंत्र्यांनी थोपाटली पाठ.

 

महेशने लॉकडाऊनमध्ये पिंपळाच्या पानावर कोरीवकाम करण्याची एक वेगळीच कला विकसित केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेशने पिंपळाच्या पानावर काढलेल्या कलाकृतीचे कौतुक केले. अाज सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाना त्याच्या कलेने भुरळ घातली आहे. कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या नामवंत मान्यवरांच्या घरी त्याची कला पोहोचलेली आहे. नजरेत भरणारी त्याची ही चित्रे काही डोळसांच्या नजरेत म्हणावी तशी भरत नसल्याने तो मागे पडत असल्याची प्रतिक्रिया महेशने दिली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here