आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

सोलापूरच्या रक्तदात्याचा रक्तदानात विक्रम ! २२० वेळा रक्तदान करत अनेकांना दिले जीवनदान

वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत रक्तदान करण्याचा निर्धार


 

दान कोणतेही असो, दानशूर व्यक्तींच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नसते. तसेच दान करीत राहिल्याने जीवनाचे मोलही वाढते. सर्वदानात श्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाचा गौरव होतो. म्हणून एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल २२० वेळा रक्तदान करून सोलापुरातील एका रक्तदात्याने नवा विक्रम करत समाजात एक लौकिक प्राप्त केला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून  रक्तदान करून अनेक रुग्णांना जीवदान देणार्‍या या दात्याचे नाव अशोक नावरे असं आहे.

रक्तदान

शहरातील विजापूर रोड जवळील टेलिग्राफ हौसिंग सोसायटी परिसरात राहणारे ६३ वर्षीय अशोक नावरे यांना महाविद्यालयीन जीवनापासून रक्तदान करण्याची आवड आहे. वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे १९७५ साली त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. आतापर्यंत त्यांनी प्लेटलेट ४० वेळा तर १८० रक्तदान असे मिळून तब्बल २२० वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला आहे.

सर्वश्रेष्ठ दान मानल्या जाणाऱ्या रक्तदानात विक्रम नोंदवणारे श्री. नावरे यांनी केवळ सोलापुरातच नव्हे तर पुणे, नाशिक, जालना, लातूर, बीड यासारख्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी रक्तदान केले आहे. 

ए पॉझिटिव्ह असा रक्तगट असलेल्या श्री. नावरे यांनी कॉलेजच्या जीवनात रक्तपेढ्यांना भेट दिली असता रक्तपेढ्यांच्या समोर माणसांची रक्त घेण्यासाठी गर्दी लागल्याचे दिसले. अनेक गरजवंत लोक तेथे रक्तासाठी रक्तदात्याच्या पाया पडत होते. हे विदारक चित्र पाहून त्यांचे मन भावुक झाले.

आपणही रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवू शकतो, हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या दिवसापासून त्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली. ते केवळ रक्तदान करून थांबले नाहीत तर लोकांनी  रक्तदान करावे, यासाठी ते रक्तदान शिबिरे भरवून लाखोंच्या संख्येत रक्त बाटल्या संकलित केले.

रक्तदानात विक्रम करणारे नावरे यांनी रक्तदानाची गोडी आपली पत्नी लता नावरे आणि मुलगा प्रथमेश नावरे यांनादेखील लावली आहे. आतापर्यंत पत्नीने ५२ आणि मुलाने ९ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल श्री. नावरे यांचा महाराष्ट्र शासनाने ‘शतकवीर’ म्हणून प्रमाणपत्र आणि गौरव पदक देऊन सन्मानित केले.

रक्तदान

२२० वेळा रक्तदान करूनही त्यांची प्रकृती अत्यंत ठणठणीत आहे. आपली प्रकृती उत्तम राहावी, यासाठी ते दररोज साडेचार तास चालण्याचा व्यायाम करतात. श्री. नावरे हे दमाणी ब्लड बँकेत प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

रक्तदानामुळे मिळते मानसिक समाधान

वयाच्या १८व्या वर्षापासून मी रक्तदान करतो. वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत २५१ वेळा रक्तदान करण्याचा मी निर्धार केला आहे. रक्तदानामुळे मला मोठे मानसिक समाधान मिळते. उत्साह वाढतो. रक्तदानाची किंमत पैशात मोजता येत नाही. रक्तदान करण्यात माझे कुटुंबही आता पुढे येत आहे. समाजातही रक्तदान करण्याची मोठी जागरूकता निर्माण होत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here