आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सर्फराज आणि रहाणे यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर रणजी स्पर्धेत मुंबईने रचला इतक्या धावांचा डोंगर!


युवा खेळाडू सर्फराज खानने साकारलेल्या २७५ धावांच्या मॅरेथॉन द्विशतकी खेळीच्या बळावर ४१वेळा रणजी विजेत्या मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध रणजी करंडक (ड-गट) लढतीच्या दुसऱ्या दिवशी ७ बाद ५४४ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला.

सर्फराजने १२१ धावसंख्येवरून शुक्रवारी आपल्या डावाला पुढे प्रारंभ करीत सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ३० चौकार आणि सात षटकारांनिशी ४०१ चेंडूंत आपली पावणेतीनशे धावांची खेळी उभारली. मुंबई संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे १२९ धावसंख्येवर बाद झाला. परंतु त्याने भारताच्या कसोटी संघातील आपली दावेदारी मजबूत केली.

सर्फराज आणि रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी २५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळेच ३ बाद ४३ धावांवरून मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली.अनुभवी यष्टिरक्षक आदित्य तरे (२२) आणि शाम्स मुलानी (१२) लवकर बाद झाल्यानंतर सर्फराजला आठव्या क्रमांकावरील तनुष कोटियनची (नाबाद ५०) उत्तम साथ लाभली.

या जोडीने सातव्या गडय़ासाठी ११८ धावांची भागीदारी करीत मुंबईला पाचशेचा टप्पा ओलांडून दिला. मग प्रेरक मंकडने पायचीत करीत सर्फराजला त्रिशतकापासून रोखले. उत्तरार्धात सौराष्ट्रने बिनबाद १८ धावा केल्या. सलामीवीर हार्विक देसाई आणि स्नेल पटेल अनुक्रमे ६ आणि ११ धावांवर खेळत होते.

रोहतक : महाराष्ट्राचा सलामीवीर पवन शहाने रणजी स्पर्धेतील आसामविरुद्धच्या सामन्यात पदार्पणातच द्विशतकी खेळी साकारली. २२ वर्षीय पवनच्या २१९ धावांमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात ४१५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात आसामची दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद ८१ अशी धावसंख्या होती. मुकेश चौधरीने रिषव दासला (१४), तर मनोज इंगळेने गोकुळ शर्माला (५) माघारी पाठवले. मात्र, सलामीवीर शुभम मंडल (नाबाद ३४) आणि रियान पराग (नाबाद २६) यांना आसामचा डाव सावरला.

तत्पूर्वी, ग-गटातील या सामन्यात दुसऱ्या दिवशी ५ बाद २७८ धावांवरून पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राचा पहिला डाव ४१५ धावांवर संपुष्टात आला. पवनने ४०१ चेंडूंत २० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २१९ धावांची खेळी केली. त्याला दिव्यांग हिंगणेकर (४६) आणि सत्यजीत बच्छाव (५२) यांची तोलामोलाची साथ लाभली. त्यामुळेच महाराष्ट्राला ४०० धावांचा टप्पा पार करता आला. आसामकडून मुख्तार हुसेनने ८८ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : १५७ षटकांत ७ बाद ५४४ डाव घोषित (सर्फराज खान २७५, अजिंक्य रहाणे १२९, तनुष कोटियन नाबाद ५०; चिराग जानी २/८३)


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here