आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

उत्तर कोरियात फिरायला गेलेल्या या तरुणाने कोरिया हुकुमशाहीचे खरे स्वरूप जगासमोर आणले होते..!


ओटो वार्मबियर, अमेरिकेच्या ओहयो राज्यात सिनसिनाटी शहरात राहणारा एक अत्यंत हुशार मुलगा होता. ओहयोच्या सर्वात मोठ्या शाळेत दुसरा क्रमांक पटकावून उत्तीर्ण होणारा व गणितीय समीकरणे सोडवणारा अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी. पण त्याने आयुष्यात एक अशी चूक केली ज्यामुळे त्याला स्वतःच्या प्राणास मुकावे लागले. पण त्याच्या मृत्यूनंतर जगासमोर आले जगातील सर्वात क्रूर हुकूमशाहीचे म्हणजेच उत्तर कोरियाचे अंगावर शहारे आणणारे सत्य. काय आहे नेमकी या तरुणाची दुर्दैवी कथा जाणून घेउ..

ओटो वार्मबियर हा एक हुशार विद्यार्थी असल्याने त्याला त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेमुळे त्याला एक वर्ष परदेशात शिकण्याची संधी मिळाली. २०१६ साली त्याची हॉंगकॉंगमध्ये शिक्षणासाठी निवड झाली. २२ वर्षांचं वय असलेल्या या नवयुवकाची हॉंगकॉंगला जाण्याची लगबग सुरू असताना अचानक त्याचे लक्ष एका चीनस्थित ट्रॅव्हल एजन्सीच्या जाहिरातीकडे गेलं. यंग पायनियर नावाच्या संस्थेच्या त्या जाहिरातीचा ‘भटका आशा ठिकाणी जिथे तुमचे आई वडील तुम्हाला कधीच जाऊ देणार नाही!’ असा माथळा होता. ती जागा जिथे ती संस्था फिरायला किंवा भटकायला घेऊन जाणार होती, तिचे नाव होते ‘उत्तर कोरिया’.

‘पाच दिवस, चार रात्री’च्या या अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या टूर वर जाण्याची इच्छा ओटो वॉर्मबियरच्या मनात उत्पन्न झाली. त्याने ठरवलं की त्याचं नववर्ष तो तिथेच साजरं करेल.तिथून परत आल्यावर पुन्हा आपलं रोजचं जगणं आणि कामाचा व्याप काही कुठे भटकायची संधी मिळू देणार नाही.

सुरुवातीला ओटोच्या आईने त्याचा या निर्णयाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आईला यात यश आलं नाही. आणि तिने देखील परवानगी दिली. अमेरिकेच्या सरकारने देखील ओटोला उत्तर कोरियात जाण्या अगोदर तिथे सरकारला त्याला कुठल्याही प्रकारची मदत करू शकणार नाही, अशी सूचना केली. त्यांच्या बोलण्यात तथ्य देखील होते. उत्तर कोरिया आणि अमेरिका हे दोन्ही शत्रू राष्ट्र आहेत. त्या दोन्ही राष्ट्रात कुठल्याही प्रकारचे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. पण ओटो ठाम होता कारण त्याअगोदर देखील त्याने ‘क्युबा’ ह्या अमेरिकेच्या शत्रुराष्ट्राचा दौरा केला होता.

२९ डिसेंबर २०१५ ला तो चीनची राजधानी बीजिंगहुन उत्तर कोरियाला रवाना झाला. तो उत्तर कोरियाच्या राजधानीचे शहर असलेल्या प्योंगयांग येथे येऊन पोहचला. तिथे पोहचल्यावर त्याच्या व त्याच्या सहप्रवासी वर्गाजवळ असलेल्या कॅमेऱ्याला सरकारने जप्त केले व मोबाईलची कसून तपासणी केली. पहिल्या दिवशी त्यांच्या पर्यटक वर्गाला ‘एस प्युब्लो’ नावाचे एक जहाज दाखवण्यात आले.

हे जहाज अमेरिकेचे होते, ज्याला १९६८ मध्ये उत्तर कोरियाने जप्त केले होते. त्यावेळी तिथला उत्तर कोरियन गाईड म्हणाला की हे जहाज आमच्या इम्पेरियल एनिमीकडून चोरण्यात आलेलं आहे. हे ऐकताच ओटोच्या बरोबर आलेले इतर सहप्रवासी त्याला ‘इम्पेरियल एनिमी’ म्हणून चिडवायला लागले. यात कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलियाचा नागरिकांचा समावेश होता. ओटो सोबत १० अमेरिकन सहप्रवासी देखील होते.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हे सर्व पर्यटक एका बारमध्ये गेले व त्यांनी तिथे मस्त मोकळेपणाने मद्यपान केले. मग ते सर्व प्योंगयांगच्या प्रसिद्ध किम ईल संग स्क्वेअर या चौकात गेले, तिथे अनेक उत्तर कोरियन लोक देखील उपस्थित होते. तिथे नववर्षाचे स्वागत करून ते आपल्या यांग्गकाडो इंटरनेशनल हॉटेलमध्ये परतले.

तिथे काही लोक बियर पिण्यासाठी गेले आणि काही बॉलिंग एरियात फिरत बसले. पण हे सर्व सुरू असताना ओटो मात्र गायब होता. तो कुठे होता हे कोणालाच माहिती नव्हते. एक ब्रिटिश नागरिक डॅनी ग्रेटो, हे ओटोचे त्या हॉटेलमध्ये रूममेट होते, त्यांनी देखील आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले होते की त्या वेळी ओटो कुठे होता हे कोणालाच माहिती नव्हते.

०२ तारीख उजाडली आणि सगळा ग्रुप एयरपोर्टवर आपल्या परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी निघाला. ते एयरपोर्टवर आपल्या परतीचा प्रवास करायला निघणारच तेवढ्यात तिथे दोन सिक्युरिटी गार्डस आले आणि त्यांनी ओटोची चौकशी करण्यास सुरुवात केली. ही चौकशी सुरू असताना डॅनी ओटोला मस्करीने म्हणाले की ही आता आपली शेवटची भेट आहे, आता काही हे तुझ्या सारख्या ‘अमेरिकन’ माणसाला सोडत नाही. यावर ओटोने देखील स्मितहास्य केले.

पुढे सर्व लोक विमानात बसल्यावर त्यांना एक सूचना देण्यात आली की ओटो वार्मबियरची तब्येत बिघडल्यामुळे त्याला इथल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे, त्यामुळे ते तुमच्यासोबत येऊ शकणार नाही, यामुळे सर्वच सह प्रवाशांना धक्का बसला. त्यानंतर विमान परतले पण ओटो मात्र उत्तर कोरियातच राहिला.

पुढे ओटो जगासमोर आला ते २९ फेब्रुवारी २०१६ ला, त्यावेळी त्याच्या हातात एक चिठ्ठी होती व त्या चिठ्ठीमध्ये लिहलेली प्रत्येक गोष्ट त्याने वाचून दाखवली.

उत्तर कोरिया

त्या चिठ्ठीत लिहिले होते की त्याने यांगगकाडो इंटरनॅशनल हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला व सरकारच्या सूचना फलकाला चोरण्याचा प्रयत्न केला. पुढे असं देखील लिहिलं होतं की त्याने हे सगळं अमेरिकेच्या मेथडिस्ट चर्च फ्रेंडशिप युनायटेडच्या सांगण्यावरून केलं होतं. चर्चचा उल्लेख करण्याचे कारण देखील महत्त्वाचे होते. ओटो हा ज्यू धर्मीय होता. परंतु या पत्रात केलेल्या दाव्याचे मेथडिस्ट चर्चने खंडन केले.

उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने ही सर्व माहिती प्रसारित केली,इतकेच नाहीतर या विषयावर एक डिटेल अनालिसिस रिपोर्ट प्रकाशित केला. त्यात एक ब्लर व्हिडीओ फुटेजचा देखील समावेश होता ज्यात त्यांनी ओटोला चोरी करताना दाखवले होते, पण उत्तर कोरियाकडून देण्यात आलेले सर्वच पुरावे अत्यंत संशयास्पद व बनावटी होते.

१६ मार्च २०१६ चा दिवस उजाडला, उत्तर कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने ओटो वार्मबियरला दोषी ठरवले. त्याच्यावर उत्तर कोरियाच्या कायद्याच्या कलम ६० नुसार संपत्तीचे नुकसान करण्याचा ठपका ठेवण्यात आला. त्याच्यावर अमेरिकन सरकारचे शत्रूनीतीचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला. उत्तर कोरियाच्या एकात्मतेचा शत्रू म्हणून त्याला घोषित करण्यात आले. त्याला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्याविरोधात खोट्या पुराव्यांचे मोठे जाळे उत्तर कोरियाने विणले होते.

परंतु दीड वर्षांनी अचानक उत्तर कोरियाने ओटोला अमेरिकेला रवाना करण्याचा निर्णय घेतला. १३ जून २०१७ ला ओटो घरी परतला, पण अशा अवस्थेत ज्यात तो बोलू देखील शकत नव्हता.त्याचे वडील फ्रेड वार्मबियर यांनी त्याला कडकडून मिठी मारली, पण त्याची तब्येत फारच खालावली होती. तो व्हेजिटेटिव्ह स्टेट अर्थात कोमा सदृश्य स्थितीत जाऊन पोहचला होता. त्याने आपले चेतना चांक्षु गमावले होते.त्याला फिडिंग ट्युबने तब्बल सहा महिने अन्न देण्यात येत होते. त्याची तब्येत इतकी खालावली होती की,  त्याने सहा महिन्यात प्राण सोडले.

त्याच्या मृत्यूनंतर तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी कुठल्याही आई वडिलांना हे दुःख बघावे लागू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना उत्तर कोरियावर निशाणा देखील साधला होता.

अजूनही अमेरिकन डॉक्टर्सला कळू शकलेलं नाही की हा मुलगा कोमात कसा गेला? अनेकांना वाटते की हे झोपेच्या गोळ्यांमुळे झाले असावे, पण त्याचा इतका गंभीर परिणाम होईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं. याला मुळात उत्तर कोरियन हुकुमशाही व्यवस्थेचा हिंसाचार हेच कारण होतं.

आज हयात नसलेल्या ओटोने त्यावेळी जगातील सर्वात क्रूर हुकुमशाहीचे खरे स्वरूप जगासमोर आणले होते. पण आजही त्याचे आई वडील विचार करताय की ‘जर आपण त्यावेळी जाऊ दिलं नसतं तर?’

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here