आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

खर्ड्याची लढाई: जेव्हा निजामने मराठ्यांसमोर शरणागती पत्करली!


ही गोष्ट १७९० च्या दशकाची आहे, त्यावेळी भारतातील बर्‍याच भागावर मराठ्यांचे वर्चस्व होते. याच ताकदीच्या जोरावर मराठ्यांनी म्हैसूरच्या टीपू सुलतानवर हल्ला केला.

या हल्ल्यात हैदराबादच्या निजामाने मदत केली असली तरी, या युद्धाच्या मध्यात दोन्ही बाजूंच्या लढाईला देखील तोंड फुटले, त्यालाच ‘ खर्ड्याचे युद्ध’ असे म्हणतात. हैदराबादचा निजमाने मोठ्या उत्साहाने युद्धात उडी घेतली खरी, परंतु त्याचा तितकाच मोठा पराभव झाला.!

परिणामी या युद्धात मराठ्यांचा विजय झाला.

टीपूविरूद्ध एकत्र लढाई करणार्‍या निजाम व मराठ्यांच्यात अखेर युद्ध का सुरू झाले? कोणती कारणे होती याची?
हीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला काळाआड दडलेल्या इतिहासामध्ये जावे लागेल.

 निजाम

मराठ्यांच्या मागणीवरून वादाला झाली सुरुवात

हैदराबादचा निजाम आणि मराठा सैन्य एकजुटीने टिपू सुलतान विरुद्ध लढत होते. युद्धाच्या वेळी मराठ्यांनी त्याचे दोन संदेशवाहक गोविंदराय काळे आणि गोविंदराय पिंगळे यांच्यासोबत हैदराबादचा मीर निजाम अली खान आसफ जहां दुसरा यांना मागणीचे पत्र पाठवले.

या मागणी पत्राला उत्तर देताना निजाम यांनी ३४ पानांचे लिखित पत्र पाठवून असे आश्वासन दिले की, टीपू सुलतानबरोबर चालू असलेले युद्ध संपल्यानंतर त्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा केली जाईल. नवाबाचे उत्तर त्यांच्या बाजूने आहे असं लक्षात घेऊन नाना फडणवीस काही वर्षे थांबले.

हैदराबादने केला मराठ्यांचा अपमान.

या मागणीच्या प्रतीक्षेत वर्षे गेली. अशा परिस्थितीत मराठ्यांनी पुन्हा निजामासमोर आपली मागणी मांडली. त्याला उत्तर म्हणून निजामाने गोविंद राय काळे यांना मराठ्यांकडे अडीच कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती दिली. मराठ्यांसमोर निजामशाही खूप कमकुवत होते असे दाखवले असले तरी हे सांगण्यामागचा हेतू काही वेगळाच होता.! कोणताही वाद झाल्यास इंग्रज त्याला पाठिंबा दर्शवतीलच अशी निजामाला आशा होती. म्हणून त्याने आपल्या सैन्यालाही एकत्र करायला सुरुवात केली.

याकारणाने मराठ्यांविषयी निजामाची वृत्ती वेगळी झाली होती. हळूहळू मागण्यांवरील चर्चेचा विषय वर्ष १७९४ पर्यंत येऊन पोहोचला. दरम्यान, निझाम आणि मराठा दोघेही त्यांच्या मतावर ठाम राहिले होते.

याच काळात, निजामाचे एक मंत्री मुशीर उल मुल्क यांनी गोविंदराय काळे यांना हुजुमपत्र पाठवून बजावले की, नाना फडणवीस यांना या विषयावरील चर्चेसाठी हैदराबादला स्वतःला यावे लागेल आणि ते स्वत: आले नाहीत तर आमचे सैन्य सक्तीने त्यांना येथे घेऊन येतील.

मराठ्यांनी याला स्वतःचा आणि नाना फडणवीसांचा अपमान मानला.

निजामाच्या या असभ्य वागण्या वरून हे सिद्ध झाले की हे प्रकरण चर्चेने सुटणार नाही. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा निकाल लावण्याचा एकमेव पर्याय म्हणजे युद्ध होता.!

निजामाची सैन्यासह कूच

हैदराबाद आणि मराठ्यांमधील परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नव्हती. सन १७९५ च्या सुरूवातीला निझामने फ्रान्स तुकडीच्या बळावर बिदरकडे कूच केली. यावेळी त्याच्यासमवेत मुशीर-उल-मुल्क, कुर्नूलचा नवाब आणि त्याचे सैन्य सामील होते.

काही वेळाने तो बिदर सोडुन वाकीगुंग व नंतर मोरी घाट येथे पोहोचला. तेथे त्याच्या सैन्याने तळ ठोकला.

या दरम्यान निजामाच्या सैन्याचे मनोबल अगदी शिगेला होते. काही काळानंतर पुणे त्यांच्या अधिपत्याखाली येईल आणि खानदेशलाही हैदराबादचा भाग बनवून घेण्यात येईल, या विचाराने तो उन्मत्त बनला होता. निजामाकडे तेव्हा ४५०० घोडदळ, ४५०० पायदळ सैनिक आणि १०० हून अधिक बंदुका होत्या. युद्धाची सर्व तयारी झालेली. एकीकडे निजाम आपल्या सैन्यासह सज्ज होता, तेथे मराठेही कमी नव्हते.

सवाई माधवरावांच्या नेतृत्वात मराठेही हैदराबाद सैन्यावर चढाई करण्यास सज्ज झालेले. उत्तरेकडील दौलतराय शिंदे आणि तुकोजीराय होळकर हेही या युद्धात सहभाग घेण्यासाठी माधवारावाना सामील झाले.

त्याचप्रमाणे पश्चिमेकडून गायकवाड व पूर्वेकडून रघुजी भोसले हे आपल्या सैन्यासह मराठ्यांच्या बाजूने युद्धाच्या ठिकाणी उभे राहिले. परिस्थिती अशी होती की निझामाच्या सैन्याचा सामना करण्यासाठी सर्व मराठे एकत्र आलेले.
केशरी ध्वजाखाली निंबाळकर, घाटगे, चव्हाण, पवार, थोरात, वालंचूरकर, मालेगावकर, पंत सतीव यांच्यासह इतर मराठे एका सुरात युद्धासाठी घोषणा देत होते.

निजामाच्या सैन्याच्या तुलनेत मराठा सैन्य सुमारे २ लाख होते. मराठा सैन्याने औरंगाबादमार्गे बिदारकडे कूच केले आणि थोड्या वेळाने वाकीगुंग आणि पजीरी या भागात पोचले.

निजामाच्या बाजूने, फ्रेंच अधिकारी रेमंड आणि त्याचे सैन्य रणांगणात युद्धासाठी पुढे आले आणि त्यावर उत्तर म्हणून कमांडर चीफ परशुराम भाऊ पटवर्धन आपल्या सैन्यासह पुढे निघाले. या समोरासमोर झालेल्या लढाईत दोन्ही बाजूंचे बरेच योद्धे धारातीर्थी पडले.

निजाम

यानंतर ११ मार्च १७९५ रोजी खर्डा किल्ल्याजवळ निजाम व मराठा राज्यकर्त्यांमध्ये थेट लढाई सुरू झाली. युद्धामध्ये निजामची सेना मराठ्यांसमोर लढताना दिसत होती. पण निजाम अजूनही या गैरसमजात होता की त्याची सेना मराठ्यांवर विजय मिळवेल.

हळूहळू युद्धामध्ये मराठा सैन्याचे वर्चस्व वाढले आणि निजामाचे हजारो सैनिक मारले गेले. स्वतःचा पराभव होताना पाहून निजाम आपल्या काही सैनिकांसमवेत खर्डा किल्ल्यात लपला.

……आणि निजामाला झुकवले.

या दरम्यान मराठा सैन्याने किल्ल्याला चारी बाजूंनी वेढले. १७ दिवसानंतर, किल्ल्यात बंद असलेला निजाम आणि त्याचे सैन्य यांच्यावर जेव्हा उपासमारीची वेळ आली, तेव्हा निजामाने आत्मसमर्पण केले.

त्यांनी मराठ्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि भरपाई म्हणून मराठा साम्राज्याला ३ कोटींची भरपाई द्यावी लागली.
यानंतर नाना फडणवीस यांचा अपमान करणार्‍या निजामाचे मंत्री मुशीर उल मुल्क यांना शिक्षा म्हणून पुण्याच्या तुरूंगात टाकण्यात आले.

मराठ्यांच्या मागणीनुसार निजामाला परांडा किल्ला ते ताप्ती नदीपर्यंतच्या संपूर्ण प्रदेशावर असलेला त्याचा अधिकार सोडावा लागला, यासोबतच मराठ्यांनी दौलताबादचा किल्लाही ताब्यात घेतला. यामुळेच, निझामाचा अभिमान आणि मराठ्यांच्या  एकतेचे प्रतीक दाखवणारे हे युद्ध स्वतः ऐतिहासिक होते. त्यानंतर मराठ्यांमध्ये पुन्हा कधीही ऐक्य दिसले नाही.ही शोकांतिका म्हणावी!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

मीर कमरुद्दीन: मोगलांविरुद्ध बंड करणारा पहिला निजाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here