आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या प्रयोगशील शेतकरी दाम्पत्याने सव्वा एकरात २५ टन कांद्याचे विक्रमी उत्पादन काढलंय!


सोलापूर : आजही बहुतांश शेतकरी पारंपरिक शेती करण्यावर भर देतात. त्यामुळे फारसे उत्पादन निघत नाही आणि त्यामुळे शेती फायद्याऐवजी तोट्यातच जाते. मात्र या शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर शेती फायद्याची ठरू शकते, हे दाखवून दिले आहे एका दांपत्याने. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत या दांपत्याने सव्वा एकर शेतीत तब्बल २५ टनाचे कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कृषी क्षेत्रातली ही प्रेरणादायी कहाणी आहे थिटे दाम्पत्याची.

शेतकरी

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील अनगर या गावचे रहिवासी असलेले डॉ. नित्यानंद थिटे आणि त्यांची पत्नी  प्रा.स्वाती थिटे हे उच्च विद्याविभूषित अाहे. दोघांनाही शेतीची प्रचंड आवड. त्यांच्याकडे १० एकरची वडिलोपार्जित शेती. डॉ. नित्यानंद थिटे गेल्या २५ वर्षांपासून शेती करतात. त्यांच्या पत्नी प्राध्यापिका स्वाती थिटे या एका विनाअनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. महाविद्यालयात ज्ञानदानाचे काम करत त्या शेती पाहतात. शेतमालाचे योग्य नियोजन केले तर त्यापासून भरघोस उत्पादन मिळू शकते ही या दोघांनी दाखवून दिले आहे.

new google

थिटे दांपत्याने आपल्या सव्वा एकरच्या शेतीमध्ये उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. लागवडीपूर्वीच जमिनीची चांगली मशागत केली. खत म्हणून शेणखताचा वापर केला. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी रेन पाईप सिंचन पद्धतीचा वापर केला. लागवडीपूर्वी सव्वा एकरची जमीन पाण्याने भिजवून घेतली. त्यानंतर फुरसुंगी जातीचे बी त्यांनी लावले. कांद्याला त्यांनी रात्री पाणी दिले. त्यामुळे कांदा पिकावरील रोगराईचा प्रश्न उद्भवला नाही. कांद्याला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने कांदा तिखट होण्याऐवजी त्याला गोलाई मिळाली. सव्वा एकरमध्ये २५ टन गुलाबी रंगाच्या भरघोस कांद्याचे उत्पादन झाले.

आधुनिक चाळ उभी करून साठवला कांदा

४ महिन्यातच विक्रमी उत्पादन झाले तरी बाजारात कांद्याला भाव नव्हता. अशावेळी त्यांनी स्वस्तात माल विकण्याऐवजी कांदा साठवून ठेवला. भाव येईपर्यंत कांदा टिकून ठेवणे तसे अवघड काम होते. त्यासाठी थिटे दाम्पत्याने पारंपारिक व तंत्रज्ञानाचा मेळ घालत ४० हजार रुपये खर्च करुन कांदा टिकून राहील अशी आधुनिक कांदा चाळ उभी केली. कांदा टिकावा म्हणून १५ दिवसातून एकद सल्फर पावडर व बुरशीनाशक औषधांचा मारा केला जात आहे. पावसाळ्यात कांद्याला भाव आल्यानंतर तो विकणार असून यातून ८ ते १० लाखाचे उत्पन्न मिळेल असा विश्वास थिटे दांपत्याने व्यक्त केला आहे.

मार्केटचा अभ्यास करून उत्पादन घ्यावे -प्रा. स्वाती थेटेशेतकरी

व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या पण शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या प्रा.स्वाती थिटे यांनी सांगितले की, विकासाचा शाश्वत मार्ग म्हणून मी शेतीकडे पाहते. शेतीमध्ये आधुनिक व नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आवश्यक आहे. थोडे सूक्ष्म निरीक्षण, नियोजन केले तर आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन घेता येते. मार्केटचा अभ्यास करून आपल्याला जर ते उत्पादन विकता नाही आले तर साठवणूक करून मार्केटमध्ये चांगला भाव आल्यानंतर उत्पादन विकून आपला आर्थिक विकास साधू शकतो. सध्या शेतात सीताफळ, शेवगा, आंबा, ऊस, कोथिंबीर, कांदा यांची लागवड केली आहे. तसेच १०० प्रकारची देशी बियाणे संग्रहित असून यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: हप्ते न भरल्याने फायनान्सवाल्यांनी रिक्षा हिसकावली; सोनू सूदला मदत मागण्यासाठी चाहता निघाला मुंबईला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here