आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सत्ता संपादनासाठी शेकापची राजकिय व्युव्हरचना काय असावी?


शेतकरी कामगार पक्ष हा गरीब शेतकरी, कामगार आणि मागासलेला समाज यांच्या सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध संघर्ष करण्याची क्षमता घेऊन राजकिय मैदानात उतरला होता. ब्राह्मणेतर, सत्यशोधक समाज आणि त्यानंतर मार्क्सवादी किंवा डाव्यांच्या विचारसरणीचा पुरस्कार करत पक्षाने नवी मूल्यव्यवस्था समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा, साराबंदीचा लढा, सक्तीच्या सरकारी लेव्हीविरुद्धचा लढा, सीमा भागातील लोकांचा लढा व शेतकऱ्यांचे अनेक छोटे-मोठे लढे हिरीरीने लढवले गेले.

आजपर्यंत विधानसभेत शेकापच्या आमदारांनी स्वाभाविकपणे शेती व शेतकरी, कूळकायदा, जमीनसुधारणा या प्रश्नांवर चर्चा केली आणि अनेक वेळा सरकारला कायद्यात दुरुस्त्या करावयास भाग पाडले. पण १९६० नंतर पक्षाची मोठी पिछेहाट झाली. एकेकाळी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचाच बोलबाला होता. पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेतील मुख्य विरोधीपक्ष ठरला होता. त्यानंतर मात्र काहीच जिल्ह्यांत शेकापचा प्रभाव दिसत होता.

शेकाप

new google

पण अलीकडच्या काळात तितेही पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या मते, सत्ता संपादनासाठी शेकापची राजकिय व्युव्हरचना जर आखायची असेल तर पक्षाच्या भूतकाळावर प्रकाश टाकावा लागणार आहे. कुठून आपण राजकिय परिवर्तन घडवून आणू शकतो हे तपासावं लागणार आहे, तरच आपल्याला आपलं सत्ता संपादनाचं ध्येय गाठता येऊ शकतं.

अलीकडच्या दहा वर्षाचा विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, पक्ष सातत्याने हळूहळू अस्ताच्या मार्गावर आहे. त्याचा प्रभाव तेवढासा शिल्लक राहिलेला नाही. त्याचे अनेक कारणे आहेत. पण त्या सर्वांमध्ये जर महत्वाचं कारण काय असेल तर ते म्हणजे आम्ही आमचा आत्मविश्वास हिरावून बसलो आहोत. आमच्या मनगटात लढण्याची क्षमताच नाही, अशी आमची मानसिकता बनली आहे.

आता या मानसिकतेला काही प्रमाणात पक्षाच्या नेतृत्वाची वरची फळीही जबाबदार आहेच म्हणा. कारण या दहा वर्षांत आम्ही फक्त तडजोड करण्यात धन्यता मानली. तडजोड नसावीच असही माझं मत नाही तडजोड जरूर केली जावी. पण ती नेमकी कुठं असावी यावर मात्र मी नक्कीच भाष्य करू इच्छितो. आता आपण रायगडचाच विचार करु, रायगडच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरेंचा निसटता पराभव झाला होता.

तिथे शिवसनेचे अनंत गिते जवळपास २,१०० मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी शेकापला १,२९,३०५ मते मिळाली होती. म्हणजे रायगड मध्ये आपलं वेगळं आस्तित्व आहे, सिध्द झालं होतं. पण त्यानंतर म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीला सर्वप्रथम शेकापने बिनर्शत पाठिंबा दिला. बिनशर्त म्हणजे कुठल्याही मागणी, अटी किंवा शर्ती शिवाय बरं का! ठिक आहे. इथ आपण पाठिंबा देऊन कुणाच्यातरी फायद्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली, ती यशस्वीही करून दाखवली. पण या बदल्यात पक्षाला काय मिळालं? जेंव्हा आपण काय मिळालं? या प्रश्नाचा विचार करू ना तेंव्हा आपल्या लक्षात येते की, यात आपण स्वतःचा मतदार, स्वतःची वोटबँक गमावून बसलोय. बाकी मात्र आपण काही नाही मिळवलं. जिथं आपली पाळं-मुळं आहेत तिथचं जर आपण लढणार नसूत, तर नंतरच्या निवडणूकीत भलामोठा भोपळाच मिळेल ना! सांगायचा मुद्दा हा की, इथे आपल्याला तडजोड करून चालणार नाही. जिथे शक्य होईल तिथे स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी असावी, नाहीतर पक्षाचे बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण होईल.

शेकाप

राज्यातील विधानसभेचा विचार केला तर तिथेही परस्थिती फारशी वेगळी नाही. सातत्याने ज्या आपण तीन-चार जागा जिंकत होतो, त्याही यावेळी गमावून बसलोय. का बरं, महाआघाडीची मोठी फौज उभी असतांनाही आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. पक्ष नेमकां कुठे कमी पडला? यावर आपल्याला चिंतन करावं लागणार आहे ना! असो… एकीकडे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान शेकापवर टिका करतांना “शेकाप हा आता शेतकऱ्यांचा, कामगारांचा पक्ष राहिला नसुन तो भांडवलदारांचा पक्ष बनला आहे. त्यामुळे त्यांनी शेकाप हे नाव बदलुन भाकाप हे नाव ठेवावे” असे म्हटले होते.

आता या टिकेचं स्पष्टीकरण देत बसायची गरज मला वाटत नाही. ती टिका कितपत खरी आहे किंवा खोटी आहे यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करावा, ते विचार करतीलही. पण ही टिका लक्षात घेता माझ्या मते, जेंव्हा राज्याचा मुख्यमंत्री ज्या अर्थी स्वतःच्या आस्तित्वाची लढाई लढणाऱ्या एखाद्या पक्षावर टिका करतोय त्या अर्थी तेंव्हा त्या पक्षाची राजकिय ताकद किंवा प्रभाव हा वाखाणण्याजोगा आहेच, हे त्यातून दिसुन येते.

म्हणजे राज्याचा प्रमुखच आपल्याला आपलं आस्तित्व, आपली क्षमता दाखवून देतोय, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. मुळात स्वतःची ताकद ओळखल्याशिवाय लढण्याला बळ मिळत नाही आणि हे बळ त्यांच्या टिकेतून मिळतयं.

आतापर्यंत आपण वरील तीन तक्त्यांमधून शेकापाचं मुळ, विचारसरणी, कार्यपद्धती त्यानंतर पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत काँग्रेस आणि मित्र पक्षांशी शेकापने कायम ठेवलेली जवळीक म्हणजे शेकापच्या निर्मिती मध्ये योगदान असलेले नेते पुन्हा काँग्रेसवासी होणे, काँग्रेसमहाआघाडीला बिनशर्त पाठिंबा देणे व महाआघाडीशी युती करणे इत्यादी स्वरुपाची तडजोड आणि त्यांतर आजही असलेलं पक्षाचं प्रभावी अस्तित्व इत्यादींचा विचार केला.

वर सांगितल्याप्रमाणे पक्षाचा भूतकाळ लक्षात घेतल्याशिवाय सत्ता संपादनासाठी व्युव्हरचना आखता येत नसते. म्हणून राजकिय व्युव्हरचना काय असावी? हे लक्षात घेतांना विचार केला तर माझ्या मते, परभणी, उस्मानाबाद आणि रायगड या तीन जिल्ह्यांना शेकापचा मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. सोबतच तिथे काही प्रमाणात का असेना पण शेकापचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यातही रायगड तर पक्षाचा मुख्य बालेकिल्ला आहे.

म्हणजे जसं आपण कमी कमी होत गेलो तस आपण आता हळूहळू वाढलं पाहिजे. सुरुवातीला या तीन जिल्ह्यात शेकापने सक्रिय झालं पाहिजे आणि त्यानंतरच आजपर्यंतच्या राजकिय इतिहासात कुठल्या-कुठल्या विधानसभा क्षेत्रात पक्षानं यश मिळवलं होतं तिथं तिथं पाय रोवायला सुरुवात केली पाहिजे, सक्रिय झालं पाहिजे. सक्रिय होणं म्हणजे काय तर शेकापचे काम मुख्यत: शेतकऱ्यांत आणि कामगारांत होते. कामगारांत काही अपवाद वगळता पक्षाची संघटना नव्हती.

आजही त्यादृष्टीने संघटन झालेलं किंवा होतांना दिसत नाही. मग काय तर प्रत्येक क्षेत्रात संघटन बांधलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांबरोबर इतर सर्वच क्षेत्रातील कामगारांत संघटन उभं केलं पाहिजे, तिथे कार्यकारिणी गठीत केली गेली पाहिजे.

तरुण हा पक्षाचा उज्वल भविष्यकाळ असतो त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना या पक्षाच्या झेंड्याखाली खेचून आणावे लागणार आहे. तरुणांत नवचैतन्य निर्माण करावे लागणार आहे त्यासाठी पक्षाने तरुणांसाठी विषेश अधिवेशने किंवा कॅम्प आयोजित केले पाहिजेत. सोबतच जिल्ह्या जिल्ह्यांत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पुरुषांबरोबर महिला व युवती आघाड्या स्थापन झाल्या पाहिजेत. कारण महिला ही येणाऱ्या क्रांतीकारी पिढीची निर्माती असते.

बालवयातील बाळकडू भविष्यात मोठं नेतृत्व उदयास आणू शकते. याव्यतिरिक्त शेतकरी कामगार पक्षाचा प्रचार आणि प्रसार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष जो स्वत:ची अशी वेगळी विचारसरणी मांडू शकला नाही, ही कमतरता दूर करत आपल्या स्वतंत्र विचारसरणीची पुन्हा नव्याने मांडणी करून तिचा पुरस्कार केला गेला पाहिजे. त्यापूढे जाऊन पक्षाची पक्षसदस्य नोंदणी आजपर्यंत अत्यंत अनियमितपणे झाली आहे.

चळवळीतून एकगठ्ठा सदस्य नोंदणी करण्याचा पक्षाचा पायंडा मोडीत काढत, त्यात आता नियमितता आणावी लागेल. पक्षाच्या सदस्यत्वाची आकडेवारी कधीच घोषित करण्यात आलेली नाही. ती प्रत्येक वेळी नोदणी कार्यक्रमानंतर घोषित केली गेली पाहिजे. त्यातून आत्मविश्वासाची कमतरता जाणवणार नाही. त्यासाठी तंत्रवैज्ञानिक प्रगतीच्या काळात काळानुसार बदलत त्यादिशेने वाटचाल केली पाहिजे म्हणजे सोशल मीडियावर पक्षाच्या नोंदणीपासून, पक्षाची धेय्यधोरणे, कार्यप्रणाली प्रत्येकापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे.

एकंदरीत शेकाप म्हणजे शेतकरी व कामगार यांच्या एकजुटीतून भारतात लोकशाही क्रांती करण्याच्या उद्देशाने पावले टाकणारा पक्ष आहे. पक्षाने आपल्या वेगवेगळ्या चळवळींच्या द्वारा लाखो लोकांना जो आधार दिला, त्यांच्या अधिकारांचे जे रक्षण केले ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या कल्याणासाठी शेकापला सत्तेत राहवं लागणार आहे आणि हे काम फक्त शेकाप स्वतःच करु शकतो. माझ्या मते, वरील सात-आठ मुद्देच पुर्णपणे अंमलबजावणीत आले, पक्षाकडून त्यावर विचार केला गेला तर सत्ता संपादनासाठी शेकापला वेगळी राजकिय व्युव्हरचना आखण्याची गरज नाही. वरील मुद्यांतच राजकिय सत्तेचे मुळ आहे, असे मी मानतो.

:- वैभव उत्तम जाधव
एम.ए.(राज्यशास्त्र)
रा.सोमठाणा ता.वसमत जि.हिंगोली
मो.नंबर :- ७७९८०४६९६८
मेल :- [email protected]

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here