आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जालियन वाला बाग हत्याकांडाचा बदला या क्रांतीकारकाने घेतला होता..!


भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे अनेक स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले आहेत. अशाच काही अमर क्रांतिकारकांपैकी एक होते जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे थोर क्रांतिकारक सरदार उधमसिंह. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडले तेव्हा पंजाब प्रांताचा गव्हर्नर असलेल्या मायकल ओ’डवायर याला तब्बल २० वर्षानी गोळ्या घालून उधमसिंह यांनी संपवले होते. ह्या गुन्ह्यासाठी इंग्रजांनी त्यांना ३१ जुलै १९४० साली फासावर लटकावले होते.

उद्धमसिंहाचा जन्म २६ डिसेंबर १८९९ ला पंजाब प्रांतात असलेल्या संगरुर भागातील सुनामा गावात झाला. त्याचे वडील सरदार तेहल सिंह जम्मूच्या उपल्ली गावात चौकीदार म्हणून काम करत होते. त्यांनी उधमसिंहांचे नाव आधी शेर सिंह असे ठेवले होते. त्यांना एक मुक्ता सिंह नामक मोठा भाऊ देखील होता. पुढे १९०१ मध्ये जेव्हा ते फक्त २ वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले. पुढे ते सहा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले. बघता बघता ७ वर्षात दोन्ही बंधू अनाथ झाले.

आई वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही भावंडांना अमृतसरच्या सेंट्रल खालसा अनाथाश्रमात पाठवण्यात आले. तिथे दोघांचे नामकरण करण्यात आले, इथेच शेर सिंहचे उधमसिंह असे नामकरण करण्यात आले.

new google

त्यांच्या मोठ्या भावाचे साधू सिंह असे नामकरण करण्यात आले. पुढे उधमसिंह यांनी आपले नामकरण सरदार राम मोहम्मद सिंह असे केले होते. यातून त्यांनी शीख – हिंदू- मुस्लिम धार्मिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.

आई वडिलांनंतर उधमसिंहांना त्यांच्या भावाचा आसरा होता पण तो देखील अधिक काळ टिकला नाही. १९१७ साली त्यांच्या भावाचे निधन झाले आणि उधमसिंह पूर्णपणे अनाथ झाले. हे प्रचंड दुःख उराशी बाळगून त्यांनी १९१८ मध्ये आपल्या आश्रमशाळेतून मेट्रिक परीक्षेत यश संपादन केले. १९१९ मध्ये ते काही क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. त्यांची विचारधारा त्यांना प्रचंड भावली आणि त्यांनी क्रांतिकार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

१३ एप्रिल १९१९ चा तो काळा दिवस. बैसाखी सणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक अमृतसरच्या जालियनवाला बागेत एकत्र आले होते. त्यावेळी पंजाब प्रांताचा गव्हर्नर असलेल्या मायकल ओ’डावायरने संपूर्ण प्रांतात जमावबंदी लागू केली होती. त्याच्या आदेशाला डावलून एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले हे बघून त्याने त्याच्या जनरल डायरला लोकांना कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले.

जनरल डायरने लोकांवर सरळ गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्या गोळीबारात शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. उधमसिंह देखील त्यावेळी तिथेच होते, हे हत्याकांड बघून त्यांच्या मनात प्रतिशोधाचा तीव्र अग्नी भडकला होता. त्यांनी जालियनवाला बागेतील माती हातात उचलली आणि या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या त्यागाचा प्रतिशोध घेण्याचा सुनिश्चय केला.

पुढे उधमसिंह क्रांतिकारकांच्या सैन्यात सामील झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात डोनेशन एकत्र करून परदेशाची वाट धरली. १९२४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिका, ब्राझील, झिम्बाब्वे आणि अमेरिका या देशांचा दौरा करून स्वातंत्र्य संग्रामासाठी मोठ्या प्रमाणात धनसंचय केला. १९२७ साली जेव्हा ते परत आले त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना क्रांतिकारी कारवायांमध्ये सहभागी असण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली.

पुढे १९३१ पर्यंत उधमसिंह हे अटकेतच होते. नंतर त्यांची ब्रिटिशांनी सुटका केली. सुटका झाल्यानंतर देखील ब्रिटीशांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. मग त्यांनी लपून छपून काश्मीर गाठले. तिथे काही काळ राहिल्यानंतर ते तिथून जर्मनीला गेले. ते तिथून लंडनला जाणार होते पण ते तिथे पोहचण्याचा अगोदरच जालियनवाला बागेच्या भीषण हत्याकांडाचा कर्ताधर्ता असलेला जनरल डायर मेलेला होता.

जालियन वाला

डायर मेलेला असला तरी त्याकाळी असलेला पंजाब प्रांताचा गव्हर्नर मायकल ओ’डवायर जिवंत होता. उधमसिंहांनी त्याला मारून आपला प्रतिशोध पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या २१ वर्षांनी उधमसिंहाना आपला प्रतिशोध घेण्याची संधी मिळाली होती. १३ मार्च १९४० ला लंडनच्या कॉकस्टन हॉलमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. तिथे मायकल ओ’डवायर व्याख्यानासाठी येणार होता. उधमसिंहाना याची एकदिवस अगोदरच कल्पना आली होती. ते तिथे जाऊन पोहचले. त्यांनी एका मोठ्या पुस्तकात आपली बंदूक लपवली होती.

त्यांनी पुस्तकात व्यवस्थित खड्डा करून त्यात बंदूक लपवली होती. मायकल ओ’डवायर व्याख्यान द्यायला उभा राहिला आणि जेव्हा त्याचे भाषण पूर्ण झाले, त्यावेळी तो मागे वळला तेव्हाच उधमसिंहानी आपली पिस्तुल बाहेर काढली व त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या दोन गोळ्यांनी मायकल ओ’डवायर जागीच कोसळला. यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली.

उधमसिंहांच्या अटकेनंतर त्यांना लंडनच्या बैरिकस्टन कारागृहात ठेवण्यात आले. तिथे त्यांच्या मनावर न कुठले भय होते, न कुठले दुःख होते. जेलमध्ये असताना त्यांनी आपल्या मित्राला शिव सिंहला पत्र लिहिले होते.

त्या पत्रात ते म्हणाले, ‘मला माहितीये की लवकरच माझे मृत्यूशी लग्न रचले जाणार आहे. मी कधी मृत्यूला कधीच घाबरलो नाही, त्यामुळे त्याचे कुठलेच दुःख मला नाही, मी माझ्या देशाचा शिपाई आहे, दहा वर्षांपूर्वी माझा मित्र (भगतसिंह) मला सोडून गेला. आता मृत्यूनंतर माझी त्याच्याशी भेट होईल. तो माझी वाट बघत असेल’

उधमसिंह हे खऱ्या अर्थाने एक प्रखर देशभक्त होते. ३१ जुलै १९४० ला त्यांना फाशी देण्यात आली. पुढे स्वातंत्र्यानंतर त्यांच्या अस्थी भारतात आणण्यात आल्या त्यावेळी लाखो हिंदुस्थानी देशभक्त नागरिक त्यांच्या दर्शनासाठी आले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here