आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तंबाखू व्यसनमुक्तीची चळवळ राबविणारा ‘रामचंद्र’ व्यसनाने आयुष्य पोखरलेल्या लोकांना दिली नवसंजीवनी


 

बहुतांश वेळा दारु, सिगरेट, गुटखा व तंबाखू या पदार्थांच्या सेवनामुळे माणसाचं सुखी व निरोगी आयुष्य उध्वस्त होतं. हल्ली अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण देखील वाढतय. काही लोक आयुष्यात येणारे चढउतार व ताणतणाव यातून मोकळं होण्यासाठी तर दुसरीकडे श्रीमंतांमध्ये स्वतःची प्रतिमा उंचावलेली ठेवण्यासाठी व्यसन करताना दिसतात.

मात्र, व्यसनाची हीच गोडी आयुष्य पोखरते, असे आरोग्यतज्ज्ञ वारंवार सांगतात. या घातक व्यसनांच्या मायाजालात अडकलेल्या तरुणाईला समुपदेशनाद्वारे बाहेर काढण्याचे काम एक युवक करतोय. रामचंद्र वाघमारे असं त्याचं नाव आहे.

तंबाखू
तंबाखू

लहानपणापासूनच व्यसनाची झळा सोसलेला हा रामचंद्र मुळचा मोहोळ तालुक्यामधील अनगर या गावचा. कुटुंबामध्ये आई वडील, चार बहिणी, रामचंद्र आणि त्याचा मोठा भाऊ. त्याच्या वडिलांनी बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढले. कर्जाचा वाढता डोंगर पाहून वडिलांना ताणतणावामुळे तंबाखू, सिगारेट, दारूचे व्यसन जडले.

त्यामुळे घरात कायमचे तणावाचे वातावरण असायचे. वाढत्या कर्जापाई आणि घरातल्या त्रासाला कंटाळून मोठा भाऊ मुंबईला कामानिमित्त निघून गेला. घरातील तणावाचे वातावरण, कर्जबाजारीपणा यातून रामचंद्रची मानसिक कुचुंबणा होत होती. वडिलांचं व्यसन कसं कमी होईल?यावर तो विचार करायचा.

कौटुंबिक अनुभावातून रामचंद्रने एक निर्णय घेतला की, आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली तरी आपण व्यसन करायचे नाही. पदवीपर्यंतच शिक्षण त्याने गावामध्येच पूर्ण केले. समाजकार्याचे शिक्षण घेण्यासाठी त्याने गाव सोडले. समाजकार्याचे शिक्षण घेताना समाजातील व्यसनमुक्तीबाबत त्याने अभ्यास केला.

तंबाखू

मित्रांमध्ये विविध विषयावर चर्चा करीत असताना समाजातील युवकांच्या विविध अडचणी समोर आल्या. त्यातून सामाजिक संस्था सुरू करून याविषयी काम करण्याचा निर्णय रामचंद्र आणि त्याच्या मित्रांनी केला. सारथी युथ फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून युवकांच्या विविध प्रश्नांवर २०१० पासून कार्य सुरू केले.

ज्यामध्ये मानवी लैंगिकता, एचआयव्ही/ एड्स, गुप्तरोग, कौशल्य विकास आणि व्यसनमुक्ती याविषयावर काम सुरू झाले. व्यसनमुक्ती प्रकल्पाची सुरुवात रामचंद्रने आपल्या वडिलांच्या हस्ते केली. व्यसनामध्ये खूप प्रकार पडतात. सर्व विषयावर एकाच वेळी काम करणे अशक्य असल्याने तंबाखू व्यसनमुक्ती विषयावर २०१३ मध्ये काम सुरू केले.

तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पा अंतर्गत शाळा, महाविद्यालय आणि समुदाय स्तरावर तंबाखू व्यसनमुक्ती विषयी जनजागृती कार्यक्रम राबविले. ज्यामध्ये  किशोर व युवा अवस्थेतील युवकांना तंबाखू दुष्परिणामांविषयी माहिती दिली. सारथीच्या माध्यमातून मागील ११ वर्षामध्ये ३० हजारहून अधिक युवकांना समुपदेशनाचा लाभ मिळाला आहे.

 

व्यसनमुक्तीची सुरूवात कुटुंबापासूनच

रामचंद्रने व्यसनमुक्तीची सुरुवात आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून केली. समुपदेशाने वडील आणि मोठ्या भावाचे तंबाखूचे व्यसन सोडवले. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन व सारथी युथ फौंडेशन यांच्या वतीने तंबाखूमुक्त शाळा अभियान सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविले जात आहे. यातील काही शाळा आणि केंद्र सध्या तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. लहानपणी पाहिलेले व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न सारथी युथ फौंडेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे. तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचे त्याचे पुढील नियोजन आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे. ( संपर्क : 72766 77277)

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here