आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारत वि. वेस्टइंडीज – रोमांचक सामन्यात भारताचा ८ धावांनी विजय; मालिकेवर एकहाती वर्चस्व!


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर दुसरा टी२० सामना रंगला. भारतीय संघाने ८ धावांनी हा सामना जिंकला आहे. यासह यजमानांनी २-० अशी विजयी आघाडी घेत ३ सामन्यांची टी२० मालिकेवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

या सामन्यात भारताच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० षटकांमध्ये ३ बाद १७८ धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सर्वाधिक ६२ धावा केल्या होत्या. ४१ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या होत्या. त्याला साथ देत रोवमन पॉवेलनेही अर्धशतक झळकावले.

तो ६८ धावांवर नाबाद राहिला. मात्र संघाचा पराभव टाळू शकला नाही. त्याने ३६ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकार ठोकत ही खेळी केली होती. भारताकडून या डावात रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी केल्या. विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४१ चेंडूंमध्ये ५२ धावा फटकावल्या.

त्याने आपल्या या ताबडतोब अर्धशतकादरम्यान १ षटकार आणि ७ चौकार मारले. विराटनंतर रिषभ पंतने २८ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावांचे योगदान दिले होते. तर त्याच्या साथीला वेंकटेश अय्यरने शेवटच्या षटकांमध्ये १८ चेंडूंमध्ये ३३ धावांचे योगदान दिले होते. रिषभ पंत ला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या डावात वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत या विकेट्स घेतल्या. तर शेल्डन कॉट्रेल आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here