आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ग्रामीण भागात चैत्रपाडव्याला भारद्वाजाचे दर्शन घेण्याची परंपरा

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातला शुभ शकुन पक्षी


 

सोलापूर –  कुंभार कावळा, पाणकोंबडा, भाल्गुराम इत्यादी नावाने ओळख असलेल्या भारद्वाज पक्ष्याला शुभलक्षणी मानले जाते. या पक्ष्याचे दर्शन झाल्यास लोक पटकन हात जोडून वंदन करतात. हा पक्षी दिसला तर दिवस चांगला जातो अशी समजूत मानवीसमाजामध्ये आहे. चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यादिवशी या पक्ष्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामीण भागातील मंडळी पहाटेच्यावेळी रानावनात पायपीट करताना दिसतात. भारद्वाजाचे दर्शन घेण्याची ही प्रथा वर्षानुवर्षे प्रचलित आहे.

सोलापूर जिल्ह्यातील भीमा व सीना नदीच्या तीरावरील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील खेड्यापाड्यात तसेच सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील पूर्व भागात लोक गुढीपाडव्यादिवशी या पक्ष्यांच्या शोधात बाहेर पडण्याची प्रथा अद्याप टिकून आहे. पूर्वीच्या हैदराबाद कर्नाटक राज्यांचा भाग असलेल्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कन्नड भाषा बोलणाऱ्या काही खेड्यापाड्यात तसेच उत्तर कर्नाटकाच्या सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पाडव्यादिवशी भारद्वाजाचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले असतानाचे चित्र आजही पाहायला मिळते.

कोकिळ कुळातील हा देखणा पक्षी जंगली कावळ्या एवढ्या आकाराचा असतो. चकाकणारी काळी कुळकुळीत पाठ, लांब, रुंद व जाड चोच, लालभडक डोळे व तांबूस रंगाचे पसरट पंख आणि लांब शेपटी असे वैशिष्ट्य असलेला हा पक्षी नेहमी रंगतदार वाटतो. झाडाझुडपांच्या गचपणीत विशेष करून नदी-नाल्यांच्या किनारी एकेकटा किंवा जोडीने हे पक्षी आढळतात. या पक्ष्याला एकटे राहणे व फिरणे आवडते. क्वाक्.. क्वाक्.. किंवा क्लच..क्लच.. असा मोठा भेसूर आवाज काढत इतर पक्ष्यांना आपल्या पासून दूर हाकलण्यात तो फार पटाईत आहे.

भारद्वाजा पक्ष्याचे उडणे अतिशय सावकाश व थोड्याच अंतराचे असते. बऱ्याच वेळा हा पक्षी धीम्या पावलांनी चालण्यात दंग असतो. इंग्रजीत या पक्ष्याला क्रो फिजंट असे नाव आहे. शेतशिवारातील नाकतोडे,उंदीर, सरडे, प्रसंगी छोटे साप तसेच छोट्या गरीब पक्ष्यांची अंडी पिल्ले हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहेत. श्वसन नलिकेच्या विकारावर नामी औषध या पक्ष्यांमध्ये असते या गैरसमजूतीने वैदू लोकांकडून या पक्ष्यांची शिकार केली जाते.

 

मानवी अतिक्रमणामुळे भारद्वाज पक्ष्यांच्या संख्येत घट

होला, तितर, लाव्हा, टिटवी, धाविक, दयाळ, साळुंकी यासारख्या छोट्या पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करून त्यांच्या अंडीपिल्लांना पळविण्याच्या क्रूर वृत्तीचा हा पक्षी आहे.  जनमानसात या पक्ष्याला शुभ का मानतात याचा उलगडा होईना झाला आहे. या पक्ष्याच्या अधिवासात झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे हे पक्षी कमी होत चाललेले आहेत.

– डाॅ.  अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here