आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

महाराष्ट्राच्या काळ्या मातीत हिरवा पांडुरंग उभा करणारा वृक्षप्रेमी अवलिया : अभिनेता सयाजी शिंदे!


भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक पटलावर आजपर्यंत अनेक दिग्गज पाहिले. त्यातील काहीजणांना पारंपारीक घराणेशाहीने मोठं केलं तर काहीजण प्रतिकुल परस्थितीतही स्वतःच्या मेहनतीने मोठी झाली. पण या दिग्गजांपैकी काही मोजक्याच लोकांना जनतेने डोक्यावर घेतलं.

काहीजणच असे आहेत जे लोकांच्या काळजावर अधिराज्य गाजवतात आणि ही तिच माणसं आहेत ज्यांनी मोठ्या यशानंतरही कुठलाही बडेजावपणा किंवा मोठेपणा न मिरवता स्वतःचे नाव, पैसा, प्रसिद्धी या पलिकडे जाऊन आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम केलं.

 सयाजी शिंदे

new google

समाजाचं पर्यायाने येथील लोकांच कल्याण साधण्यासाठी वेगवेगळ्या चळवळी सुरू केल्या, आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्यामध्ये प्रामुख्याने पाणी फाऊंडेशनचे अभिनेते अमिर खान; नाम फाऊंडेशनचे अभिनेते नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा समावेश होतो. याच लोकांच्या यादीमध्ये प्रकर्षाने ज्यांच्या नावाचा समावेश होतो आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे सरकता येणार नाही, ते नाव म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे होय!

अभिनेते सयाजी शिंदे यांचे बालपण वेळे (कामथी) सातारा या खेडेगावात गेले असून त्यांनी मराठी नाटके व चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी मराठी सोबत हिंदी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलगू इत्यादी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. तर गोष्ट छोटी डोंगराएवढी(२००९) व डांबिस(२०११) या चित्रपटांचा सहनिर्माता म्हणूनही काम पाहिले आहे.

त्यांनी जवळपास शंभराच्या वर चित्रपटांत अभिनय केला असून घरात कलावंताची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना सयाजी शिंदे या मराठी अभिनेत्याचा प्रवास कोणालाही हेवा वाटावा असाच आहे. विनोदी भूमिकेसह बहुतांश चित्रपटांत खलनायकी ढंगाचे पात्र साकारणारा आणि चित्रपट रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे.

सयाजी शिंदे सरांची चित्रपटांमध्ये खलनायक अशा स्वरूपाची ओळख असली तरी त्यापेक्षाही वास्तविक जिवनात महाराष्ट्रातील वृक्षप्रेमी नायक म्हणून जी ओळख आहे ना, ती ओळख सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवण्यासारखीच आहे. त्यांनी मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणाचे व वृक्षसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर झाडे लावून ती स्थानिकांच्या मदतीने जगवण्याचे काम सुरू केले आहे. मानवाने स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी, अतिहव्यासापोटी झाडांच्या कत्तली करून नष्ट केलेल्या देवराया देशी झाडांच्या लागवडीने पुन्हा नव्याने उभारणारी चळवळ, त्यांनी सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उभी केली आहे. ही चळवळ आता व्यापक रुपाने समोर येत असुन ठिकठिकाणी वृक्षप्रेमी बांधवांना संघटित करून त्यांच्याद्वारे वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाचे काम हाती घेतले जात आहे.

सयाजी शिंदे

येणारी प्रत्येक पिढी ही उद्याचे भविष्य आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. लहान मुलांत वृक्षप्रेम रुजवण्याचा प्रयत्न म्हणून आता शालेय विद्यार्थ्यांनाही या चळवळीत सहभागी करून घेतले जात आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा-शाळांतून छोटेखानी रोपवाटिका (नर्सरी) बनविण्यात येत आहेत. प्रत्येक मुलाने एक-एक रोप लावायचे आणि त्याच्या संगोपणाची जबाबदारी घ्यायची, ते झाड जगवायचे अशा स्वरूपात त्या-त्या शाळेची छोटीखानीच का होईना पण एक रोपवाटिका तयार होईल.

एकंदरीत सतत व वेगाने होणारी झाडांची कत्तल ही पर्यायाने मानवाने जगावर लादलेली जागतिक आणीबाणीच होय. माणूस विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतांना केवळ स्वतःचाच विचार करत आहे म्हणजेच तो नैसर्गिक साधनसंपत्तीचा अनिर्बंध वापर करत आहे. त्यामुळे उद्या भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध दुष्परिणामांची जबाबदारी ही शेवटी मानवाचीच असणार आहे. म्हणुनच या गंभीर बाबीचा विचार करुन किंवा भविष्यातील दुष्परिणामांची जबाबदारी आजच स्विकारुन सबंध मानव जातीने वृक्षारोपणाचे आणि वृक्ष संगोपणाचे काम हाती घेतले पाहिजे.

तरच रस्त्याने जातांना जंगलात लागलेला वणवा पाहून, तेही पुरेस मनुष्यबळ उपलब्ध नसतांना तो वणवा विझविण्यासाठीची धडपड करणारा सयाजी शिंदे सरांसारखा एखाद्या अवलिया आपल्यातून निर्माण होईल आणि त्याची सुरवात आता झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावचा मंगेश दळवी नावाचा एक युवक शिंदे सरांना भेटतो काय… आपल्या परिसरातील टोकाईगडाची संकल्पना सरांसमोर मांडतो काय…

परिसरातील तीस-चाळीस युवक त्याच्यासोबत जोडले जातात काय.. आणि सर्वांच्या सहकार्याने उभी राहते सह्याद्री देवराई तेही सौंदर्याने नटलेल्या, निसर्गरम्य टोकाईगडाच्या रुपाने! हे सर्व शक्य होतयं कारण या महाराष्ट्राच्या काळ्या मातीत हिरवा पांडुरंग उभा करण्यासाठी धडपडणारा वृक्षप्रेमी अवलिया सयाजी शिंदे सर्वांच्या पाठीमागे तेवढ्याच ताकदीने उभा आहे.

– वैभव उत्तम जाधव
एम.ए (राज्यशास्त्र)
रा.सोमठाणा ता.वसमत जि.हिंगोली.
मो. ७७९८०४६९६८

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here