आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आजच्या आधुनिक युगातील स्त्री-समोरील ही आव्हानं खरचं विचार करण्यासारखी आहेत!


स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षिमीकरण, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण, स्त्री आरोग्य इत्यादी असं भरपूर काही ज्या दिवशी ऐकायला व वाचायला मिळतं, तो दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. वर्षानुवर्षे आपण महिला दिनाचे औचित्य साधून त्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो. महिलांसाठीच्या स्पर्धा आयोजित करतो. त्यांच्या सक्षिमीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा ठोकतो. पण वास्तविकतः महिलांविषयी दाखवलेली ही सहानुभूती आहे ना. ती सहानुभूती त्यांच्या पुढील आव्हानं काही कमी करु शकत नाही, हेही तितकंच खरं आहे.

प्राचीन काळापासूनच स्त्रीयांच्या जीवनात अनेक आव्हानं होती. त्याकाळी स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जात होते. इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या पुरुषी मानसिकतेला स्त्रीचा उपभोग घेणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच वाटायचा. आजही त्या परस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आधुनिकीकरणाच्या या जगात प्राचीन आव्हानच आजच्या स्त्री समोर पुन्हा नव्याने उभी राहिली आहेत. आपण बारकाईने अभ्यास केला, तर उलट मुळची आव्हानं आज वाढलेली आपल्याला पाहायला मिळतील.

स्त्री

new google

माझ्या मते, आजघडीला स्त्री जीवनातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं आव्हान म्हणजे “पुरुषसत्ताक पध्दतीतील पुरुषी मानसिकता मुळापासून संस्कार व विचारांच्या आधारावर बदलवण्याचं आव्हान.” मुळात महिलांचा आदर होणं, त्यांचा सन्मान राखणं, त्यांची प्रतिष्ठा जपणं, त्यांच स्वातंत्र्य इ. अबाधित राखायचे असेल तर महिलांचा आदर करा-महिलांचा आदर करा असा केवळ गजर किंवा जपनाम करून चालणार नाही, तर त्यांचा आदर किंवा सन्मान करण्याची भावना प्रत्येकाच्या रक्तात असायला हवी आणि ही भावना रक्तात येण्यासाठी बालवयात मुलांमध्ये संस्कार रुजवण्याची गरज आहे आणि हे काम फक्त एक आई म्हणजे महिलाच करु शकते. त्याच संस्कारातून मुलांना कळेल की, कणखर युक्तीचा आणि अपार शक्तीचा दुहेरी संगम म्हणजे स्त्री होय

. त्याला कळेल की, जिच्या कुशीतून ब्रम्हांड निपजते ती स्त्री कुणाची बहीण, मुलगी, पत्नी असली तरी, त्या सर्वांअगोदर ती अखंड विश्वाची माता आहे. त्याची दृष्टी एवढी डोळस बनेल की, कर्तव्य व जबाबदाऱ्या सांभाळतांना एकटी पडली तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारी आणि त्यासाठी स्वतःच्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करणारी स्त्री त्याला दिसेल.

स्त्रीपुढील दुसरं महत्वाचं आव्हान म्हणजे “महिलेनं महिलांना स्विकारण्याचे आव्हान.” पुरुषी मानसिकतेचं सोडा हो. आज महिला तरी महिलांना कुठे स्वीकारतात? वंशाचा दिवा हा मुलगाच हवा या अट्टाहासापायी आजपर्यंत कित्येकांच्या हातून स्त्रीभ्रूण हत्येचं पाप घडलयं. कित्येक जोडप्यांनी गर्भात मुलगी असल्याचे समजताच गर्भपाताचा निर्णय घेतलाय.

एक वेळ आपण असं माणू की, बाप कठोर असू शकतो पण आई.. आई तर स्वतः त्या गर्भाशी एकरुप झालेली असते. काही काळ का होईना तिने त्याला आपल्यात वाढवलेलं असतंच ना. ती आई इतका कठोर निर्णय कसा काय घेऊ शकते? एक आई सुद्धा गर्भपाताला तयार होऊ शकते या पेक्षा मोठं दुसरं दुर्दैवच काय आहे? म्हणजे काही जोडपी मुल-बाळ होत नाही म्हणून कित्येक दवाखान्यात वर्षानुवर्षे धावपळ करतात.

एखादी मुलगी तरी आपल्या पोटी जन्माला यावी अशी त्यांची केविलवाणी अवस्था झालेली असते. तर याउलट काही ठिकाणी एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला जन्म घेण्यापासूनच रोखत असते. मग असे असेल तर स्त्री सन्मान करायचा कोणी? एकीकडे आपण पुरुषांनी स्त्रीयांचा सन्मान केला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो आणि दुसरीकडे महिलाच महिलेचा सन्मान करायला तयार नाहीत. मग स्त्रीयांना प्राथमिक आव्हान स्विकारुन परिवर्तनाची तयारी करावी लागणार आहे ना आणि नेमकी हीच बाब प्रत्येक महिलेनं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे.

आता येऊत आपण स्त्री शिक्षणाकडे, मानवी जीवनाचा सर्वांगिण विकास घडवुन आणायचा असेल तर शिक्षण हे त्याचे मुख्य माध्यम मानले जाते. कारण शिक्षणच मानवाला निर्भय बनवत असते. व्यक्तीला स्वातंत्र्यासोबतच मुलभूत अधिकार आणि हक्कांची जाणीव करून देतं ते शिक्षणच. स्त्री शिक्षणाचा विचार केला तर भारतात सावित्रीबाई फुलेंच्या नंतरच स्त्री शिक्षणाची वाट मोकळी झालीय.

त्याअगोदर महिलांच्या कित्येक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. आजची परिस्थिती त्यामानाने चांगली असली तरी त्यापेक्षा वेगळी आहे असे म्हणणं सुध्दा योग्य होणार नाही. त्याकाळी जशी स्त्री निर्भिड नव्हती, स्वावलंबी नव्हती तशी ती आजही तेवढीशी निर्भिड आणि स्वावलंबी असल्याचे पाहायला मिळत नाही.

आजही मुलींना शिकण्याची इच्छा असतांनाही पालक “मुलीचे लग्न” ह्या जबाबदारीतून स्वतःची सुटका व्हावी म्हणून तिचं लग्न लावून देतात आणि तिला शिक्षणापासून वंचित राहावे लागते.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या बोर्डाच्या परीक्षेत महाराष्ट्रासह देशभरात मुलीच पहिल्या येतांना दिसतात. आता तर जणू काही, ती एक परंपराच बनली आहे. पण असं असुनही पदवी व पदव्युत्तर शिक्षणात मुलींची संख्या अत्यल्प आहे. स्त्री शिक्षणात येणारा अडथळा मग तो सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक किंवा इतर कुठल्याही कारणामुळे येत असला तरी तो अडथळा दूर करण्याचं आव्हान हे स्त्री समोरच असणार आहे कारण तिलाच निर्भिडपणे व स्पष्टपणे शिक्षणातील सर्व अडथळे झुगारून द्यावे लागतील.

एकंदरीत स्त्री जीवनातील काही प्रमुख आव्हानांचा विचार करतांना फ्रेंच स्त्रीवादी लेखिका सिमोन द बोव्हर यांच वाक्य आठवल्या शिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या The Second Sex या पुस्तकात स्त्रियांविषयी आपलं मत व्यक्त करतानां असे म्हटले की, One is not born but rather becomes a woman. (स्त्री जन्माला येत नाही तर ती समाजाकडून घडवली जाते).

त्यांच्या या वाक्यातून आपल्या लक्षात येते की, समाजाचा स्त्रियांच्या जिवनावर सातत्याने परिणाम होत असतो.

समाज संस्कृती आणि प्रथा किंवा परंपरेच्या नावाखाली तिला एका साच्यात बसवतो. सोबतच इथल्या तथाकथीत संस्कृतीने त्यांना अबला, नाजूक, हळवी ठरवलयं. त्यामधून शारीरिक व मानसिक दृष्ट्या दुबळेपणा त्यांच्यावर लादला गेलाय. त्यावर समाजाच्या कुठल्याच स्तरातून कुठलाही साधा अक्षेपही नोंदवला गेला नाही त्यामुळे पूर्वीपासून स्त्री अशीच घडवली गेली व काही प्रमाणात आजही तशीच घडतेय. तेंव्हा तिला आता स्वतः ला आपल्या चेहऱ्यावरील हसण्यामागचं प्रचंड मोठं दुखं बाजूला करावं लागणार आहे.स्त्री

 

असं म्हटलं जात स्त्री ही सर्वच कार्याची जननी आहे आणि जर तिनं स्वतः ला घडवण्याचा वसा घेतला तरच, सिमोन द बोव्हर यांचं समाज तिला घडवतो हे वाक्य सुध्दा फोल ठरल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच या कामी शिक्षित समाजाने तिच्या पाठीमागे ढालीसारखं उभं राहणं आवश्यक आहे.

एक वडील, भाऊ, पती आणि मुलगा म्हणून घरातूनच आपलं कर्तव्य आहे तिला साथ देण्याचं. तुमच्या साध्या गोड बोलण्याने सुध्दा त्यांचा आत्मविश्वास वाढेल, तुमच्या साथीने त्यांना हवं तिथं जाऊन स्वत:ला सिद्ध करता येईल आणि त्यातूनच तिला तिच्यासमोरील प्रत्येक आव्हान पेलण्याचं बळ सहजरित्या मिळत जाईल. मग बघा त्याही गगनात उंच उंच भरारी घेतील. अंर्तमनातून हसतीलही त्या आणि तिळमात्र कशाचीही काळजी न करता… सन्मानाने जगतील सुध्दा !

– वैभव उत्तम जाधव
एम.ए (राज्यशास्त्र)
मो.७७९८०४६९६८
इ-मेल :- [email protected]

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. पळून गेलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी वरदान ठरणारे महादेव मंदिर ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here