आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

इंग्रजांच्या अभिमानावर तडफदार हल्ला करून ‘बेगम हजरत महल’ १८५७ च्या बंडाची नायिका बनली होती…!


१८५७ चा विद्रोह केवळ ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांचा उदय म्हणूनच ओळखला जात नाही तर महिलांच्या जोरदार भूमिकेसाठीही ही बंडखोरी लक्षात ठेवली जाते. ती वेळ होती, जेव्हा राणी लक्ष्मीबाई यांचे नाव ऐकूनच इंग्रज थरथर कापत असत. पण या बंडाचे धागेदोरे सावरणारी आणखी एक महिला होती, जीने इंग्रजांना हादरवून टाकलेले, तिचे नाव होते बेगम हजरत महल.

ज्या युगात स्त्रियांचे जीवन पडद्यामागे कैद झाले होते, त्यावेळी नवाब वाजिद अली शाह यांची बेगम हजरत महल इंग्रजांविरूद्ध अवध यांच्या प्रतिकारांचे प्रतीक बनली होती.

आज आम्ही अवधच्या या नायिकेच्या कथेची ओळख तुम्हाला करुन देणार आहोत.

बेगम हजरत महल यांचा जन्म अवध प्रांतातील फैजाबाद जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपणीचे नाव मुहम्मदी खातून असे होते. तिचे आईवडील खूप गरीब होते, जे एका मुलीला वाढवण्यासाठी सक्षम नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी मुहम्मदी खातून हिला एका दलालाला विकले.

यानंतर तिला नृत्याचे प्रशिक्षण मिळाले आणि ती एक प्रसिद्ध गणिका बनली. तिथून ती शाही हरममध्ये आचारी म्हणून आली. यावेळी शाही दलालांच्या हातून तिला पुन्हा विकण्यात आले,तेव्हा तिला ‘परी’ हे नवं नाव पडलं आणि तिला सगळे ‘महक परी’ या नावाने ओळखायला लागले.

'बेगम हजरत महल

अवधच्या नवाबाने तिला पाहिले तेव्हा तिचा समावेश पुन्हा शाही हरममध्ये झाला. नंतर नवाबाने तिच्याशी लग्न केले आणि मुलगा बिरिजस कादरच्या जन्मानंतर तिला ‘हजरत महल’ ही पदवी मिळाली.

बेगमने फुंकला इंग्रजांविरूद्ध बंडखोरीचा बिगुल

१८५६ मध्ये अवधचे नवाब वाजिद अली शाह यांना ब्रिटीशांकडून गैरवर्तन केल्याच्या आरोपाच्या आधारे सिंहासनावरून हद्दपार करण्यात आले. नवाबाला कलकत्ता (कोलकाता) येथे पाठवण्यात आले आणि मागे राहिली बेगम हजरत महल आणि तिचा १२ वर्षांचा मुलगा बिरजस कादर.

यानंतरही तिने हार मानली नाही आणि आपल्या अल्पवयीन मुलाला सिंहासनावर अधिकृत वारस बसवून ब्रिटीशांच्या विरोधात मोर्चा उघडला. त्यादरम्यान, क्वीन व्हिक्टोरियाने अवधला लवकरात लवकर ईस्ट इंडियाकडे देण्याचे अधिकृतपणे आदेश जारी केला.

परंतु बेगम हजरत महल यांनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दर्शविला आणि बंडखोरीचा झेंडा उंचावला. याद्वारे त्यांनी अवधातील जनतेलाही एकत्र केले. ती स्वत: आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उतरत असे. लखनौमधील रेसिडेन्सीच्या भिंतींवर आजही बेगमच्या क्रांतीची उदाहरणे पाहायला मिळतात.

बेगमने आपल्या सर्व सामर्थ्याने लढा दिला पण ब्रिटीश सैन्याने हळू हळू अवध ताब्यात घेतले. अखेरीस बेगमला अवध सोडून नेपाळमध्ये आश्रय घ्यावा लागला, जिथे तिने आयुष्याची शेवटची दोन दशके निर्वासित म्हणून घालविली.

असं म्हणतात की ब्रिटीशांनी तिला पेन्शन चे आमिष दाखवून परत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी स्वतंत्र अवधशिवाय इतर काहीही स्वीकारणार नाही हे स्पष्ट केले. अवधच्या या नायिकेने १८७९ मध्ये नेपाळमध्ये अखेरचा श्वास घेतला.
आजही त्यांची समाधी नेपाळमधील काठमांडू येथे आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :   कारगिल युद्धाची सुरवात करणारा सैनिक..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here