आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

सामान्य माणसाचे आणि एस टी चे स्वागत करणारा माणूस….


काल रात्री गणपत आबा गेल्याची बातमी आली. अवघ्या तीन मिनिटांत कैक लोकांच्या व्हॉट्सॲप वर आबांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे स्टेटस दिसू लागले. आमच्या करमाळा,सांगोला ,माढा,माळशिरस आणि पंढरपूर भागात गणपत आबांना मानणारा दांडगा जनसमुदाय. १० ऑगस्ट १९२७ रोजी मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावी जन्मलेल्या गणपतरावांनी १९५७ साली सांगोला कोर्टात वकिली सुरू केली. १९६२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आबांना शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी दिली.

माणूस

याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या केशव राऊत यांचा दोन हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. अगदी तेव्हा पासूनच आबांनी देखील लोकांवर भरभरून प्रेम केलं. सुरवातीच्या काळात शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून जरी आबा चर्चेत आले असले तरी आबा लोकांच्या विश्वासावर जगणारे अवलिया होते.

आपल्या राजकीय कारकिर्दीत आबांनी दोन वेळेस मंत्रिपद देखील भूषवले. शरद पवार यांच्या यांच्या सरकार मध्ये १९७८ ते १९८० या दोन वर्षाच्या कालखंडात आबा ग्रामीण विकास आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री देखील राहिले. २००० सालच्या सुमारास सत्तेत आलेल्या आघाडी सरकारच्या काळात देखील आबा रोजगार व विपणन खात्याचे मंत्री होते. आबा हे सोलापूर जिल्ह्याचे नेते होतेच त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांचे नाव महाराष्ट्रात देखील मोठे होते.

१९६२ साली पहिल्यांदा निवडून आल्या नंतर जवळपास पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ आमदारकी आपल्याकडे ठेवली.

आता अलीकडची एक गोष्ट सांगतो ती खूप महत्वाची आहे. मे २०१८ सालची घटना असेल! मी नुकताच सोलापूर लोकमत मध्ये वार्ताहर म्हणून चिकटलो होतो. पोट जळणारा दुष्काळ असल्याने जनावरे जगवण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली म्हणून माझ्या गावात कोर्टी ( ता करमाळा) सुरू असलेल्या चारा छावणीत मी माझ्या मित्र मंडळीसह राहत होतो. त्याच चारा छावणीत राहून बातमीदारी करत होतो.

पाण्याची जबर टंचाई होती. एके दिवशी अचानक दुपारच्या सुमारास तळपत्या उन्हात ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव चारा छावणीत आले. चारा छावणीतल्या लोकांची विचारपूस केली. दुरहुन छावणीत राहायला आलेल्या छावणीतल्या मुल अन् बायकांना संध्याकाळच्या जेवणाची हेळसांड होत असल्याचे काही मुलांनी अन् बायकांनी बाबांना बोलून दाखवले. संबंधित प्रश्नावर बाबांनी सांगोल्याच्या गणपत देशमुखांना बोलतो असे सांगितले शिवाय चारा छावणीमधूनच आबांना फोन केला. सगळी हकीकत आबांनी ऐकून घेतली.

माणूस

आजारपण आणि वयामुळे शक्य नसल्याने मी येऊ शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली पण दोन दिवसात तोडगा काढू असे आश्वासन आबांनी बाबांना दिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किराणा मालाचे टेम्पो छावणीवर आला. लोकांच्या संध्याकाळच्या जेवणाची सोय आबांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून करून दिली होती.

अशीच आठवणीतील आणखीन एक घटना आहे. एकदा गावातील घोगरे नावाच्या बैल व्यापाऱ्या सोबत सांगोल्याच्या बैल बाजारात गेलो होतो. सर्वसामान्य लोकांच्या गाठी भेटी पडतील म्हणून आबा बैल बाजारात आलेले. आमदार असून बैल बाजारात फिरणारा मी पहिला नेता पाहिला. आबा अनेक लोकांना भेटले त्यांना भेटून आबा हात जोडून विचारपूस करायचे. आबा आमदार असून लोकांच्या शब्दाल किंमत देताना दिसले.

त्यांनी सर्वसामान्यांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. इतक्या वेळेस आमदार होऊन पणं आबा काम करत राहिले. कधीही प्रसिद्धीच्या मागे लागले नाही. त्यांच्या मतदार संघात त्यांचे नाते घरच्या सारखे होते. आपल्या राजकीय प्रवासात अनेक वेळा निवडून आल्याचे गमक आबांना विचारले तर अगदी थोडक हसू तोंडावर आणत आबा बोलतात, “या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही फक्त लोकांचा विश्वास आणि सामर्थ्य पाहिजे .”

शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीला आबा कधी विसरले नाहीत. गणपतराव हे आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात सक्रिय साक्षीदार होते. शेतकरी कामगार पक्षाची संपूर्ण राज्यात हानी झाली मात्र अशा धर- सोडीच्या काळात गणपतरावांनी मात्र शात राहणे पसंत केले. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हातात धरूनच मतदारसंघही टिकवला. जगाशी संपर्क देखील त्यांनी कधी तुटू दिला नाही. भोवळ आलेल्या सांगोला तालुक्यात कधी साधं उन्हाळीचे झाड उगवायचे नाही. तिथे आबांनी दोन सूतगिरण्या उभा केल्या. शिवाय व्यवस्थित चालवल्या. सांगोला तालुका तसा दुष्काळी तालुका, दुष्काळ निवारणासाठी त्यांनी खूप महत्त्वाचे काम केले.

कृष्णा खोरे विकासाची पहिली मागणी गणपतरावांनी पाणी परिषदेत केली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत त्यांनी दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी दीर्घकाळ चळवळी केल्या. भीमा नदीवर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना राबवली. शाश्वत शेतीसाठी शेततळी किती फायद्याचे आहे याचे महत्व आबांनी सांगोल्याच्या शेतकऱ्यांना पटवून दिले. तालुक्यात शेततळ्याचे जाळे उभारणी मध्ये आबांचे मोठे योगदान आहे. आबांनी दुष्काळी सांगोल्याला शेततळ्यांची श्रीमंती दिलीये.

गरीब जनतेसाठी राज्य असावे असा आबांचा कायम कयास असायचा. त्यांचे चालणे बोलणे ग्रामीण होते. राहणी साधी मात्र विचारसरणी उच्च होती. मंत्री असताना देखील ते साधेपणाने राहत असल्याचे मी अनेकदा वाचले आहे. पांढरा शर्ट, पांढरी पँट, हातात बॅग असे साधेपणाने ते विधिमंडळात जात ,अनेकदा विधिमंडळात जाताना देखील ते प्रवास एस.टी ने करत असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकार मंडळीं पासून सामान्य माणसाला त्यांच्या कामाचे कुतूहल असायचे. आबांनी १९९० ते २००४ या काळात दोनवेळा विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून काम पाहिले.

लोकांची मत बदलत आहेत तसे राजकारणही खूप झपाट्यानं बदलत आहे. मात्र आबा राजकारण करत असून देखील राजकारणातून येणारा अप्रामाणिकपणाच्या चौकटीला कडी लावुन निव्वळ सामाजिक बांधिलकी जपत आणि बोलणे आणि साधी राहणी हीच आपली श्रीमंती हे आबांच्या जीवनाकडे पाहिले तर दिसून येते. जीवनाच्या प्रत्येक फ्रेम मधून गरजूंना मदत करणारा आपला आबा गेल्याची खंत सगळेच व्यक्त करत करताहेत.

– अक्षय आखाडे

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here