आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

‘रेनिसान्स स्टेट’ ह्या गिरीश कुबेरांच्या पुस्तकावर बंदी घालून इतिहासातील विकृती थांबवावी !


 

मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातून महाराष्ट्राची ओळख संपूर्ण जगाला झाली. केवळ कर्तुत्वाच्या बळावर जुलमी राजवटींना शह देत जनकल्याणासाठी स्वराज्य निर्माण करण्याची धमक फक्त महाराष्ट्राच्या मातीत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य कार्यातून अखंड विश्वाला समजले.

पुढे शिवपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी तळहातावर प्राण घेऊन स्वराज्याचे रक्षण केले. खर म्हणजे शौर्य, धडाडी, महत्वाकांक्षा त्याग इत्यादी सद्गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहिले जाते. ते संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते, राज्यशास्त्र नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्रात सुध्दा ते पारंगत होते.

new google

वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी काव्यलेखनास सुरवात केली होती. त्यांनी संस्कृत भाषेत बुधभूषणम् हा राज्यशास्त्र व नीतीशास्त्रावरील ग्रंथ लिहिला. महाराज मलखांब, भालाफेक, धनुर्विद्या, तलवारबाजीत तरबेज होते. धर्मपंडितांबरोबर ते संस्कृत मध्ये चर्चा करत असत. राज्यकारभाराबरोबरच संभाजीराजांना इंग्रजासह अनेकांशी चर्चा करण्याचा संबंध लहानपणापासूनच आला होता.

कुबेर

अशा संवेदनशील, प्रतिभावंत, चारित्र्यसंपन्न असणाऱ्या छत्रपतींचे चरित्र काही सडक्या मेंदूच्या आणि नीच वृत्तीच्या लोकांनी मालिका, चित्रपट, नाटक आणि पुस्तकांतून पुर्वनियोजितपणे विकृत प्रकारे मांडले. तोच प्रकार आता काही दिवसांपूर्वी गिरिश कुबेर नामक अर्धवट लेखकाने ‘ रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून जाणूनबुजून केला आहे.

छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण करत इतिहासात विकृती निर्माण करुन महाराष्ट्राच्या अस्मितेवर चिखलफेक करण्याचा हा प्रकार अतिशय निषेधार्ह आहे, निंदनीय आहे. पुस्तकातील पान नंबर ७६ वर कुबेर म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला.

संभाजीने सोयराबाई आणि शिवाजी महाराजांच्या हयातीत तयार झालेल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री ठार केले. या चुकांमुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा त्याला पुढे भोगावी लागली. (Finally, sambhaji put an end to the succession issue by killing soyarabai along with those loyal to her, some of whom had been prominent members of shivajis Ashta Pradhan mandal. The bloodshed also took away an invaluable telent pool that shivaji had groomed. later, sambhaji would pay a heavy price for it.) पण वास्तविकतः स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या अष्टप्रधान मंडळातील सदस्यांना मोठ्या अंतःकरणाने छत्रपती संभाजी महाराज यांनी माफ करत, त्यांना पुन्हा अष्टप्रधान मंडळात स्थान दिले होते.

अष्टप्रधान मंडळातील सदस्यांनी पुन्हा छत्रपतींशी आणि स्वराज्याशी गद्दारी केल्यानंतर मग त्यांनी त्यांना शासन केले. महाराणी सोयराबाई ह्या तर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर साधारणपणे वर्षभर जिवंत होत्या हा इतिहास आहे. उलट महाराज आपल्या आईविषयी म्हणजे सोयराबाई राणी यांच्याविषयी बोलतांना स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई आहे, असे म्हणायचे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई यांना ठार मारले हा कुबेरांचा दावा खोटा आणि महाराजांची बदनामी करणारा आहे.

याच पानावर कुबेर पुढे म्हणतात की, छत्रपती संभाजीराजे त्यांच्या वडीलाप्रमाणे(छत्रपती शिवाजी महाराज) संयमी आणि मुत्सद्दी नव्हते. (Sambhaji, though extremely courageous, lacked his fathers patience and deplomatic skills.) असं म्हणणं म्हणजे हा संभाजीराजेंवर केलेला अन्याय आहे

मुळात स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना गद्दारांना माफ करणारा राजा संयमी नव्हता आणि मोघल, निजामशाही, अदिलशाही, पोर्तुगीज, कुतुबशाही अशा कितीतरी शत्रूंना एकाचवेळी शह देत कधीही पराजित न होणारा अंजिक्ययोध्दा मुत्सद्दी नव्हता, असा दावा करणारा माणूस स्वतः ला लेखक म्हणून घ्यावयाच्या लायकीचा तरी आहे का? हा प्रश्नच आहे. सोबतच कुबेरांनी पुस्तकात इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत असही म्हटले आहे.

वस्तुस्थिती पाहता, पहिले छत्रपती शाहू महाराज(शंभूपुत्र) यांच्या अष्टप्रधान मंडळातील पेशवा असणारे बाजीराव, म्हणजे पेशवा हे पद होतं. अशा बाजीरावांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीच आहे. खरं पाहता शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांच चातुर्य, सर्वच क्षेत्रात असलेला त्यांचा व्यासंग लक्षात घेता महाराजांशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही.

कुबेर

इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रकार काही नवा नाही. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्यासाठी खोटा इतिहास लिहण्याचे, सांगण्याचे, दाखवण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा गिरीश कुबेरांसारख्या माणसांकडून इतिहासात समकालीन कागदपत्रांत कुठलाही पुरावा नसतांना होणाऱ्या आक्षेपार्ह लिखाणातून जाणीवपूर्वक बदनामी करण्यामागचे षडयंत्र काय असु शकते? हे आता तपासावं लागणार आहे.

कुबेरांनी या पुस्तकातून संभाजीराजेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत त्यांना चुकीच ठरवण्याचा, त्यांच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा विषारी प्रयत्न केला आहे.

सोबतच पुस्तकात द्वेषापोटी महाराजांचा वारंवार एकेरी उल्लेखही चालवला आहे. त्यामुळे याच्या पुस्तकाचा विरोध सर्वच स्तरातून होतांना दिसतोय.

यावर बोलतांना किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक, शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी सर म्हणाले की, “कुबेरांनी, रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र, या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक पानावर विष पेरण्याचं काम केलंय आणि माझं तुम्हाला आवाहन आहे की,  लक्षात ठेवा, रणांगणात सांडलेलं रक्त हे पावसांच्या धारांमध्ये वाहून जात. पण कागदावर पेरलेलं विष पिढ्यानपिढ्या इतिहास उद्ध्वस्त करत, कुबेराच लिखाण हे विषारी आहे आणि म्हणून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी आली पाहिजे, या करिता आपला लढा आहे.”

एकंदरीत स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहीती कुबेरांनी पुस्तकात छापली आहे. मुळात सातत्याने लेखनीच्या माध्यमातून अशी माहामानवांची अवहेलना होणं, हा सर्व प्रकारच्या लेखक, साहित्यिकांसाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. भविष्यात अशा मजकुराचा आधार घेऊन पुन्हा बदनामीचे षडयंत्र रचले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने पुस्तकावर बंदी घालावी ही जनसामान्यांची भावना आहे. त्या भावनेचा आदर करत शासनाने पुस्तकाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रती तात्काळ मागे घ्याव्यात. सोबतच कुबेरांसह प्रकाशनावर कायदेशीर कारवाई सुध्दा करावी.

वैभव उत्तम जाधव
एम.ए (राज्यशास्त्र)
रा.सोमठाणा ता.वसमत जि.हिंगोली
मो.७७९८०४६९६८

===

सदर व्यासपीठावर मांडलेली मते ही विविध लेखकांची आहेत. संपादक मंडळ कदाचित या त्यांच्या मताशी सहमत असेलही. आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. पळून गेलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी वरदान ठरणारे महादेव मंदिर ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here