आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

ट्री मॅन ऑफ इंडिया’: या धरतीपुत्राने कोणत्याही सरकारी पाठिंब्याशिवाय ५ लाख झाडे भेट म्हणून दिली आहेत.


 

लेखक: विकास पांढरे 

ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असे राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात विष्णू लांबा या धरतीपुत्राने कोणत्याही सरकारी पाठिंब्याशिवाय ५ लाख झाडे भेट म्हणून दिली आहेत. त्याने आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे ५० लाख झाडे लावली आहेत, १३लाख झाडे तोडण्यापासून वाचवली आणि ११ लाख झाडे पूर्णपणे विनामूल्य वाटली आहेत. हे अतुलनीय कार्य लक्षात घेऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या तरूणास ‘ट्री मॅन ऑफ इंडिया’ हे नाव दिले.

new google

झाडे

विष्णू लांबा याचा जन्म ३ जून १९८७ रोजी टोंक जिल्ह्यातील लांबा गावात झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून विष्णूने गुरेढोरे चारत असताना शेतात विविध प्रकारची झाडे लावायला सुरुवात केली. विष्णूला झाड लावयाचे इतके वेड जडले की कोणाच्याही घरातून झाडे चोरुन मोकळ्या जागेत लावत असे. त्याच्या सवयीने ग्रामस्थ आणि कुटुंब त्रस्त झाले. विष्णूची सवय बदलावी यासाठी त्याच्या परगावी (आत्याकडे ) पाठवले. पण निसर्गावर त्याचे प्रेम वाढतच गेले. यानंतर विष्णू नातलगासमवेत जयपूरला गेला तेव्हा तिथे त्याने जवाहर विभागाचे तत्कालीन जयपूर जिल्हाधिकारी श्रीमंत पांडे यांच्या निवासस्थानी असलेल्या नर्सरीमधील रोपटे चोरले.

 

विष्णूची ही चोरी पकडली गेली. जिल्हाधिकारी समज देताना म्हणाले, ” विष्णू, चोरी करणे वाईट आहे. मात्र झाडे लावणे चांगले आहे” असे म्हणून विष्णुला काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी विष्णूंनी सात वर्षे घर सोडले. समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जेथे जाईल तेथून रोपटे चोरायची नंतर त्यांची कुठेतरी लागवड करायची. त्यामुळे गावकरी या तरुणाला ‘पौधा चौर’ म्हणून चिडवू लागले. लोक चेष्टा करू लागले. झाडे चोरून कुठे वृक्षसंवर्धन होते का? असं बोलणे विष्णूच्या कानी पडायचे. झाडावर त्याचे निरपेक्ष प्रेम होते.वसुंधरचे, पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागला. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल त्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन पर्यावरण संवर्धन केले.

 

विष्णूच्या भावाचे जेव्हा लग्न ठरले तेव्हा हुंड्याचा विषय गावात गाजला. मुलीकडील माणसं हुंडा द्यायला तयार होती;पण विष्णूचा सुधारणावादी विचार घरात ग्राह्य मानला जात. वडील बैठकीत म्हणाले, ” विष्णू माझा मुलगा आहे, हुंड्याचं त्यालाच विचारा?”

विष्णू म्हणाला “आम्हाला हुंडा नको आहे. तुम्हाला जे काही द्यायचं आहे. त्याबदल्यात झाडे द्या, हाच हुंडा समजून आम्ही आनंदाने तुमच्या मुलीचा स्विकार करू”
राजस्थान सारख्या रूढी परंपरा प्रमाण मानणाऱ्या राज्यात असा नवा विचार ऐकून उपस्थित मंडळी अंचबित झाले. मुलींच्या मंडळींना होकार दिला. लग्न समारंभानिमित्ताने वधू-वराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.हळूहळू लोकांना विष्णूच्या निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व लक्षात आले.

झाडे

पर्यावरण संरक्षणासाठी ‘श्री कल्पतरू संस्थान’ ची स्थापना केली आहे. गेल्या २० वर्षांपासून ही संस्था वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित काम करत आहे. या संस्थेने देशातील शंभर गावे पर्यावरणदृष्ट्या आदर्श गावे (कल्प ग्राम) म्हणून देण्याचे वचन दिले असून त्यामध्ये तीन गावे विशेष नाविन्यपूर्ण माध्यमातून आदर्श ग्राम बनण्याच्या दिशेने आहेत. विशेष म्हणजे पाली जिल्ह्यातील जैतारणमध्ये हत्तींवर झाडांची मिरवणूक काढली आहे. तसेच,राजस्थानमध्ये पाचशेहून अधिक वृक्ष प्रेमींची परिषद आयोजित केली गेली होती, ज्यात केळीच्या पानांवर पारंपारिक भोजन दिले गेले.

 

राजस्थानातील उंट संवर्धनासाठी ही संस्था कार्य करीत आहे. राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार रोखण्यासाठी या संस्थेने महत्त्वाचे पाऊल उचलले. सिंदूरसारख्या दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले असून दोनशेपेक्षा जास्त दुर्मिळ प्रजाती त्यांच्या मूळ अधिवासात पोचवण्याचे काम केले आहे.विष्णूच्या या चळवळीत देशातील २२ राज्यांतील तरुण सहभागी झाले आहेत. तसेच जगभरातील पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे इतर देशांचे तरुण त्याच्याशी संपर्कात आहेत.

‘पानसिंग तोमर’ या चित्रपटापासून प्रेरित होऊन विष्णू लांबाने चंबळपासून ते राजस्थानमधील चित्रकूटपर्यंत सुमारे दोन वर्षे तळ ठोकला होता आणि माजी दस्यूंना त्यांच्या मोहिमेशी जोडले. जयपूर येथे माजी दस्यूंना एकत्रित आणून। त्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली.

गेल्या पंधरा वर्षांपासून विष्णूंनी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडी ‘पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे’ अभियान राबवून असंख्य पाण्याचे भांडी बसवले आहेत. तसेच गेल्या नऊ वर्षांपासून विष्णू आणि त्यांचे स्वयंसेवक मकर संक्रांती निमित्ताने होत असलेल्या पतंग कार्यक्रमात चिनी मांझ्याने जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी नि: शुल्क वैद्यकीय शिबिर आयोजित करत असतात.

 

विष्णूचे कार्य एवढ्यापुरते सीमित नाही. आजपर्यंत त्याने २२ राज्याचा प्रवास करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची कुटुंबे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून ५६हून अधिक क्रांतिकारकांच्या कुटूंबाचा शोध घेतला आहे. हुतात्माच्या समाधीस्थळ ठिकाणी जाऊन वृक्षारोपण केले आहे.

झाडे

२०१२ साली काही निवडक वारसदारांना प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते. या हुता्म्यांना शोधून काढणारा मुलगा कोण, असे कुतुहलाने त्यांनी विचारले. महाराष्ट्रातील शहिद विष्णू पिंगळे यांचे वारसदार राजेंद्र पिंगळे यांनी प्रणव मुखर्जी यांना विष्णू लांबा यांची ओळख करुन दिली. या तरुणाला ‘पौधा चोर’ असे म्हटले जाते, असे पिंगळे यांनी सांगताच प्रणव मुखर्जी यांनी राग व्यक्त करत हा मुलगा पौधा चोर नाही ‘ट्री मॅन ऑफ इंडिया’आहे असे उद्गार काढले. लांबा यांच्या पाठीवर हात फिरवत पर्यावरणाच्या कामाला वाहून दे. हे काम सोडू नकोस, असा आशीर्वाद त्यांनी दिला.

बदलते हवामान,जैवविविधता आणि सौर ऊर्जेसंदर्भात त्याचे विचार मौलिक आहेत. तो म्हणतो, “आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी वातावरण तयार करण्यात आपला देश यशस्वी होत आहे. सौर ऊर्जेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा आहे. हवामान संकट हे वैज्ञानिक आणि पारंपरिक ज्ञान संकलातून सोडवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देशातील जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे”

बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन,अजय देवगण, सुभाष घई, अनुराग कश्यप,अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे.तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी विष्णूच्या कार्याचा गौरव केला आहे.

पर्यावरणाचा समतोल राखावा, वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि वसुंधरेचे रक्षण व्हावे यासाठी राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात अतुलनीय कार्य करणाऱ्या विष्णू लांबाची ही कहाणी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी प्रेरणा देणारी आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here