आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

‘सायकल बँक’ उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या स्वप्नांना पंख मिळताहेत….!


 

शहरातील काही इमारतीच्या पार्किंगमध्ये अनेक सायकली धूळ खात पडलेल्या दिसतात. मुलांच्या हौसेपोटी आणलेल्या या सायकलची गरज अल्पावधीतच संपते. मग या सायकलीवर धुळीचे थर जमा होत राहतात आणि हळूहळू त्या सायकलीची मैत्री गंजाशी होते.

सायकल बँक

new google

हे चित्र एका बाजूला, तर ग्रामीण दुनियेत मुलींना शाळेत जाण्यासाठी वाहन नसल्याने करावी लागणारी पायपीट असे विरोधाभासाचे चित्र दुसऱ्या बाजूला दिसते. ही दरी भरून काढण्यासाठी गरजू मुलींना या सायकली वापरण्यायोग्य पद्धतीने दुरुस्त करून देण्याचा विचार पुढे आला.

कुर्डू येथील हिंदवी शिक्षण समूहाने ‘सायकल बँक’ हा उपक्रम हाती घेतला. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी कोणतेही पर्यायी साधन उपलब्ध नसते. शाळा दूर असल्याने अनेक मुली शाळेस वारंवार गैरहजर राहतात. त्याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो.

मुलींची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सुरुवातीला जुनी सायकल दुरुस्ती करून मुलींना देण्यात आल्या. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना तुमची सायकल देणार का? असे आव्हान करण्यात आले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेचा हा उपक्रम पाहून काही दानशुरांनी नव्या सायकली भेट दिल्या.

हिंदवी परिवाराच्या वतीने कन्यादान योजना राबविले जाते. या योजनेअंतर्गत पुढे जुन्या सायकली ऐवजी नव्या कोरी सायकली भेट देण्यास सुरुवात झाली. हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे राबविला जातोय.

 

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत हजारो सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.

 

सायकल बँक

शाळेपासून दोन किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या मुलींना या सायकली दिल्या जातात. यामुळे आज शेकडो मुलींना शाळेत जाण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या या अनुकरणीय उपक्रमाचे सर्वत्र आज कौतुक होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष संतोष कापरे सांगतात, गरजु मुलींना सायकल मिळाल्याने त्यांचे चालण्याचे श्रम आणि वेळही वाचला. त्यांच्या आयुष्याला गती मिळाली. सायकल मिळाल्यानंतर मुलींच्या चेहर्‍यांवरचा आनंद तो कोणत्याही शब्दात व्यक्त न करता येणार आहे. कुर्डू, कुर्डूवाडी, भोसरे, लऊळ, टेंभुर्णी, परीते, परीतेवाडी या गावातील मुलींनी याचा लाभ घेतला आहे. मुलींच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी सायकलचे बळ दिले आहे, असे म्हणल्यास वावगे होणार नाही. आज ही सायकल शिक्षणाची गरज आणि प्रसंगी असणारी ही ओढ या मुलींना शाळांकडे खेचून आणते.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here