आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

हजारो सापांना जीवनदान देणारे “शेखर’

१५ वर्षांपासून विनामोबदला सेवा: हॉटेल व्यवसाय सांभाळून पशु-पक्ष्य‍ांचीही देखभाल


 

साप हा शब्द केवळ उच्चारला तरी अनेकजण छाती फोडून घेतात. नजरेस पडला तर कित्येक जण मारण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण सर्पमित्रांच्या सहाय्याने त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न करतात. सोलापूर जिल्ह्यात देखील असेच एक सर्पमित्र आहेत, ज्यांनी लोकांच्या हाकेला धावून जात रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत हजारो सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून जीवदान दिले आहे. शेखर अर्जुन देशमुख असे या सर्पमित्रांचे नाव आहे.

 

३५ वर्षीय शेखर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातले मूळचे रहिवासी. ते १६ वर्षांचे असताना त्यांना फुरसे या विषारी सापाने दंश केला. यातून वेळीच उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला आणि पुनर्जन्म झाला. जीव वाचवण्यासाठी घरच्यांनी अतोनात पैसा खर्च केला. त्यानंतर त्यांनी सापांचा अभ्यास केला.

 

साप

सर्प तज्ज्ञांची शिबीरे व योगेश गाडे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी सापांविषयीच ज्ञान मिळवलं आहे. त्यानंतर त्यांनी सर्पमित्र म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लोकवस्तीत अथवा घरात साप अथवा नाग शिरल्यास सर्पमित्र शेखर यांना बोलावले जाते.

शेखर यांची या परिसरात सर्पमित्र म्हणून चांगली ओळख तयार झाली आहे. विषारी-बिनविषारी साप पकडण्यात त्यांचे कौशल्य आहे. एखाद्याच्या घरात साप आल्यानंतर त्याला योग्यरित्या पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम ते करतात. रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी शेखरला त्याचे मित्र अक्षय घोडके, ललित अग्रवाल, बालाजी देशमुख, दीपक कसबे, सौरभ गरड, गौरव साठे, ऋषी कापसे, शशिकांत भंगुरे हे सहकार्य करतात. सुरक्षीत साधनांचा वापर करत नाग, मण्यार, घोणस, फुरसे यासारख्या विषारी सापांना त्यांनी जीवनदान दिले. सर्पमित्राचे काम हे हौशी असले तरी जिवावर बेतणारे आहे.

पकडलेल्या प्रत्येक सापाची आधी नोंद ते स्वत: कडे ठेवायचे. मात्र, एका अपघातात त्यांचं हे रेकॉर्ड गहाळ झाले. त्यांच्याकडे प्रत्येक सापांचा अधिकृत रेकॉर्ड होता. शेखर हे व्यवसायाने हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचे बार्शी-सोलापूर रोड परिसरात हॉटेल आहे. साप पकडण्यासाठी कॉल आला, की वेळेचे भान न बाळगता गेले दशकभर विनामोबदला ते सेवा देत आहेत.

तसेच अनिमल फ्रेंड्स बार्शी ही संस्था चालवत आहे. सर्पसंवर्धन आणि सापांविषयी जनजागृतीचे हे निष्काम सेवादान ते वर्षानुवर्षे करत आहेत. साप पकडून जंगलात सोडणे, पशू-पक्षी जखमी असल्यास उपचार करून निसर्गात सोडण्याचे काम करतात.

सापांना मारू नका. -शेखर देशमुख (सर्पमित्र)

सर्पमित्र होण्याअगोदर सापांची ओळख करून घेणे गरजेचे आहे.

कोणता साप विषारी आहे किंवा कोणता बिनविषारी साप आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. पण नवीन सर्पमित्र स्टंटबाजी करतात त्यामुळे साप दंश करतो. साप पकडताना आपला जीवही तितकाच महत्वाचा आहे, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. आतापर्यंत मी अनेक साप पकडले असून ते जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहेत. कुणीही सापांना मारू नये, जर आपल्या परिसरात साप आढळून आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन शेखर यांनी केले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here