आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

पुतीनने शॅम्पेनचं नाव बदलल्यामुळे फ्रान्स का भडकलाय?


 

फ्रान्समधील लोक सध्या रशियावर फार चिडले असून त्यांनी रशियाला करण्यात येणारी शॅम्पेनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारण देखील तितकंच मजेशीर आहे.

तर झालं असं की रशियाने त्याच्या देशाबाहेरील प्रत्येक शॅम्पेनला ‘स्पार्कलिंग वाईन’ म्हणून संबोधित करण्याचे फर्मान काढले असून फक्त रशियामध्ये तयार होणाऱ्या ‘शंपान्सकोव्ह’ या ब्रँडच्या मद्यालाच शॅम्पेन म्हणायचे निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सही करून हा कायदा पारित केला आहे.

new google

फ्रान्समधील शॅम्पेन उद्योगावर याचा प्रभाव पडला असून तेथील औद्योगिक संघटनांनी रशियाला होणारी शॅम्पेनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

खरंतर शॅम्पेन हे मूळ फ्रेंच नाव असून फ्रान्समधील शंपान्या नावाच्या एका क्षेत्राच्या नावावर आधारलेलं आहे. असं म्हणतात की ह्या गावातच सर्वात पहिले शेम्पेनचा आविष्कार करण्यात आला होता. आज जगभरातील १२० देशात फ्रान्सकडे ह्या ‘शेम्पेन’च्या नावाचं कायदेशीर पेटंट आहे.

आता रशियाच्या या नवीन कायद्यामुळे फ्रान्सच्या ओरिजिनल शॅम्पेनची ओळख पुसण्याचा प्रयत्न रशियन सरकार करत असून रशियन लोकांपासून शॅम्पेनचे सत्य लपवण्याचे अत्यंत चुकीचे काम करत असल्याचा आरोप फ्रान्सच्या औद्योगिक संघटनेचे प्रमुख मॅक्सिम टुबार्ट आणि ज्यां- मरी बैरिले यांनी केला आहे.

फ्रान्सचे व्यापारमंत्री फ्रॅंक रिएस्टर हे देखील रशियाच्या या निर्णयामुळे नाराज झाले असून त्यांनी याविरोधात युरोपातील इतर देशांच्या व्यापारमंत्र्यांशी संपर्क साधून रशियाच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटर वर देखील फ्रान्स सरकार व्यापारी वर्गासोबत असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे फ्रान्समधील बऱ्याच कंपन्यांनी रशियाच्या या निर्णयावर दुःख व्यक्त करत त्याचा निषेधाचा पवित्रा घेतलेला असताना काही कंपन्या आशा देखील आहेत ज्यांनी रशियन सरकारच्या निर्णयाला एलतर्फी मुकसंमती दिली आहे. या कंपन्यांनी आपल्या शॅम्पेन बॉटलवर स्पार्कलिंग वाईन असं लिहून रशियात त्याची निर्यात सुरू देखील केली आहे, पण ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे.

रशियासमोर झुकणाऱ्या वॉव क्लिक्वो आणि डोम पेरिन्योन या दोन शॅम्पेनच्या निर्मात्या कंपन्यांच्या विरोधात फ्रान्समधील जनतेने देखील रोष प्रकट केला आहे, इतकेच नाही तर या दोन कंपन्यांचे शेयर देखील कोसळले आहेत. तब्बल ०.२ टक्क्याची कमतरता शेयरमध्ये आली आहे. पण याचा उलट परिणाम असा झाला की रशियातील स्पार्कलिंग वाईन बनवणाऱ्या कंपन्यांचे शेयर गगनाला भिडले आहेत.

अरबो दसरो नामक शॅम्पेन निर्माता कंपनीचे मालक पावलो तितोव्ह यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की आम्ही स्पार्कलिंग वाईन या नावाने कुठेच शॅम्पेन विक्री करणार नाही आहोत. त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास प्रकट केला आहे.

तितोव्ह म्हणतात की आम्हाला रशियन बाजारात आमची वाईन विक्री करायला नक्कीच आवडेल हे आमचं लक्ष देखील आहे परंतु शॅम्पेनचा जन्म फ्रान्सच्या शंपान्या क्षेत्रातच झाला आहे, हे सत्य मात्र कोणीच नाकारू शकत नाही.

शॅम्पेन

युरोपियन युनियन देखील रशियाच्या या निर्णयावर आपली हरकत नोंदवली असून अशाप्रकारे रशिया अस्तित्वात असलेल्या शॅम्पेन उद्योगावर नामांतर कायदा करून गदा आणू शकत नाही, असं स्पष्ट शब्दात म्हटलं आहे. रशियाने जर हा कायदा अंमलात आणला तर आम्ही देखील यावर सक्त कारवाई करू असा पवित्रा देखील युरोपियन युनियनने घेतला आहे. पण ही कारवाई नेमकी कोणत्या स्वरूपाची असेल यावर मात्र त्यांनी मौन बाळगले आहे.

काय आहे स्पार्कलिंग वाईन आणि शॅम्पेनमधील फरक?

शेम्पेन हे फार आधीपासूनच श्रीमंत आणि ऐशोआरामाची जिंदगी जगणाऱ्या लोकांचे पेय आहे. त्याची किंमत देखील खूप जास्त असते.त्या तुलनेत स्पार्कलिंग वाईन हे रशियात मिळणारं फार स्वस्त पेय असून त्याची गुणवत्ता फार चांगली नसते, फार तर १५० रुपयांपर्यंत हे पेय रशियात सहज उपलब्ध होते. अशावेळेस रशियन सरकारने एकाएकी बदल करून शॅम्पेनसारख्या महागड्या आणि श्रीमंत लोकांच्या मद्याला या स्पार्कलिंग वाईंनच्या श्रेणीत आणून बसवल्यामुळे त्याची किंमत कमी होण्याचे भय फ्रान्समधील शॅम्पेन उत्पादकांना आहे.

पाचव्या शतकात फ्रान्सच्या शंपान्या भागात शॅम्पेनचा आविष्कार करण्यात आला होता. इसवी सन ९८७ मध्ये फ्रान्सचा राजा ह्यू कॅपे त्याच्या अत्यंत खास पाहुण्यांनाच शॅम्पेन पाजायचा. १७१५ मध्ये चौदाव्या लुईच्या मृत्यूनंतर राजा बनलेल्या फिलिप द्वितीयने स्पार्कलिंग वाईन बाजारात आणली होती. या दोन्ही द्रव्यात बेसिक फरक असा होता की शेम्पेन ही जरा जास्त कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करायची. त्यामुळे तिची बाटली उघडल्यावर मोठ्या प्रमाणात फेस बाहेर पडायचा, त्यामुळे फिलिपला शेम्पेन आवडायची नाही, तो स्पार्कलिंग वाईनचा चाहता होता, पण त्याच्या मृत्यूनंतर स्पार्कलिंग वाईनची लोकप्रियता घटून ती सामान्य बनली व शॅम्पेन बाजारात लोकप्रिय ठरली, तिची किंमत इतकी वाढली की फक्त श्रीमंत वर्गाला ती परवडायची.

तेव्हापासून शॅम्पेनला युरोपात श्रीमंत लोकांचे पेय म्हणून ओळख मिळाली. पुढे युरोपियन साम्राज्यवादाने हे पेय जगभरात पोहचवले त्यामुळे आजतागायत हे पेय श्रीमंतीचे प्रतीक मानण्यात येत होते, परंतु रशियन सरकारच्या निर्णयामुळे फ्रान्सच्या या श्रीमंत लोकांच्या पेयाचा अपमान होतो आहे, त्यामुळे फ्रेंच शॅम्पेन उत्पादक चिडले आहेत.

आता फ्रान्स आणि रशियातील हा वाद कुठवर जाऊन पोहचतो हे पाहणे रंजक ठरणार आहे!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here