आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

 खैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके

पोषणमूल्य आधारित सेंद्रिय शेतीचा प्रयोग राज्यात ठरलाय आदर्श मॉडेल


 

एकीकडे कृषिप्रधान भारतीय देशातील शेतकर्‍यांनी जलद आर्थिक नफा मिळविण्यासाठी पीकांचे उत्पादन घेताना विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यासाठी विविध बेसुमार रसायनयुक्त खतांचा वापर केला जातोय. दुसरीकडे हल्लीच्या तरुण शेतकर्‍यांमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा कल वाढू लागलाय. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पध्दतीचा अवलंब करत ३ गुंठा शेतीत ७५ पिके घेऊन मोठी किमया साधली आहे. ही कहाणी आहे खैरेवाडीच्या भांगे कुटूंबियांची.

new google

शेती

 

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील  खैरेवाडी हे गाव. याच गावातील रहिवासी असलेल्या श्रीमती मनीषा भांगे यांनी पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी झेलली. श्रीमती भांगे यांनी आपला मुलगा गोरक्षनाथ याच्या मदतीने ३ एकर पारंपरिक शेतीत स्वत: ला झोकून देत सेंद्रिय शेती विकसित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाला आणि त्यांच्या मेहनतीला आता यश येऊ लागले आहे. आपल्या शेतीत त्यांनी फळपिके, फळभाज्या, फुलझाडे, औषधी वनस्पती यांची लागवड केली आहे.

 

भांगे कुटूंबियांनी सेंद्रिय शेतीमध्ये पाच प्रकारची पीक पद्धती विकसित केली आहे. यामध्ये फळझाडे,औषधी वनस्पती, भाजीपाला, वनझाडे, खत व्यवस्थापन याचा समावेश आहे. भाजीपाला या पीक पद्धतीमध्ये गादी वाफे तयार करून टोमॅटो, कोथिंबीर, शेवगा, वांगी, भेंडी, टोमॅटो, दोडका, कारले, दुधी भोपळा, घेवडा, मेथी, पालक, चूका, शेपू, कांदा, लसूण, रताळे आदी पिके घेतली जात आहेत. फळझाडे या पीक पद्धतीमध्ये अंजीर, केशर आंबा, चिकू, पेरू, आवळा, जांभूळ, पपई, सीताफळ, केळी, मोसंबी, लोणच्याचे आंबे यासह १७ प्रकारची फळपिकांचे उत्पादन घेतले जात आहे.

 

औषधी वनस्पती पीक पद्धतीमध्ये सब्जा, अोवा, कोरफड, कडीपत्ता, पुदिना, तुळस, हादगा, शेवगा, आवळा, बदाम, गुंजवेल यासारख्या १४ औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले जात आहे. वनझाडे या पीकपद्धती मध्ये सरळ अशोक, लिंब, जट्रोपा, साग आदींचा समावेश आहे. गुलाब मोगरा जाई जुई शेवंती यासारखे १५ फुलझाडे घेतली अाहेत. ज्वारी बाजरी मका गहू तसेच  भुईमूग शेंगा  जवस यासारखी २७ प्रकारची तृणधान्ये आणि कडधान्य  घेतली जातात. शेतीच्या बांधाचाही व्यवसायिक दृष्टीने विचार करून श्री. भांगे यांनी मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतीच्या बांधावर ३०० सागाच्या झाडांची लागवड केली आहे.

शेती

श्री. भांगे यांच्याकडे खिलार जातीच्या दोन देशी गायी आहेत. गायीपासून मिळणारे शेण, गोमूत्र अाणि झाडांचा पालापाचोळा गोळा करून चांगल्या प्रकारचे गांडुळ खत निर्मिती केली जात आहे. वेळोवेळी जिवामृत वापरले जाते. ६० बाय ५०  फुट  जागेमधील सेंद्रिय शेतीतला अभिनव प्रयोग पाहण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून लोक येऊन त्यांचे मार्गदर्शन घेतात. सेंद्रिय शेतीमध्ये किमान एका कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके नैसर्गिक पालेभाज्याचे उत्पादन घेता येते. परिणामी नैसर्गिक पालेभाज्यामुळे कुटुंबाचे आरोग्य सदृढ होण्यास मदत होते. या तीन गुंठा क्षेत्रातून वार्षिक २० ते २२ हजाराची बचत होते.

देशी बियाणांचा केला संग्रह

बीएससी जियोलॉजी, एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेतलेले गोरक्षनाथ भांगे यांनी शिक्षणानंतर उस्मानाबाद येथे शासनाच्या ग्रामविकास विभागात  जिल्हा कृतीसंगम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. कामासोबत शेती व्यवसाय सुरू ठेवला. देशी बियाणांचे वाण जपण्यासाठी त्यांनी बियाणांचा संग्रह सुरू केला. त्यांच्याकडे एकूण ३५ प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह केला आहे. शेती व्यवसायाच्या निमित्ताने राज्यभर फिरत असताना आदान- प्रदानातून ही बियाणे मिळवली आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here