Reading Time: 3 minutes

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या महिला सरपंच कोमल करपे यांनी असे केले गाव कोरोनामुक्त!


 

सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक वेगाने फोफावत होती. मृत्यू दरही वाढत होता. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमछाक होत होती. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील एका युवा सरपंचाने  ‘पूर्णवेळ राहू घरी कोरोनावर करू मात’ ही मोहीम राबवत गाव कोरोना मुक्त केले आहे. पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून अंत्रोळी हे गाव कोरोना मुक्त करणाऱ्या २१ वर्षीय सरपंच कोमल करपे यांचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

कोमल करपे

 

सोलापूर जिल्ह्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी हे गाव.
गावाची लोकसंख्या जेमतेम २२९८. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या  लाटेत कोरोनाचा संसर्ग गावात वाढत होता. अशा कठीण प्रसंगात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी गावच्या युवा महिला सरपंच ढाल बनून पुढे आल्या आणि त्यांनी अवघ्या एक महिन्याच्या आत गाव कोरोना मुक्त करून टाकले. दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यांत कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाले. जवळपास मार्चपासून ते एप्रिलपर्यंत एकूण ८८ जणांना कोरोनाची लागण झाली.

सरपंच कोमल करपे यांनी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला.

यासाठी ग्रामसुरक्षा दल आणि ग्रामदक्षता या दोन समितीची स्थापना केली. यामध्ये युवकांचा समावेश केला. या दोन्ही समित्या तसेच आरोग्यसेविका अाणि अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने मोहीमेअंतर्गत गाव कोरोनामुक्त करण्यासाठी जनजागृती, रुग्णांचा शोध, तपासणी, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई  या पंचसूत्रीच्या आधार घेण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेल्या नियमांचे ग्रामस्थांनीदेखील काटेकोरपणे पालन केले.

यासह ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीकडून सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. गावात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना १०० रुपयांचा दंड ठेवला. तसेच विनापरवानगी दुकान उघडणार्‍या दुकानदार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. गावाबाहेरून विक्रीस येणार्‍या विक्रेत्यांना बंदी घातली.  दंडात्मक कारवाईच्या भीतीने लोक नियम पाळू लागले. गावातील दूध विकणार्‍या विक्रेत्याला टेस्टिंग अनिवार्य करण्यात आले. टेस्टिंग न करणार्‍या विक्रेत्याकडून दूध न घेण्याच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या होत्या.

तसेच जे लोक कोरोना टेस्टिंग करणार नाही त्यांना राशन न देण्याच्या सूचनाही दुकानदाराला दिल्या होत्या. मात्र राशन न देण्याची वेळ कुणावरच आली नाही. त्याआधीच सर्वच ग्रामस्थांनी टेस्टिंग करून घेतले. गाव कोरोनामुक्त झालं असलं तरी लढाई अजून संपली नाही. गावात आता कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी काळजी घेत असल्याचे करपे यांनी सांगितले. सोबतच लवकरात लवकर गावातील सर्वांचे लसीकरण करुन घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यासह गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत दहा बेडचे कोविड सेंटर उभा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वयाच्या एकविसाव्या वर्षी झाल्या सरपंच

कोमल करपे या अंत्रोळी गावच्या सर्वात युवा महिला सरपंच आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी बाजी मारून सरपंच झाल्या अाहेत. दयानंद महाविद्यालयातून बीएससी बॉटनीचे शिक्षण घेतलेल्या कोमल यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना गावात सरपंच झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत असताना कोमल करपे यांचा उल्लेख करुन कौतुक केल्यानंतर कोमल करपे चांगल्याच भारावून गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाने  गावच्या विकासासाठी कामे करण्यासाठी बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कोमल करपे
काय म्हणाले मुख्यमंत्री?

सोलापूर जिल्ह्यातील ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या दोन तरुण सरपंचांनी आपले गाव कोरोना मुक्त केले आहे. त्यांनी त्यांचे गाव कोरोना मुक्त केले तर आपण का करु शकत नाही? लवकरच मी त्यांच्याशी फोनद्वारे संवाद साधणार आहेत. यासह हे दोन युवा सरपंच आपल्याशी संवाद साधतील. राज्यातल्या सर्वच गावाच्या सरपंचानी आपले गाव कोरोना मुक्तीचा निश्चय केला पाहिजे. यासाठी सर्व सरकारी यंत्रणा आणि सरकार तुमच्या पाठीशी असेल. आपण आपली वस्ती, गाव, शहर, जिल्हा, आणि देश कोरोनामुक्त करण्याचा निश्चय केला पाहिजे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here