आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अमेरिकेतील विद्यार्थी घेताहेत सोलापुरातून मूर्तिशास्त्राचे धडे!


 

सोलापूर : आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संचलित लिपी भाषा संशोधन केंद्राच्या वतीने ऑनलाईन मूर्तिशास्त्राचे वर्ग घेतले जात आहेत. मूर्तिशास्त्राच्या या प्रशिक्षणवर्गामध्ये महाराष्ट्रासह देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, काश्मीर, पंजाब पश्चिम बंगाल या राज्यांतील एकूण ४० चाळीस विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. विशेष बाब म्हणजे या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून मूळचे भारतीय असलेले पण सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले तीन विद्यार्थी मूर्तिशास्त्राचे ऑनलाइन धडे गिरवत आहेत.

सध्या या क्लासमध्ये रोहिनी नातू ही विद्यार्थिनी तर अरविंद साठम आणि सुरेश जगदाळे हे गृहस्थ मूर्तिशास्त्राचे धडे घेत आहेत. हे तिघेही मूळचे भारतीय असून सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. मूर्तिशास्त्राच्या या प्रशिक्षण वर्गात भारतीय मूर्तीमधील बौद्ध मूर्ती, हिंदू मूर्ती आणि जैन मूर्तींबाबत तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करत आहेत. मूर्तिशास्त्राची ओळख असणारी नवीन पिढी तयार करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहेत. १५ मे पासून या प्रशिक्षण वर्गात सुरूवात झाली. सायंकाळी सहा ते सात या वेळेत हा प्रशिक्षण वर्ग चालतो.  १५ जूनपर्यंत हा वर्ग चालणार आहे.

मूर्तिशास्त्र

भारतात बहुसंख्य प्राचीन मूर्ती आणि मंदिरे आहेत, ज्यांची ओळख होत नाही किंवा अभ्यास होत नाही ते होणे गरजेचे आहे. यासाठी या प्रशिक्षण वर्गाची निर्मिती झाली आहे. मूर्ती कशी ओळखायची, तिचा आकार, वाहन, वस्त्र, अलंकार, स्थिती, कालखंड यावर मार्गदर्शन केले जाते. ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रदीप म्हैसेकर, प्रा.संजय पाईकराव, डाॅ.माधवी महाके, प्रा. डॉ. नभा काकडे, पुरातत्त्व समन्वयक मयुरेश खडके, डॉ. धम्मपाल माशाळकर, साईनाथ कबाडे ,चैतन्य साठे, डॉ मुक्ता मोहिते उमाकांत राणिंगा हे तज्ज्ञ मंडळी दररोज वेगवेगळ्या विषयांवर एक तास मार्गदर्शन करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मूर्तीशास्त्रावर विवेचन

सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी या गावी एक मूर्ती होती. या मूर्तीविषयी चर्चा करण्यासाठी ‘भारतीय मूर्तिशास्त्र’ नावाचा व्हॉट्सअॅपचा एक ग्रुप तयार करण्यात आला होता. यात जवळपास 250 हून अधिक मूर्ती तज्ज्ञ अाणि अभ्यासक अाहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मूर्ती शास्त्रावर चर्चा केली जाते. पुढे या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आणि डॉ धम्मपाल माशाळकर यांच्या संकल्पनेतून मूर्तिशास्त्राचे वर्ग चालविण्याचा विचार पुढे आला. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने या प्रशिक्षण वर्गास चांगला प्रतिसाद मिळतोय.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here