आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मोठी बातमी! एकदिवसीय, टी२० नंतर कसोटी नेतृत्त्वाची माळ रोहितच्याच गळ्यात, संघाचीही झाली घोषणा


भारतीय क्रिकेट बोर्डाने मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली आहे. शनिवारी (१९ फेब्रुवारी) आयसीसीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.भारताचा संघ सध्या मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळतो आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी आणि टी२० मालिका खेळायची आहे.

जानेवारी महिन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने गमावल्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता त्याच्या जागी ३४ वर्षीय रोहितला कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत.

४ मार्च ते १६ मार्च दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपासून रोहित कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून काम पाहिल.

रोहितची कसोटी कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. त्याचा कसोटीतील अनुभव पाहता संघ व्यवस्थापनाने त्याच्या ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत त्याने कसोटी कारकिर्दीत ४३ सामने खेळले असून उल्लेखनीय अशा ४६.८७ च्या सरासरीने ३०१७ धावा काढल्या आहेत. यापैकी सर्वाधिक धावा त्याने सलामीला फलंदाजी करताना काढल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १ द्विशतक, ८ शतके आणि १४ अर्धशतके आहेत.

मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच टी२० संघाच्या उपकर्णधारपदीही त्याचीच निवड करण्यात आली आहे.

निवड समितीने अनुभवी भारतीय खेळाडू अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. कारण निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी या खेळाडूंना पूर्वसूचना दिली होती की, त्यांना श्रीलंकेविरुद्ध निवडले जाणार नाही. कारण निवड समितीची इच्छा आहे की, या चारही खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळून त्यांचा फॉर्म सुधारावा.

जरी भारताच्या या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध संधी मिळाली नसली, तरीही सौरभ कुमार या नव्या चेहऱ्याला कसोटी संघात जागा मिळाली आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भारत अ संघाचा भाग होता. तसेच भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळ यालाही संघात स्थान मिळाले आहे.

याशिवाय विराट कोहली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर अष्टपैलू शार्दुल ठाकूर कसोटी आणि टी२० मालिका, दोन्हीतही विश्रांतीवर असेल.

श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, रवी बिश्नोई.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार

श्रीलंकेचा भारत दौरा-

टी२० मालिका

२४ फेब्रुवारी – पहिली टी२०, लखनऊ

२६ फेब्रुवारी – दुसरी टी२०, धरमशाला

२७ फेब्रुवारी – तिसरा टी२०, धरमशाला

कसोटी मालिका

४-८ मार्च – पहिली कसोटी, मोहाली

१२-१६ मार्च – दुसरी कसोटी, बेंगळुरू (दिवस-रात्र)


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here